आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शक्तिप्रदर्शन:शिवसेनाप्रमुखांसारखी गर्दी शिंदेंच्या सभेलाही जमवणार; पैठण दौऱ्यापूर्वी मंत्री संदीपान भुमरे यांचा दावा

औरंगाबाद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

२० जानेवारी १९९४ रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची पैठणला विक्रमी सभा झाली होती. तशी गर्दी १२ सप्टेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेला जमवण्याचे टार्गेट रोहयोमंत्री संदिपान भुमरे यांनी स्वीकारले आहे. कावसानकर स्टेडियममध्ये होणाऱ्या या सभेत मुख्यमंत्री दोन हजार कोटी रुपयांच्या घोषणा करणार आहेत. त्यामुळे त्यांचा जंगी सत्कार होणार आहे, अशी माहिती भुमरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बिडकीनमध्ये आदित्य ठाकरे यांनी २३ जुलैला सभा घेतली होती. या सभेला मोठी गर्दी झाली होती. त्याच सभेला शिंदे प्रत्युत्तर देणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी कधी कामच केले नाही. त्यामुळे त्यांचा सत्कार करण्याचा प्रश्नच आला नाही, असेही ते म्हणाले. या वेळी सहकारमंत्री अतुल सावे, आमदार संजय शिरसाट, आमदार रमेश बोरनारे, आमदार प्रदीप जैस्वाल, शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांची उपस्थिती होती. पत्रकार परिषद संपल्यानंतर कृषिमंत्री अब्दुल सत्तारदेखील या पत्रकार परिषदेला हजर झाले.

२००० कोटींचा निधी दिला

भुमरे म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी गेल्या एका महिन्यात पैठण विधानसभा मतदारसंघासाठी दोन हजार कोटींचा निधी दिला आहे. त्यामध्ये ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजना ८९० कोटींची सुप्रमा मंजूर केली आहे. या योजनेसाठी मी गेल्या दोन वर्षांपासून प्रयत्न करत होतो. मात्र, निधी मिळाला नव्हता. आता शिंदे यांनी मंजुरी दिली. पैठण तालुक्यासाठी ३८८ कोटी वॉटरग्रीड योजनेला मंजूर केले. त्यामुळे पैठण तालुक्यातील लोकांना जायकवाडीतून पाणी मिळेल. ३०० कोटी रुपये ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी, पैठण शहर वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी ४० कोटी मंजूर झाले आहेत. या वेळी आमदार संजय शिरसाटही उपस्थित होते. पण त्यांनी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देणे टाळले. त्यांचे मौन चर्चेचा विषय होते.

सत्तारांशी स्पर्धा नाही

अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड मतदारसंघात जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. त्यामुळे सत्तारांनंतर तुमचे शक्तिप्रदर्शन आहे का, या प्रश्नावर भुमरे म्हणाले की, आमचे शक्तिप्रदर्शन नाही. मुख्यमंत्री शिंदे यांना तालुक्यात आणायचे हे अगोदरच ठरले होते.

आदित्य यांनी दौऱ्यावर येऊन काय केले?

आदित्य ठाकरे यांच्या सभेला पैठण मतदारसंघात मोठी गर्दी झाली होती, असे निदर्शनास आणून दिले असता भुमरे म्हणाले की, मंत्री असताना अडीच वर्षांत ते कधी आले नाहीत.

आता येऊन तरी काय केले?

केवळ भाषणबाजीने काही होत नाही, असेही भुमरे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...