आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नुकसान:जीवनावश्यक पण शेतीबाजार ‘डाऊन’, कोट्यवधींच्या नुकसानीची लागण; टरबुजांची मातीमोल भावाने विक्री

Aurangabad3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • जळगावची केळी, नाशिकचे द्राक्ष आणि अमरावतीच्या टरबुजांची मातीमोल भावाने विक्री

उद्योग जगताला लॉकडाऊनचा थेट फटका बसला असताना शेतीमालही यातून सुटलेला नाही. खरं तर जीवनावश्यक घटक म्हणून शेतीमालाच्या वाहतुकीस आणि व्यापारास लॉकडाऊनचा फटका बसल्याचे पुढे येत आहे. मोठी गुंतवणूक असलेल्या द्राक्षांच्या निर्यातीस याचा मोठा फटका बसला आहे, द्राक्षाच्या हार्वेस्टिंगला संचारबंदीचा फटका बसला आहे, शेतात पडलेल्या गव्हाच्या कापणीला मजूर मिळत नाहीत, कमी भावाने केळीची कापणी सुरू आहे, तर २० रुपयांची टरबुजे ४ रुपयांवर गडगडली आहेत. नेहमीच संकटांच्या हिंदोळ्यांवर गटांगळ्या घालणारी शेती यावेळी कोरोनाच्या संकटाने बेजार आहे. राज्यातील शेतीच्या नुकसानीचा आकडा अंदाजे हजार कोटींच्या पुढे जात असला तरी कृषी खात्याकडे शेतीला आणि शेतकऱ्याला सावरणारी कोणतीही वेगळी योजना नाही.

बाजार समित्यांत येणाऱ्या शेतीमालाची आवक घटली

जीवनावश्यक माल म्हणून भाजीपाल्याला संचारबंदीतून वगळण्यात आले असले तरी देशभरातील सर्व बाजार समित्यांमध्ये येणाऱ्या शेतीमालात निम्म्याने घट झाली आहे. गेल्या वर्षीच्या मार्च महिन्याच्या तुलनेत यंदाच्या मालाची आवक मोठ्या प्रमाणात खालावली आहे. गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यात देशातील सर्व घाऊक बाजारांमध्ये ६८ लाख २७ हजार क्विंटल कांद्याची आ‌वक झाली होती. यंदा यात २० लाख क्विंटल कांद्याची घट झाली आहे. लसणाच्या बाजारात गेल्यावर्षीच्या मार्चमध्ये ७ लाख २३ हजार क्विंटलची आवक होती, यंदा फक्त १ लाख ७८ हजार क्विंटल लसूण मार्चमध्ये विक्रीस आला. तीच गत बटाट्यासारख्या टिकाऊ आणि टोमॅटोसारख्या नाशिवंत पिकाबाबतही दिसते. गेल्या मार्चमध्ये देशातील बाजारपेठेत ४४ लाख क्विंटल बटाटे आले होते, यंदा हे प्रमाण अवघे १९ लाख क्विंटलवर घसरले आहे. गेल्या वर्षी या दिवसात ७ लाख ७९ हजार क्विंटल टोमॅटो बाजारात आला, यंदा त्यात ३ लाख क्विंटल टोमॅटोची घट झाली आहे.

केळीला १०० कोटींचा फटका

केळीच्या वाहतुकीवर व निर्यातीवर निर्बंध नसतानाही व्यापाऱ्यांकडून केळीची मागणी नसल्याचे कारण पुढे केले जात आहे. क्विंटलमागे ७०० ते ८०० रुपये कमी भाव देऊन कापणी सुरू आहे. परिणामी  उत्पादकांची लूट सुरू आहे.  रावेर मुक्ताईनगर व यावल तालुक्यातून सुमारे १७५ ट्रक दररोज केळीची निर्यात होते. मात्र सध्या दिवसाकाठी केळीच्या तोट्याचा आकडा सुमारे पावणे तीन कोटी रुपयांपर्यंत आहे. गेल्या  महिनाभरातील केळीउत्पादकांंचे नुकसान १०० कोटींच्या घरात गेलेे.  दुसरीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर केळीची मागणी व किमती टिकून आहेत. मात्र, निर्यातीसही खीळ बसली आहे.  मार्चमध्ये तालुक्यातून १०० तर एप्रिल मध्ये २०० कंटेनर केळी मजुरांअभावी निर्यात होऊ शकली नाही.

टरबुजांचेही सुकले बाग, पडले भाव

उन्हाळ्यात तेजीत असलेल्या टरबुजांच्या बाजारास कोरोनाचा फटका बसला आहे. अमरावतीतील शेतकऱ्यांना १८ रुपये किलोची टरबुजे ४ रुपये किलोने विकाली लागत आहेत. अनेकांच्या टरबुजांना हात लावण्यासही व्यापारी तयार नाहीत. परिणामी रोपांचे ६० हजार रुपयेही निघत नाहीत. बाकीचा खर्च आणि शेतकऱ्याचा मेहनताना निघणे दूर. चांदूर बाजार, अचलपूर, अंजनगाव सुर्जी तालुक्यात हीच परिस्थिती आहे. गेल्यावर्षी बांधावर पंधरा ते अठरा रुपये भाव मिळालेल्या टरबुजांना यंदा कुणी उचलत नाही. सिंचनाची उपलब्ध झालेली सुविधा व पारंपरिक पिकांच्या उत्पादनात झालेली घट यामुळे या परिसरात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात टरबुजात गुंतवणूक केली होती. आठ रुपयांचे आश्वासन देणारे व्यापारी नंतर फिरकलेही नसल्याचे येथील शेतकरी सांगतात. एकट्या मोहोडांच्या शेतात वीस टन माल पडून आहे. असे प्रत्येक गावात शेतकरी अडचणीत आहेत. 

८० रुपयांची द्राक्ष २० रुपयांवर : नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांना ६०० कोटींचा फटका बसल्याचा अंदाज आहे. निर्यातीच्या द्राक्षांसाठी मोठी गुंतवणूक केली असताना ऐन मोसमातच हा फटका बसल्याने द्राक्ष शेती संकटात आहे. परिणामी गेल्या वर्षी ८ एप्रिलपर्यंत १ लाख १२ हजार मेट्रीक टन द्राक्ष निर्यात झाली असताना, यंदा हे प्रमाण ८४ हजारावरच अडकले. जिल्ह्यातील २ कोटी ७५ लाख किलो निर्यातक्षम द्राक्षांना फटका बसला असून नुकसानीचा हा आकडा १३७ कोटी ५० लाखांवर गेला असल्याचे द्राक्ष बागायतदार संघाचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी नाशिक जिल्ह्यातून ८ हजार ३१७ कंटेनर द्राक्ष निर्यात झाली होती. 

पोल्ट्री व दुग्ध व्यवसाय सावरण्यास केंद्राकडून मदत मागितली आहे 

लॉकडाऊनचा मोठा परिणाम शेतीमालाच्या बाजारपेठेवर झाला आहे. त्यातही फळांचे मोठे नुकसान होत आहे. या परिस्थितीत आम्ही शेतकऱ्यांकडून थेट ग्राहकांपर्यंत माल पोहोचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. पहिल्या टप्प्यात शेतीमालाच्या वाहतुकीस येणारे अडथळे आम्ही काढले. केंद्रीय कृषिमंत्र्यांसोबत बुधवारी सर्व राज्यांतील कृषी मंंत्र्यांची व्हीसी झाली. त्यात आपण केंद्राकडे प्रलंबित निधी लवकर मिळावा, दूध व पोल्ट्री व्यावसायिकांसाठी मदत मिळावी अशी मागणी केली आहे. बराच शेतीमाल शेतात पडून आहे. त्यास बाजारपेठ मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.
- दादा भुसे, कृषिमंत्री

बातम्या आणखी आहेत...