आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात गुरुवारी सकाळी चाळीसगाव रस्त्यावरील फर्निचरच्या दुकानासमोर आढळलेला बॉम्ब निकामी करत असताना त्याचा स्फोट झाला. या स्फोटामुळे दीड किलोमीटरपर्यंतचा परिसर हादरला. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही.
चाळीसगाव रोडवरील किरण राजगुरू सकाळी ९ वाजेच्या सुमारास फर्निचरचे दुकान उघडण्यासाठी गेले असता दुकानाबाहेरील बाकड्यावर त्यांना मोबाइलचा बॉक्स आढळला. त्यांनी तो उघडून बघितला असता त्यात बॉम्बसदृश वस्तू असल्याचा संशय त्यांना आला. त्यांनी तत्काळ त्यांचे बंधू पत्रकार किशोर राजगुरू यांच्यामार्फत पोलिसांना माहिती दिली. शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजीव तळेकर यांनी पाहणी करून नागरिकांना फिरण्यास मज्जाव करून परिसर सील केला. बारा वाजेच्या सुमारास बॉम्बशोधक व नाशक पथकासह श्वान पथक दाखल झाले. या वेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूस नागरिकांची गर्दी जमली होती. पोलिसांनी परिसरातील आजूबाजूची दुकाने बंद केली. बॉम्बशोधक पथकाच्या पाहणीत तो बॉम्बच असल्याचे निष्पन्न झाले. दुकानाच्या मागील बाजूस पूर्वी असलेल्या उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या आवारात बॉम्ब नेण्यात आला. त्याची वाळूद्वारे तीव्रता कमी करून तो निकामी करत असताना बॉम्बचा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज सुमारे दीड किलोमीटरपर्यंत ऐकू आला. ग्रामीणचे पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी दुपारी घटनास्थळी भेट दिली.
प्रयोगशाळेत बॉम्बचे अवशेष पाठवले
प्रयोगशाळेत बॉम्बचे अवशेष पाठवण्यात आले आहेत. लवकरच प्रकरणाचा छडा लागेल. सुरक्षेच्या दृष्टीने शहरातील विविध भागांत पॉइंट शोधून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. सर्व शहर सीसीटीव्हीच्या निगराणीखाली राहील.
- मनीष कलवानिया, पोलिस अधीक्षक.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.