आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रत्येक पक्षाला निवडणुकासाठी त्यांची तयारी करण्याचा अधिकार आहे. मात्र, औरंगाबाद लोकसभा लढण्यासाठी भाजपकडे तगडा उमेदवारच नाही. हा केवळ दंड फुगवून बेडकी आणण्याचा प्रयत्न आहे. कार्यकर्त्यांच्या उत्साहासाठी स्थानिक नेत्यांच्या घोषणा आहेत. त्या पलिकडे काहीही नाही, असे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितले. विलासराव देशमुख, राजेंद्र दर्डा, नारायण राणे उद्योगमंत्री असल्यापासून औद्योगिक वापरासाठी राखीव भूखंडांचे निवासी-व्यावसायिक भूखंडात रूपांतर करण्याचा उद्योग सुरू असल्याचेही ते म्हणाले.
नुकतेच विधिमंडळाचे अधिवेशन झाले. त्यात आपण काय कामगिरी बजावली याची माहिती देण्यासाठी दानवे यांनी सोमवारी (२ जानेवारी) पत्रकार परिषद घेतली. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचे गैरव्यवहार तसेच विधी विद्यापीठ आदींचे प्रश्न उपस्थित केल्याचे त्यांनी सांगितले. इम्तियाज जलील यांनी सुभाष देसाईंवर भूखंड घोटाळ्याचे आरोप केले. त्याविषयी दानवे यांनी देसाईंची पाठराखण केली. जे उद्योग चालत नव्हते त्यांच्या जागा व्यावसायिक वापरासाठी देणे अनेक वर्षांपासून सुरू आहे. यापूर्वीच्या उद्योगमंत्र्यांनी असेच केले होते, असे दानवे म्हणाले. प्रोझोन माॅलची जागा आधी कशासाठी वापरली जात होती, असा सवालही त्यांनी केला. या वेळी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे कट्टर समर्थक माजी महापौर नंदकुमार घोडेले तसेच राजू वैद्य, बाळासाहेब थोरात, विश्वनाथ स्वामी, विजय वाघचौरे, सुनीता आऊलवार आदींची उपस्थिती होती.
मविआचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या भूखंड निर्णयाची पाठराखण
सिद्धांत शिरसाट म्हणजे ... बडे मियाँ तो बडे मियाँ
मुख्यमंत्र्यांच्या बैठकीतील विषय बाहेर चर्चेला जात असल्याच्या सत्तारांच्या आरोपामुळे शिंदे गटात अंतर्गत वाद असल्याची चर्चा आहे. याविषयी दानवे म्हणाले की, सत्तारच अशा प्रकारच्या चर्चा बाहेर करत असतात. त्यांनाच ती सवय आहे. आमदार संजय शिरसाट यांचे चिरंजीव सिद्धांत शिरसाट यांच्या मुलाने ठेकेदाराला धमकावल्याच्या प्रकरणावर ‘बडे मियाँ तो बडे मियाँ, छोटे मियाँ सुभानअल्ला’ एवढीच प्रतिक्रिया दानवेंनी नोंदवली.
सत्तारांची अनेक प्रकरणे चव्हाट्यावर आणू
दानवे म्हणाले की, विधिमंडळात कृषिमंत्री अब्दुल सत्तारांचा भूखंड घोटाळा उघडकीस आल्यानंतर आम्ही आक्रमक भूमिका घेतली होती. सत्तारांच्या गैरव्यवहाराची अनेक प्रकरणे उघडकीस येत आहेत. त्यातील काही सिल्लोड मतदारसंघातील, तर काही राज्यस्तरीय आहेत. अधिकाऱ्यांना धमकावण्याचे प्रकारही समोर येत असून त्याची माहिती घेऊन लवकरच ती चव्हाट्यावर आणू.
धान्यासाठी पाठपुरावा
आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना धान्य वाटपाची योजना थांबली आहे. याविषयी ‘दिव्य मराठी’ने २ जानेवारी रोजी वृत्त प्रकाशित केले. या प्रकरणाचा पाठपुरावा करणार असल्याचे दानवे यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.