आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायुरोपातील अनेक देशांना कोरोनाच्या चौथ्या लाटेचा फटका बसत आहे. ओमायक्रॉनच्या म्युटेशनचा हा परिणाम असल्याचे तज्ज्ञ सांगतात. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही सतर्कता बाळगली जात आहे. आरोग्य विभागाचे आयुक्त एन. रामास्वामी यांनी राज्यभरातील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. मेअखेर चौथी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात असून त्या दृष्टीने जास्तीत जास्त लसीकरण पूर्ण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. मराठवाड्यात कोरोनाचे रुग्ण व बळींची संख्या कमालीची घटत असली तरी लसीकरणाचे उद्दिष्ट मात्र पूर्ण झालेले नाही. त्यामुळे निर्बंध कायम आहेत. आरोग्य उपसंचालक डॉ. सुनीता गोलाईत यांनी सांगितले की, ‘आरोग्य आयुक्तांनी मेअखेर आणि जूनच्या सुरुवातीला चौथी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे यापुढेही हात धुणे, गर्दी टाळणे व मास्क वापरणे बंधनकारक आहे.
लसीकरण झालेल्या व्यक्तीला त्रास नाही
घाटीच्या अधिष्ठाता डॉ. वर्षा रोटे यांनी सांगितले की, इतर देशांत डेल्टा ओमायक्रॉनचे म्युटेशन वाढत आहे. मात्र ज्यांचे लसीकरण झालेले नाही त्यांनाच त्रास होताेय. ज्यांनी लस घेतली त्यांना तिसऱ्या लाटेतही कमी त्रास झाला. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी लसीकरण करून घेण्याची आवश्यकता आहे, संकटावर आपण मात करू शकू.
रुग्ण घटताच बेफिकिरी, गर्दीवर नियंत्रणच नाही
रुग्ण कमी झाल्यानंतर लोकांनी नियम पाळणे बंद केले आहे. गर्दीत लोक विनामास्क सर्रास फिरत आहेत. सभा, समारंभाला आता गर्दीचे बंधन राहिले नसल्याने खूप गर्दी होते, तिथेही क्वचितच लोक मास्क वापरताना दिसतात. अशा बेफिकिरीने वागल्यास आपण स्वत:हून संकट ओढवून घेऊ, अशी भीती तज्ज्ञांना वाटते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.