आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबादच्या सभेत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शरद पवार व राष्ट्रवादीवर केलेल्या टीकेला उत्तर देताना नाशकात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जीभ घसरली. राज सुपारी घेऊन भाषण करतात, असा प्रश्न एका कार्यकर्त्याने विचारल्यानंतर “लोकसभेला आपली सुपारी घेतली, आता तिकडची’ असे त्यांनी सांगून टाकले. मात्र, शब्दाचे गांभीर्य व समोरील कॅमेरे लक्षात घेत त्यांनी लगेच सारवासारव करत सुपारी म्हणजे, महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या सपाेर्टने ते बाेलत होते असे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे तर, लगेच अजितदादा म्हणाले, “सुपारी घेतली नव्हती. नाही तर लगेच ब्रेकिंग न्यूज, अजितदादा घसरले, जीभ घसरली तसे मी बाेललो नाही, माझे शब्द मागे घेताे’ असे सांगत पडदा टाकला. दरम्यान, या वेळी पवार यांनी राज यांची नक्कल करत रुमालाने तोंडही पुसून दाखवले. दरम्यान, संभाजी ब्रिगेड, आप, वंचित बहुजन आघाडी यांच्यासह इतर पक्षांनी राज यांच्यावर कारवाईची मागणी केली.
संभाजी ब्रिगेड, आप, वंचित यांच्यासह इतर पक्षांची कारवाईची मागणी
हे हिंदुत्व अजिबात नाही : संजय राऊत
“मनसेच्या भोंग्यांमागे कुणाची वीज आहे हे देशाला माहीत आहे. हे हिंदुत्व नाही,’ असे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले. माजी महापौर किशोर पेडणेकर यांनीही “तुम्ही मशिदींसमोर जाऊन हनुमान चालिसा लावा,' असे सांगितले.
सरकारने कारवाई करावी : आझमी
“समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी राज्य सरकारने राज ठाकरे यांच्यावर कारवाई करावी, अशी विनंती केली. आझमी म्हणाले, “शरद पवार यांच्या पायाखालच्या वाळूइतकी राज ठाकरेंची लायकी नाही.'
राज ठाकरे तर सुपारीबाज : पटोले
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज यांना सुपारीबाज म्हटले. “राज यांचे औरंगाबादचे कालचे भाषण त्याच पद्धतीच होते. राज जनतेच्या प्रश्नावर बोलतील अशी अपेक्षा होती. ती फोल ठरली,' असेही ते या वेळी म्हणाले.
राज्यात "नुरा कुस्ती’ : शेट्टी
राज्यात वीज, हमीभाव, पेट्रोल-डिझेलचे दर प्रचंड वाढले. महागाईत जनता होरपळून निघत आहे. एक प्रकारे ही नुरा कुस्ती असून जनतेचे लक्ष तिकडे जावे व मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष व्हावे, असे राजू शेट्टी म्हणाले.
टिळकांनी समिती स्थापली : आव्हाड
लोकमान्य टिळकांनी छत्रपती शिवरायांची समाधी बांधण्यासाठी समिती स्थापन केली होती, पैसेही जमा केले होते; पण त्यांनी जीर्णोद्धार केला नाही असे ट्वीट राष्ट्रवादीचे नेते व मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी करून खळबळ उडवून दिली.
भोंगेविरोधी मोहिमेत शिवसैनिक हवेत म्हणून शिवसेना टार्गेट नाही
मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधातील मोहिमेत एकटी मनसे पुरेशी पडणार नाही. त्यासाठी शिवसैनिकांची गरज पडणारच आहे. म्हणून शिवसेनेला टार्गेट केले नाही.
*जातीपातीविरहित हिंदुत्वावर भर का?
महाराष्ट्रातील जातीपातीच्या राजकारणावर शरद पवारांचे वर्चस्व आहे. त्यामुळे जातीपातीविरहित हिंदुत्वावर जेवढा अधिक भर दिला जाईल, तेवढे सर्व जातींचे हिंदू एकत्रितपणे मनसेकडे ओढले जातील, असा त्यांचा होरा आहे.
*छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख का?
छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊनच शिवसेनेची आतापर्यंत वाटचाल झाली. मात्र, राजकारणामुळे शिवसेना बदलली. आता मनसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणारा हिंदुत्ववादी पक्ष असल्याची प्रतिमा ते तयार करू पाहत आहेत.
*गर्दीचे मतदानात रूपांतर होणार का?
मशिदींवरील भोंगे, कट्टर हिंदुत्ववाद अशी लाट राज ठाकरे यांनी तयार केली आहे. ती आणखी काही महिने कायम राहिली आणि त्यातच महानगरपालिका, नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या तर काही प्रमाणात गर्दीचे रूपांतर मतदानात होऊ शकते. मनसेच्या जागा वाढू शकतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.