आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउस्मानपुऱ्यातील मीनाताई ठाकरे सभागृह रविवारी (१४ मे) हारफुलांनी सजले होते. मोठ्या आवाजात संगीत सुरू होते. जवळपास ४०० पेक्षा जास्त वऱ्हाडी मंडळी आली होती. स्वयंपाक पूर्ण व्हायला आला होता. नटलेला वर मोठ्या आनंदात मंचावर दाखल झाला. परंतु त्याच्या आनंदावर काही क्षणांत पाणी फेरले गेले. वधूने मंचावर पाय ठेवताच दबा धरून बसलेल्या दामिनी पथकाने सभागृहात धाव घेतली. त्यांना पाहून मुलीने अंगावरील दागिने, हार काढले. पथकाने कुटुंबाचे समुपदेशन करत हा बालविवाह थांबवला.
१६ वर्षीय रागिणीने (नाव काल्पनिक आहे) नुकतीच दहावीची परीक्षा दिली. तिचे वडील सुरक्षा रक्षकाचे काम करतात. ते व्यसनाच्या आहारी गेल्याने घरात सतत वाद सुरू असतात. रागिणीशिवाय लहान बहीण व भावाची जबाबदारी एकट्या आईवरच येऊन पडली. अशा परिस्थितीत एका नातेवाइकाने तिचे लग्न लावून देण्याचा सल्ला दिला. गेवराई तालुक्यातील एका तीस वर्षांच्या पुरुषाचे स्थळ तिच्यासाठी आणले. पुण्याला एका खासगी कंपनीत काम करत असल्याचे सांगून त्यांनी परस्पर तिचे लग्न ठरवले.
चाइल्डलाइनची मदत : गेवराईवरून वऱ्हाडी दाखल झाले. मात्र, सकाळी ९.३० वाजता दामिनी पथकाला या लग्नाविषयी माहिती मिळाली. हेड कॉन्स्टेबल लता जाधव, निर्मला निंभोरे, हिरा चिंचोळकर यांनी साध्या वेशात सभागृह गाठले. लग्नाची तयारी सुरू होती. परंतु वधू नसल्याने वयाची खात्री होत नव्हती. त्यामुळे पाेलिसांनी चाइल्ड हेल्पलाइनच्या केंद्र समन्वयक अन्नपूर्णा ढोरे यांची मदत घेतली. दरम्यान, मुलीसह कुटुंबाला सोमवारी बालकल्याण समितीसमोर हजर केले जाईल. लग्नासाठी मुलाचे कुटुंबीय मुलीच्या पालकांना दीड लाख रुपये देणार होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली. मात्र, त्याचे पुरावे मिळाले नाहीत.
आधी उडवाउडवीची उत्तरे, नंतर कुटुंब म्हणाले साखरपुडा करतोय
बारा वाजेच्या सुमारास पथक सभागृहात गेले. तेव्हा चौघे स्वयंपाक करत होते. नवरदेव हॉलमध्ये होता. अडीच वाजता नटलेली नवरी मुलगी आली व पोलिसांनी हस्तक्षेप करत कार्यक्रम थांबवले. कागदपत्रे मागवली. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या कुटुंबाने नंतर चूक कबूल केली. आम्ही केवळ साखरपुडा करतोय, असा दावाही त्यांनी केला. पोलिसांनी त्यांना कायदा समजावून सांगत नोटीस दिली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.