आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चक्रीवादळ:‘ताैक्ते’ चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनाऱ्याजवळून कच्छच्या दिशेने, 5 जिल्ह्यांसाठी ऑरेंज, 16 जिल्ह्यांना यलो अलर्ट

औरंगाबाद / अजय कुलकर्णीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
तिरुवनंतपुरममध्ये शुक्रवारी सोसाट्याचे वारे वाहत हाेते - Divya Marathi
तिरुवनंतपुरममध्ये शुक्रवारी सोसाट्याचे वारे वाहत हाेते
  • मान्सून एक दिवस आधीच 31 मे रोजी केरळात : आयएमडी

दक्षिण अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र आता तीव्र कमी दाबाचे बनले असून १६ मे रोजी त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) वर्तवली आहे. हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनाऱ्याजवळून गुजरात-कच्छच्या दिशेने जाईल, असा अंदाज शुक्रवारी आयएमडीने वर्तवला आहे. परिणामी राज्यातील दक्षिण कोकण, दक्षिण महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर किनारा या भागात १५ मे ते १७ मे या काळात मुसळधार पावसाची शक्यता आहे. कुलाबा वेधशाळेने या काळासाठी राज्यातील पाच जिल्ह्यांसाठी सतर्कतेचा ऑरेंज अलर्ट तर १६ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. आयएमडीच्या अहवालानुसार, दक्षिण अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होऊन त्याचे १५ ते १६ मे या काळात चक्रीवादळात रूपांतर होईल. तर १७ मे रोजी वाऱ्याचा वेग वाढून हे चक्रीवादळ विध्वंसक होईल आणि १८ मे रोजी ते गुजरातच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. या वेळी वाऱ्याचा वेग ताशी १५० ते १६० किमी राहील. प्रसंगी तो ताशी १७५ किमीपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. परिणामी हे चक्रीवादळ दि. १५ ते १६ मे या काळात महाराष्ट्राच्या किनाऱ्याजवळून मार्गक्रमण करणार असून त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

मान्सून एक दिवस आधीच 31 मे रोजी केरळात : आयएमडी
नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून यंदा निर्धारित वेळेच्या एक दिवस आधीच म्हणजे ३१ मे रोजी केरळात दाखल होईल असे आयएमडीने शुक्रवारी जाहीर केले. साधारणपणे एक जून रोजी मान्सून केरळात दाखल होत असतो. यंदा त्याचे आगमन ३१ मे रोजी होईल, यात चार ते पाच दिवस मागे-पुढे होऊ शकते असे आयएमडीने म्हटले आहे. सध्या अरबी समुद्रात चक्रीवादळाची शक्यता आहे. त्यामुळे मान्सूनचे प्रवाह बंगालच्या उपसागरात सक्रिय होण्यास मदत होऊन मान्सून २१ मे रोजी अंदमान समुद्रात दाखल होण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे. यंदा देशभर मान्सून सरासरीइतका होईल असे यापूर्वीच आयएमडीने सांगितले आहे.

१५ ते १७ मे या काळासाठी सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट
कुलाबा वेधशाळेने चक्रीवादळाची शक्यता लक्षात घेऊन दि. १५ ते १७ मे या काळासाठी राज्यातील पाच जिल्ह्यांना ऑरंेज तर १६ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
ऑरेंज अलर्ट : सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी जारी. या काळात ६४.५ ते २०४.४ मिमी पावसाची, ताशी १०५ ते १४५ किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता.
यलो अलर्ट : विदर्भातील सर्व ११ जिल्हे, पुणे, रायगड, ठाणे, मुंबई, पालघर या जिल्ह्यांसाठी जारी. या काळात २.५ ते ६४.४ मिमी पावसाची, ताशी ८० ते १०५ किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता.
इतर जिल्ह्यांत २.५ मिमी ते १५.५ मिमी पावसाची, ताशी ८० किमीपर्यंत वारे वाहण्याची शक्यता.

ताैक्ते म्हणजे सुरेल आवाजाचा सरडा
या संभाव्य चक्रीवादळाचे ताैक्ते हे नाव म्यानमारने दिले आहे. म्यानमारमध्ये आढळणाऱ्या व सुरेल आवाज काढणाऱ्या ताैक्ते या सरड्याच्या प्रजातीवरून हे नाव देण्यात आले आहे. तौक्ते वादळाचा वेग ताशी १७५ किमीपर्यंत राहण्याची शक्यता आहे. दि. १८ मे रोजी हे वादळ गुजरातच्या किनाऱ्यावरील सौराष्ट्राच्या भागात धडकण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रातील हे यंदाचे पहिले चक्रीवादळ ठरणार आहे.

बातम्या आणखी आहेत...