आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:दौलताबाद किल्ल्यावर सापडली जैन लेणी; लॉकडाऊनच्या काळात साफसफाई सुरू असताना उलगडला इतिहास

औरंगाबाद2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 1000 वर्षांपूर्वी सन 1137 मध्ये यादव राजवटीत ही लेणी कोरली गेली असावी, असा अंदाज आहे.
  • किल्ल्यावरील मेंढा तोफेसमोरील रंगमहालाच्या पाठीमागे दाट झाडाझुडपात ही लेणी आहेत.

दौलताबाद येथील ऐतिहासिक देवगिरी किल्ल्यावर नव्या सात लेणी सापडल्या आहेत. यापैकी एक लेणे सुस्थितीत असून इतर पाच लेणी जमिनीखाली आहेत. एका लेण्याचे छत ढासळलेल्या अवस्थेत आहे. ही जैन लेणी असल्याचे इतिहासकारांचे मत आहे. पुरातत्त्व विभागाच्या साफसफाईत ही लेणी आढळली. शेकडो वर्षांपासून देवगिरी किल्ल्यात दडलेली सात लेणी सापडली आहे. औरंगाबादपासून जवळच असलेल्या दाैलताबाद येथील देवगिरी किल्ला पर्यटकांसाठी सध्या बंद अाहे. या काळात पुरातत्त्व विभागाने किल्ल्याची साफसफाई सुरू केली. याच दरम्यान शेकडो वर्षांपासून झाडाझुडपात लपलेली सात लेणी समोर आली आहेत. त्यापैकी एक लेणे सुस्थितीत असून एका लेण्याचे छत ढासळले आहे. इतर पाच लेणी जमिनीच्या खाली आहेत. इतिहासकारांच्या मते या जैन लेणी आहेत. एक हजार वर्षांपूर्वी ११३७ मध्ये यादव राजवटीत या कोरल्या गेल्या असाव्यात. किल्ल्यावरचा हा भाग सात टाकी म्हणूनदेखील प्रसिद्ध आहे.

किल्ल्यावरील मेंढा तोफेच्या समोर रंगमहाल आहे. त्याच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणावर जंगलासारखी झुडपे वाढलेली अाहेत. शिवाय खोल खंदकही आहे. त्यामुळे हा रस्ता अनेक वर्षांपासून बंद होता. अाता पर्यटकांची वर्दळ नसल्याने पुरातत्त्व विभागाचे अधीक्षक मिलनकुमार चावले यांनी किल्ल्यावर साफसफाई मोहीम सुरू केली आहे. हे काम सुरू असताना या ठिकाणी लेणी असल्याचे समोर अाले. तिथे जाण्यासाठी स्वतंत्र रस्ता करण्याचे काम पुरातत्त्व विभागाने सुरू केले आहे. याशिवाय किल्ल्याच्या परिसरात असलेल्या शाही हमाम, पुरातन मशीद, कचेरी, चिनी महल या ठिकाणी जाण्यासाठीही रस्ते तयार करण्यात येत आहेत. किल्ल्यांच्या उंच भिंतीवर उगवलेली झुडपे काढण्याचे कामदेखील सुरू आहे. दौलताबाद किल्ल्याचे संरक्षण सहायक संजय रोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली रवींद्र घाटे, अशोक निंभोरे, सुखदेव नीळ, गौरख बनकर, मोहंमद इजाज, पंडित वाबळे, कुशीनाथ खोसरे, सिद्धार्थ कुमार व इतर कर्मचारी या नव्या कामासाठी परिश्रम घेत आहेत.

काही इतिहासकारांच्या मते किल्ल्यावर ७० जैन मंदिरे होती. काही राजवटीत याची तुटफूट झाली. या मंदिराचे काही स्तंभ सध्या भारतमाता मंदिरात पाहायला मिळतात. लेण्यांच्या जवळ मोठमोठे रांजणही आहेत. या ठिकाणी गंधक ठेवण्याची व्यवस्था असावी. या लेण्यांना लागून खंदकातून बाहेर पडण्यासाठी एक दरवाजादेखील आहे. महादेवाच्या पिंडीचे भग्न अवशेषदेखील या ठिकाणी आहे. या लेण्यांत कलाकुसर केेलेले खाम, दरवाजे अजून शाबीत आहेत. काही भाग लेण्यांसमोरच तुटलेल्या अवस्थेत पडलेले दिसतात. येथील शाही हमाम, शाही महल, कचेरी अाता पर्यटकांना पाहता येईल अशी साेय केली जात अाहे.

रस्त्याची कामे सुरू
किल्ल्यावर सध्या ३३ कर्मचारी कार्यरत आहेत. पर्यटकांची गर्दी असताना अनेक वर्षांपासून लपलेल्या जागांपर्यंत जाण्यासाठी रस्ता करणे शक्य नाही. मात्र आता वेळ मिळाल्यामुळे आशा जागा शोधून त्या ठिकाणी पर्यटकांना जाता यावे यासाठी रस्ता करण्याचे काम सुरू आहे. किल्ल्यावर सध्या एक बालेकिल्ला, ३०० बुरूज, तीन मंदिरे, तीन मशिदी, दोन महाल, एक मिनार, ५२ तोफा, पाच हमाम, एक म्युझियम आहे. याची देखभाल करण्यासाठी कर्मचाऱ्यांची संख्या मात्र कमी आहे.

प्रवासवर्णनात उल्लेख
मध्ययुगीन कालखंडातील जागतिक प्रवासी इब्न बतुता याच्या प्रवासवर्णनातही देवगिरी किल्ल्यावरील लेण्यांचा उल्लेख असल्याचे इतिहासकार रफत कुरेशी सांगतात. मोहंमद तुघलक या लेण्यांचा वापर ‘जेल’सारखा करत असे. या काळात लेण्यांमध्ये खूप मोठे उंदीर होते. या उंदरांमुळे एका कैद्याचा मृत्यू झाला. त्यानंतर या ठिकाणी कैदी ठेवणे बंद झाले. इतिहास अभ्यासक दुलारी कुरेशी सांगतात, ‘या लेण्यांतील काही शिल्पे अजूनही किल्ल्यावर दिसतात. यादवांच्या शेवटच्या काळात या लेणी कोरल्या गेल्याचा अंदाज आहे.

बातम्या आणखी आहेत...