आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएटीएम कार्डचे क्लोनिंग करून त्याद्वारे बँक ग्राहकांच्या खात्यातून लाखोंची रक्कम लंपास करणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात बीड पोलिसांच्या सायबर सेलला यश आले. याप्रकरणी बीड पोलिसांनी पाळत ठेवून सापळा रचून शिर्डीतून चार भामट्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून कार्ड क्लोन करण्यासाठीची उपकरणांसह ७ लाख १५ हजारांच्या मुद्देमाल जप्त केला आहे.
बीड येथील भीमराव पायाळ यांच्या एसबीआय बँकेच्या खात्यातून अज्ञात व्यक्तींनी ८० हजार रुपये परस्पर काढून ऑनलाइन फसवणूक केल्याचा गुन्हा शिवाजीनगर ठाण्यात दाखल झाला होता. सायबर सेलने केलेल्या तपासात भामट्यांनी सदरील रक्कम एटीएम कार्डचे क्लोनिंग करून मुंबईतील एटीएममधून काढल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी एटीएमचे सीसीटीव्ही फुटेज हस्तगत करून बीडमधील सर्व लॉजचे रेकॉर्ड तपासले. त्या वेळी एका लॉजमध्ये थांबलेल्या काही व्यक्तींचे सीसीटीव्ही फुटेजमधील चोरट्यांशी साम्य दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी त्यांचा पत्ता काढून त्यांच्यावर पाळत ठेवली. दरम्यान, हे भामटे शिर्डीला येणार असल्याची गुप्त माहिती बीड पोलिसांना मिळाली. त्याआधारे पोलिसांनी शिर्डीत सापळा रचून बिरू राजेंद्र पांडे, सतीशकुमार नंदलाल प्रसाद, मोहंमद असद नसीम खान आणि मोहंमद जावेद जब्बार खान (सर्व रा. बिहार) या चार चोरट्यांना ताब्यात घेतले. ही कामगिरी पोलिस अधीक्षक आर. राजा यांच्या मार्गदर्शनात सायबर ठाण्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र गायकवाड, पीएसआय निशिगंध खुळे, विजेंद्र नाचणे, पो.ना. अनिल डोंगरे, संतोष म्हेत्रे, शेख आसेफ आदींनी पार पाडली.
चार चोरट्यांकडे सापडले ७४ एटीएम कार्ड
पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या त्या चार चोरट्यांनी पोलिसी खाक्या दाखवताच गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून स्किनर (एटीएम कार्ड क्लोनिंग डिव्हाइस), ७४ एटीएम कार्ड, १० मोबाइल, चारचाकी वाहन असा एकूण ७ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.