आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज औरंगाबादेत होणारी सभा ही स्वाभिमान सभा नसून स्वार्थी सभा आहे, अशी जोरदार टीका मनसेने केली आहे. तसेच, सभेआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याच पक्षाचे नेते अब्दुल सत्तार यांना आधी औरंगाबाद शहराचा उल्लेख संभाजीनगर असा करायला लावावा, असे आव्हानही औरंगाबाद मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांनी दिले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भोंग्याविरोधातील सभा, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या जलआक्रोश मोर्चाला उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज औरंगाबादेत 'स्वाभिमान' सभा होत आहे; मात्र या सभेला स्वार्थी सभा असे नाव देणेच उचित ठरले असते. ज्या लोकांनी सत्तेसाठी काँग्रेससोबत युती केली, त्यांनी स्वाभिमानाच्या गप्पा मारू नये, अशी टीका खांबेकर यांनी केली.
अब्दुल सत्तारांचे काय?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच शिवसेना नेते औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर असे झालेच असल्याचे म्हणत आहेत. मात्र, शिवसेनेचेच नेते अब्दुल सत्तार हे सातत्याने या शहराचा उल्लेख औरंगाबाद असाच करत असतात. त्यासाठी मला पक्षाने विशेष परवानगी दिल्याचेही ते सांगतात. त्यामुळे आजच्या सभेआधी मुख्यमंत्र्यांनी आधी आपलेच मंत्री अब्दुल सत्तार यांना या शहराचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यास भाग पाडावे, असे आव्हान खांबेकर यांनी दिले.
मतदार सेनेला जागा दाखवतील
शिवसेना ही संभाजीनगरवरून निव्वळ राजकारण करत आहे. आजच्या सभेतही या नामांतरावरून केवळ राजकारणच होणार आहे. नागरिकांना हे सर्व कळले आहे. त्यामुळे पुढील निवडणुकीत मतदारच शिवसेनेला आपली जागा दाखवू देतील, असे खांबेकर म्हणाले.
केंद्राला प्रस्ताव पाठवला आहे - पेडणेकर
मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी औरंगाबादेत दाखल झालेल्या शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी बाळासाहेब ठाकरे असतानाच औरंगाबादच्या नामांतराबाबत केंद्राला प्रस्ताव पाठवला आहे, असा दावा केला. तसचे, केंद्रच या प्रस्तावाला मंजुरी देत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. नामांतरावरून शिवसेनेवर टीका करण्यापुर्वी विरोधकांनी केंद्रालाच प्रस्ताव मंजूर करायला लावावा व मग शिवसेनेला बोलावे, असे पेडणेकर म्हणाल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.