आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबीड बायपास परिसरात रस्ते, उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. तसेच जबिंदा लॉन्सवरही काम होत आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात रात्रंदिवस धुळीचे लोट उठतात. वाहनचालक, प्रवाशांच्या नाकातोंडात धूळ जात आहे. घरात, अंगणात, खिडक्यात, कपड्यांवर धूळ साचत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे.
बीड बायपासवरून शहरात ये-जा करणाऱ्या आणि बायपासवरून शहराबाहेर जाणाऱ्या वाहनधारकांची संख्या हजारोंच्या संख्येत आहे. स्मार्ट वाहतूक व्यवस्था करण्यासाठी रस्ते विकास आणि उड्डाणपूल बांधण्याचे काम सुरू आहे. मात्र, नियमाप्रमाणे पर्यायी सर्व्हिस रस्ता उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. त्यामुळे कच्च्या रस्त्यावरूनच दिवस-रात्र वाहने धावत आहेत. या मार्गावरून चाकरमान्यांबरोबरच लहान मुले ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच जण प्रवास करतात. धुळीमुळे शेकडो कुटुंबे, छोटे-मोठे व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. आरोग्याचा प्रश्नही अतिशय गंभीर बनला आहे. याकडे मनपा, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
तातडीने उपाययोजना करावी, ओरोग्यास धाेका
कच्च्या रस्त्यावरून हजारो वाहने धावत असून धुळीचे लोट डोळे, नाक, तोंडातून आत जात आहेत. घर, अंगणात धूळ साचते. यामुळे आबालवृद्धांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. मॉर्निंग वॉकलाही बाहेर पडता येत नाही. ड्यूटीला जायचे तर रस्ता पार करेपर्यंत कपडे धुळीने माखलेले असतात. वाहनावरही धूळ बसते. प्रशासनाने, ठेकेदाराने तातडीने उपाययोजना कराव्यात. - शिशिर देशमुख, नागरिक, बीड बायपास.
आईचा दम्याचा त्रास वाढला, पर्यायी रोड द्यावा
चांगला रोड खोदून ठेवला. पर्यायी रोड दिला नाही. त्यामुळे धुळीचे लोट उठत आहेत. आमची रेसिडेन्सी धुळीने माखते. आईचा दम्याचा त्रास वाढला आहे. डोळ्यांच्या समस्यांमुळे आम्ही त्रस्त झालो आहोत. दर्गा येथे सोमवारी आठवडी बाजार असतो. परिणामी दोन-दोन तास वाहतूक प्रचंड ठप्प हाेते. याकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात.-चंदन कुटे, नागरिक, सिद्धी रेसिडेन्सी, बीड बायपास.
ठेकेदाराने मातीवर पाणी टाकावे, धूळ कमी होईल
कच्चा रस्त्यामुळे मातीवरून वाहन गेले की प्रचंड धूळ उडते. पर्यायी रस्ता नाही. धुळीचे कण नागरिकांच्या श्वासनलिकेत जाऊन आजार बळावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचे भान ठेवून ठेकेदाराने किमान मातीवर पाणी टाकले तर धूळ उडण्याचे प्रमाण कमी होईल. तेही केले जात नाही.- टी. डी. दांडगे, लघुउद्योजक, बीड बायपास.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.