आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेवार्ता:आंदोलनात घुसलेल्या 200 अज्ञात हुल्लडबाजांवर गुन्हे ; जवळपास अडीच तास सुरू होता तरुणांचा धिंगाणा

औरंगाबाद20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ शुक्रवारी विभागीय आयुक्तालयासमोर एमआयएमतर्फे आंदोलन करण्यात आले. मात्र शांततेत आंदोलन ठरलेले असताना अचानक अज्ञात हुल्लडबाजांनी घुसखोरी करून तणाव निर्माण केला. दगडफेक करून पोलिसांशी झटापटही केली. या प्रकराची गंभीर दखल घेत बेगमपुरा पोलिसांनी शनिवारी सुमारे २०० टवाळखोरांवर आठ विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. मात्र, प्राथमिक फिर्यादीत आरोपी अनोळखी असल्याचे सांगण्यात आले. सुरुवातीला एमआयएम पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून पोलिसांकडून आंदोलनाला परवानगी देण्यात आली होती. मात्र, दुपारी आंदोलनात अचानक घुसलेल्या कार्यकर्त्यांनी जोराजोरात आरडाओरड सुरू केली. रस्ता बंद करून पोलिसांशी हुज्जतबाजी करून धक्काबुक्की केली. विभागीय आयुक्त कार्यालयात बळजबरीने प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यामुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. जवळपास अडीच तास हा धिंगाणा सुरू राहिला. पोलिस, खासदार इम्तियाज जलील वारंवार विनवण्या करत असताना त्यांचेदेखील जमाव ऐकत नव्हता. याप्रकरणी बेगमपुरा पोलिसांनी उपनिरीक्षक विक्रमसिंग चौहान यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला. यात कलम १४१, १४३, १४५, १४७, १४९, ३४१, ३५३,भादंवी सह कलम १३५ मपोकासह कलम १२८/१७७ मोटार वाहन कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केले. पोलिस निरीक्षक प्रशांत पोतदार याप्रकरणी तपास करत आहेत.

पोलिसांकडून आयोजकांवर मात्र कारवाई नाही एमआयएमचे शहराध्यक्ष शारेक नक्षबंदी यांना आंदोलनाची परवानगी देताना काही अटी-शर्ती घालण्यात आल्या होत्या. एखाद्या आंदोलनात अटींचे उल्लंघन झाले तर आयोजकास जबाबदार धरले जाते. मात्र अडीच तास तणाव निर्माण करणाऱ्या या आंदोलनप्रकरणी आयोजकांवर कारवाई केली नाही. धिंगाणा घालणारे कार्यकर्ते एमआयएमच्याच एका पदाधिकाऱ्याने शहागंज, जिन्सीतून आणल्याचे शुक्रवारीच समोर आले. पोलिस त्याच्यावर काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले.

बातम्या आणखी आहेत...