आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिंतेचा विषय:मोबाइलवरून वडील रागावल्याने मुलीची आत्महत्या ; दर दीड दिवसाला येत आहे एक केस

औरंगाबाद / सुमीत डोळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मोबाइलचा अति वापर सध्या सर्वांच्याच चिंतेचा विषय झाला आहे. मोबाइलच्या अति वापरामुळे वडील रागावल्याने आरती सुनील सिदलंबे या २० वर्षीय महाविद्यालयीन तरुणीने रविवारी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती. बुधवारी पहाटे उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. मानसोपचारतज्ज्ञांनुसार, सध्या मोबाइलचे व्यसन ही सर्वाधिक चिंतेची बाब असून आठवड्याला आमच्याकडे ४ ते ५ पालक पाल्याच्या मोबाइल व्यसनाची तक्रार घेऊन येत आहेत.

आरती पदवीच्या दुसऱ्या वर्षात शिकत होती. गारखेड्यातील न्यू हनुमाननगरमध्ये ती कुटुंबासह राहत होती. १८ डिसेंबर रोजी रात्री आरती घरात असताना वडील काम आटोपून घरी परतले. तेव्हा आरती मोबाइलवर होती. गेल्या अनेक दिवसांपासून सतत मोबाइल वापरण्यावरून आई-वडिलांनी आरतीला समजावून सांगितले होते. मात्र, रविवारी आरतीच्या हातात मोबाइल पाहून वडील तिला पुन्हा रागावले. त्यामुळे रागावलेली आरती थेट आतील खोलीत निघून गेली. त्यानंतर काही वेळातच तिने घरातील विष प्राशन केले. हा प्रकार लक्षात येताच तिला आधी एमआयटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृतीत सुधारणा न झाल्याने नंतर तिला घाटी रुग्णालयात हलवण्यात आले होते.

अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना बुधवारी पहाटे तिचा मृत्यू झाला. पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे अंमलदार सुखदेव कावरे यांनी कुटुंबातील सदस्यांचा जबाब नोंदवल्यानंतर हे कारण समोर आले. आरतीला एक भाऊ व एक विवाहित बहीण आहे.

मुलांना वेळीच न आवरल्यास नंतर कठीण समस्या उद्भवू शकतात मानसोपचातरज्ज्ञ डॉ. मोनाली देशपांडे यांच्या माहितीनुसार, सध्या सर्वाधिक प्रकरणे मोबाइल व्यसन जडल्याची आहेत. त्यात आठवी ते पदवीचे शिक्षण घेणारे तरुण, तरुणी सर्वाधिक आहेत. ते येतात तेव्हा त्यांचे व्यसन टोकाला गेलेले असते. त्यांनी केलेल्या सूचना अशा :

{ पालक स्वत: मोबाइलपासून दूर राहिल्यास पाल्यावरही सकारात्मक परिणाम होतो. { तरुणांनी सोशल मीडियाची भुरळ कमी करावी. असे व्यसन लागलेल्या तरुणांना त्यातील धोके, सायबर गुन्ह्यांविषयी शांतपणे बसून सांगणे गरजेचे आहे. { आता पालकांचेच पेशन्स कमी होत चालल्याने ते स्वत:च मोबाइलपासून प्रत्येक गोष्ट सहज उपलब्ध करवून देतात. त्यामुळे नंतर पाल्यांना नाही म्हणणे अवघड जाते. त्यामुळे त्यांच्याशी सतत संवाद साधा. पालकांना स्वत:चेही पेशन्स वाढवावे लागतील.

बातम्या आणखी आहेत...