आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मास्क हीच खरी लस:लाेक मास्क वापरत नाहीत हे घातक; नियम पाळले नाही तर कडक निर्बंध : उपमुख्यमंत्री, आराेग्यमंत्र्यांचा निर्वाणीचा इशारा

औरंगाबाद9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
फुलंब्री येथील अजित पवारांच्या सभेत अनेक नागरिक विनामास्क उपस्थित होते. - Divya Marathi
फुलंब्री येथील अजित पवारांच्या सभेत अनेक नागरिक विनामास्क उपस्थित होते.
  • मुख्यमंत्र्यांशी बोलून कठोर निर्णय घ्यावे लागणार; अजित पवारांचा इशारा

कोरोना संसर्गाच्या बाबतीत गंभीरता राहिलेली नाही. लोक मास्क घालत नाहीत. लग्न समारंभ, राजकीय सभांमध्ये नियमांचे पालन केले जात नाही. लोकांनी शिस्त पाळायलाच हवी; अन्यथा दुबई, युरोपप्रमाणे पुन्हा कडक निर्बंधांच्या परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील नागरिकांना निर्वाणीचा इशारा दिला. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांच्या वार्षिक योजना आराखड्यासाठी विभागवार बैठक सोमवारी विभागीय आयुक्तालयात पार पडली. या वेळी हिंगोली जिल्ह्याचा अपवाद वगळता सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री उपस्थित होते. या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री पवार आणि आरोग्यमंत्री टोपे यांची स्वतंत्र पत्रकार परिषद झाली, परंतु राज्यातील काही शहरांमध्ये कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने उभय मंत्र्यांनी एकाच सुरात नागरिकांच्या बेफिकिरीवर कडक शब्दांत मत मांडले. या वेळी शिवजयंतीच्या मुद््द्यावर भावनिक राजकारण करू नये, असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले. बंधने कुठेच आणता कामा नये, मात्र नागरिकांचा जीव वाचवणे आणि कोरोना वाढू नये हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे, असे अजित पवार म्हणाले.

राजकीय पक्षांना एकत्र बसवून सांगू : पाश्चिमात्य देशांत ब्रिटन, दुबईत लॉकडाऊन सुरू झाले असून अन्य देशांतही तिसरे लॉकडाऊन करावे लागत आहे. जनतेला त्रास होऊ नये यासाठी सर्व खुले केले आहे. परंतु नियंत्रण न केल्यास लॉकडाऊनच्या परिस्थितीला सामोरे जावे लागते, असे टोपे म्हणाले. राजकीय सभांना होणारी गर्दी पाहता राजकीय पक्षांना एकत्र बसवून सांगावे लागेल. याबाबत मुंबईला गेल्यावर मुख्यमंत्र्यांशी बोलून निर्णय घेतला जाईल, असे पवार म्हणाले.

कोरोनाबाबत लोकांना गंभीरता राहिलेली नाही : अजित पवार
कोरोनाच्या बाबतीत लोकांना गंभीरताच राहिलेली नाही. गेल्या तीन आठवड्यंातले राज्यातले आकडे पाहिले तर कोरोना वाढत असल्याचे लक्षात येत आहे. मात्र लोक मास्क घालत नाहीत हे लक्षात आले आहे. आपल्याला त्याची किंमत मोजावी लागणार आहे. त्यामुळे मुंबईला गेल्यावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून याबाबत कठोर निर्णय घ्यावे लागतील. नागरिकांनी त्याची मानसिकता तयारी ठेवावी, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. मी सकाळी फुलंब्रीला गेल्यानंतर पाहिले कुणीही ग्रामस्थ मास्क घालत नाही. हे घातक आहे. या वेळी त्यांनी नाशिक, वर्धा, नागपूर, औरंगाबाद, अकोला, अमरावती या जिल्ह्यांत रुग्ण गेल्या तीन आठवड्यांपासून कसे वाढत आहेत याची आकडेवारीच पत्रकारांसमोर मांडली. ते म्हणाले, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि आमदार - खासदारानांही याचे गांभीर्य सांगितले आहे. जगात अमेरिका-युरोपमध्ये दुसरी लाट आल्यानंतर लॉकडाऊन करावे लागले याची आठवण या वेळी अजित पवारांनी करून दिली.

ट्रेसिंग, टेस्टिंगमध्ये हलगर्जीपणा केल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई : टोपे
राज्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून हा आकडा चार हजारांपर्यंत गेला आहे. केंद्र शासनाचे पथक आले तेव्हा त्यांनी ३ टी धोरण पाळले गेले पाहिजे हे सांगितले होते. एका केसमागे पंधरा लोकांच्या तपासण्या केल्या पाहिजेत. मात्र एक वर्ष झाले म्हणून आळस करून चालणार नाही. त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. रुग्ण वाढत असताना ट्रेसिंग, टेस्टिंग न केल्यास आणि हलगर्जीपणा आहे असे लक्षात आल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येणार, असा इशारा टोपे यांनी दिला आहे.

अमरावतीत कोरोनाचा कहर; ४४९ नवे रुग्ण
अमरावती | जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा कहर केला असून सोमवारी एका दिवसात ४४९ नवे रुग्ण आढळले. गेल्या आठवडाभरापासून अमरावती जिल्ह्यात दररोज कोरोनाबाधितांची संख्या तीनशेपेक्षा अधिक आहे. सोमवारची संख्या ही गेल्या तीन महिन्यांतील उच्चांक आहे. गेल्या २४ तासांत चौघांचा मृत्यू झाला आहे.