आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दामुअण्णा शिंदे यांची पाचवी राजकीय कोलांटउडी:भाजपमधील निष्ठावंत हादरले; शिवसेनेतून भाजपमध्ये दाखल

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

माजी नगरसेवक दामुअण्णा शिंदे यांनी पाचव्यांदा मारलेल्या राजकीय कोलांटउडीमुळे भाजपमधील निष्ठावंत चांगले हादरले आहेत. नुकतेच शिवसेनेतून भाजपमध्ये दाखल झालेल्या ठाकरेनगर येथील नगरसेवक दामोधर उपाख्य दामुअण्णा शिंदे यांनी आपल्या राजकीय जीवनात पाचव्यांदा पक्ष बदलला. शिंदे कुठल्याही पक्षात गेले अथवा अपक्ष जरी मनपा निवडणुकीत उतरले तरी विजय हमखास मिळवतात अशी त्यांची ख्याती आहे.

दामुअण्णा शिंदेंना 2015 च्या मनपा निवडणुकीत भाजपने उमेदवारी नाकारली तरी पत्नी सत्यभाम शिंदे यांना निवडूण आणण्यात त्यांना यश मिळाले होते. आता पुन्हा भाजप प्रवेशामुळे निष्ठावंत घाबरलेल्या अवस्थेत आहेत.

दामोधर शिंदे यांनी 2005 मध्ये महापालिका निवडणुकीच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. शिवसेनेच्या तिकिटावर जयभवानीनगर एस. टी. कॉलनी येथून प्रथम निवडूण आले. त्यांनी राजकीय स्थितीचा अंदाज घेतला आणि 2010 पूर्वीच कॉग्रेसमध्ये प्रवेश केला. तत्कालिन मंत्री राजेंद्र दर्डा यांच्यामुळे त्यांनी कॉग्रेसमध्ये प्रवेश केला.

2010 च्या महापालिका निवडणुकीत प्रभाग महिलांसाठी राखीव असल्याने पत्नी सत्यभामा यांना कॉग्रेसच्या तिकीटावर निवडून आणले. कॉग्रेस राष्ट्रवादी राज्यात सत्तेवर होती. महापालिकेच्या 2015 मध्ये निवडणुका जवळ येताच त्यांना राज्यातील सत्ता परिवर्तनाचा अंदाज आला. लोकसभेच्या 2014 च्या निवडणुकीत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंच्या मार्फत त्यांनी कॉग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपचा प्रचार केला.

मनपाच्या 2015 मधील निवडणुकीत बदनापूरचे आ. नारायण कुचे यांनी ठाकरेनगर प्रभागातून भाजपची उमेदवारी मीरा चव्हाण यांना दिल्याने शिंदे यांनी पत्नी सत्यभामा यांना अपक्ष उभे करून निवडूण आणले. मनपाचा कार्यकाळ संपण्यापूर्वी शिंदे यांनी शिवसेना जवळ केली. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर 2020 ची मनपाची सार्वत्रिक निवडणूक झालीच नाही. शिवसेना फुटल्यानंतर शिंदेसेनेत जाण्याऐवजी त्यांनी पुन्हा सहकार मंत्री अतुल सावे मार्फत भाजपमध्ये कोलांटउडी मारली.

निष्ठावंतांवर अन्याय नको

दामोधर शिंदे दुसऱ्यांदा भाजपमध्ये येत आहेत. पक्षाने आपली शक्ती वाढविण्यासाठी कुणालाही पक्षात घ्यावे परंतु निष्ठावंतांवर अन्याय करू नये अशी भावना भाजपचे ज्येष्ठ निष्ठावंत कार्यकर्ते मुकुंद दामोधरे यांनी व्यक्त केली. 2005 मध्ये भाजप शिवसेना युती असताना आपण शिंदे यांच्या विजयासाठी जीवाचे राण केले होते असेही दामोधरे यांनी सांगितले.

जनतेसाठी नेहमीच तत्पर

आपण जनतेच्या कामात तत्पर असल्यामुळे कितीही प्रभाग, पक्ष बदलले तरी निवडूण येतो. अपक्ष म्हणूनही 2015 मध्ये पत्नीला निवडूण आणले होते. आता मात्र भाजपमध्येच राहणार आहे. प्रभाग ३२ ठाकरेनगर येथून निवडूण लढविण्याची इच्छा आहे. भाजप आपल्या इच्छेचा विचार करेल. प्रभागातील नागरिकांनी रात्री 2 वाजता फोन केला तरी आपण तयार असतो आणि हेच आपल्या यशाचे गमक आहे.- दामोधर शिंदे माजी नगरसेवक.

बातम्या आणखी आहेत...