आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यातील चित्र:अतिवृष्टीने 15 लाख हेक्टरचे नुकसान, पंचनामे केवळ चार लाख हेक्टरचेच

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सप्टेंबरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे मराठवाड्यातील २० लाख २२ हजार ९३ शेतकऱ्यांच्या १४ लाख ६९ हजार हेक्टर शेतीचे नुकसान झाल्याचा महसूल प्रशासनाचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र त्यापैकी केवळ २८ टक्केच म्हणजे ४ लाख १९ हजार हेक्टरचे पंचनामे करणे प्रशासनाला शक्य झाले आहे. यात सर्वात कमी १४ टक्केच पंचनामे परभणी जिल्ह्यात झाले आहेत.

यंदा कापूस, सोयाबीन, मुग, तुर या पिकांसह फळबागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अजूनही काही शेतांमध्ये साचलेल्या पाण्याचा उपसा झालेला नाही, त्यामुळे पिके सडून जात आहेत. अतिवृष्टी, पुरामुळे अनेक ठिकाणी पाणंद रस्तेच वाहून गेले आहेत, त्यामुळे नुकसानग्रस्त शेतीपर्यंत पाेहाेचणे शक्य हाेत नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका औरंगाबाद, परभणी, बीड, नांदेड जिल्ह्याला बसला. उस्मानाबाद व हिंगाेली जिल्ह्यात मात्र सर्वात कमी नुकसान झाले असून तेथील पंचनामे शंभर टक्के झाले आहेत. सर्वाधिक नुकसान झालेल्या बीड जिल्ह्यात ७ लाख ३७,२२५, नांदेड जिल्ह्यात ४ लाख ५१ हजार ५८८, परभणी जिल्ह्यात २ लाख २२ हजार ७९४ तर औरंगाबाद जिल्ह्यात ३ लाख २६ हजार ९३५, जालना जिल्ह्यात २ लाख ६१ हजार ९२८ शेतकऱ्यांना नुकसानीचा फटका बसला आहे.

सर्वांना भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न
ग्रामीण भागातील ओढ्यावरील पूल, पाणंद रस्तेच वाहून गेलेत. त्यामुळे तलाठ्यांना पंचनामे करण्यास तिथपर्यंत पोहोचणे अवघड झाले आहे. मात्र तरीही शेतकऱ्यांना भरपाई मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तलाठी संघटनेच्या पातळीवरदेखील आम्ही प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती औरंगाबादच्या तलाठी संघटनेचे अध्यक्ष अनिल सूर्यवंशी यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...