आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मराठवाडा विभागात कोविड लसीकरणाची तयारी पूर्ण करण्यात आली असून आरोग्य विभागाकडे उणे १५ ते उणे २५ डिग्री तापमानापर्यंत १.३२ कोटी डोसेज लस साठवण्याची क्षमता तयार करण्यात आली आहे. या शिवाय ६९१ डिफ्रिजरची व्यवस्थाही करण्यात आली आहे. आता पुढील काही दिवसांतच लसीकरणाचे काम सुरु केले जाणार असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
मराठवाड्यात महसुल प्रशासनासोबतच आरोग्य विभागाकडून कोविड लसीकरणाबाबत वेळोवेळी आढावा घेतला जात आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात कोविड लसीकरण तसेच लस साठवण्यासाठी काय व्यवस्था करण्यात आली तसेच कोविड लस वाहून नेण्यासाठी उपलब्ध असलेली वाहने व यंत्रणा याची माहिती घेतली जात आहे. ज्या ठिकाणी यंत्रणेला आवश्यक असेल तेथे वाढीव उपाय योजना करण्याच्या सूचनाही दिल्या जात आहेत.
दरम्यान, मराठवाड्यात आरोग्य यंत्रणेकडे ५६० ठिकाणी लसीकरणाची व्यवस्था आहे. त्यासोबतच दोन ते आठ तापमानापर्यंत लस साठवण्यासाठी ६२९ रेफ्रिजरेटरची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी ८५.६६ लाख डोसेस लस साठविण्याची क्षमता आहे. यासोबतच ६९१ डिफ्रिजर असून यामध्ये उणे १५ ते उणे २५ डिग्री तापमानावर १.३२ कोटी डोसेज लस साठवण्याची क्षमता आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात ११.२५ लाख डोसेज, जालना ९.९० लाख, परभणी ६.०७ लाख, हिंगोली ४.१६ लाख, नांदेड ३५.२७ लाख, बीड २३ लाख, लातूर २४.११ लाख, उस्मानाबाद जिल्ह्यात १८.५० लाख डोसेज साठवण्याची क्षमता आहे. या ठिकाणी आवश्यक विज पुरवठा होण्यासाठी ९३५ व्होल्टेज स्टॅबलायझर उपलब्ध करण्यात आल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले. या संदर्भातील माहिती देखील आरोग्य उपसंचालक कार्यालयाने आवश्यक साहित्याच्या उपलब्धतेची माहिती मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना एका पत्राद्वारे दिल्याचे सुत्रांनी सांगितले.
दरम्यान, पुढील काही दिवसांतच मराठवाड्यातून कोविड लसीकरण केले जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. यासंदर्भात नियोजनासाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग व जिल्हा परिषदेकडून वारंवार बैठकाही घेतल्या जात असल्याचे सांगण्यात आले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.