आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावैजापूर तालुक्यातील महालगाव येथे एका वाणिज्य दालनाच्या शुभारंभाला सुप्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात प्रेक्षक उभे असलेल्या पत्र्याचे शेड अतिभारामुळे कोसळून आठ ते दहा जण किरकोळ जखमी झाल्याची घटना सोमवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास घडली.
नृत्यांगना गौतमी पाटीलचे नृत्य ठेवण्यासाठी राज्यभरातून चढाओढ लागते. गौतमी पाटील सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. तिच्या नृत्याने सर्वांनाच वेड लावले आहे. अनेक कार्यक्रमासाठी गौतमीला लावणी सादर करण्यासाठी बोलवतात. तिचे मानधनही गब्बर असते. तिचा कार्यक्रम म्हटले की, टाळ्या आणि शिट्ट्यांची नुसती बरसात होते. त्याचप्रमाणे ती नेहमी वादातही असते.
दरम्यान, या प्रकरणात वीरगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शरद रोडगे यांनी अचानक गर्दी होऊन झालेला अपघात आहे. या घटनेत कोणीही गंभीरपणे जखमी झालेले नाही. त्यामुळे पोलिसांनी कोणावरही कारवाई केली नाही, असे त्यांनी सांगितले.
महालगावात बसस्थानक परिसरात सोमवारी रात्री एका खासगी दुकानाच्या उद्घाटनासाठी नृत्यांगना गौतमी पाटील हिला बोलावले होते. या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. त्यामुळे प्रेक्षक जागा मिळेल तेथे बसत होते. काही उत्साही प्रेक्षक एका दुकानावरील पत्र्याच्या शेडवर बसून नृत्याचा कार्यक्रम बघत होते. कार्यक्रम ऐन रंगात आला असताना या शेडवर बसणाऱ्यांची संख्या अचानक वाढली. त्यामुळे प्रेक्षकांच्या वजनाने हे शेड कोसळले.
यात आठ ते दहा जण जखमी झाल्याचे समजते. या वेळी एकच धांदल उडाली. या वेळी अनेक प्रेक्षकांनी येथून पळ काढला. त्यानंतर हा कार्यक्रम बंद करण्यात आला.
याआधीही घटना
गौतमीच्या कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर राडा होत असतो. गौतमीच्या कार्यक्रमात होणारी गर्दी आणि राड्याचा अनुभव पाहता सुरुवातीला गौतमी येण्याचे मेसेज व्हायरल झाल्यानंतर आयोजकांच्या वतीने शेवटच्या क्षणापर्यंत गोपनीयता पाळण्यात येते. गौतमीच्या कार्यक्रमादरम्यान प्रेक्षकांमध्ये गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वी देखील गौतमीच्या कार्यक्रमात काही लोक जखमी झाल्याची घटना घडली होती.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.