आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या काही वर्षांपासून मैत्री असलेल्या तरुणाविरोधात एका संशोधक विद्यार्थिनीने पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पीएचडी करणाऱ्या तरुणाने या रागातून आपल्या मैत्रिणीला तिच्या कॉलेजच्या प्रयोगशाळेत गाठले. सोबत आणलेल्या बाटलीतून आधी दोघांच्याही अंगावर पेट्रोल ओतले. आधी स्वत:ला पेटवून घेतले व क्षणार्धात मैत्रिणीलाही कवेत घेतले. या घटनेत तरुण ९५ टक्के भाजल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तरुणी ४० टक्के भाजली असून तिच्यावर घाटीत उपचार सुरू आहेत.
औरंगाबादेतील हनुमान टेकडीजवळील शासकीय विज्ञान संशोधन महाविद्यालयात सोमवारी भरदुपारी २.१५ वाजता ही थरारक घटना घडली. विशेष म्हणजे प्रयोगशाळेत मार्गदर्शक असणाऱ्या मॅडमसमोर हा प्रसंग घडल्याने त्या अक्षरश: सुन्न झाल्या होत्या. गजानन खुशाल मुंडे (मूळ गाव दाभादिग्रस, ता. जिंतूर) हा ३० वर्षीय तरुण शहरात विद्यापीठ वसतिगृहात राहतो. पूजा साळवे (२८, रा. सिडको एन-७, मूळ गाव सिल्लोड) या तरुणीशी त्याची काही वर्षांपासून मैत्री होती. नंतर गजानन तिच्या प्रेमात पडला. दोघेही जीवभौतिकशास्त्रात पीएचडी करत होते. पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, अनेक महिने चांगले संबंध असलेल्या पूजा व गजाननमध्ये गेल्या काही दिवसांपासून बिनसले होते. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात पूजाने त्याच्याविरोधात बेगमपुरा पोलिसांत तक्रार दिली होती. त्यावरून अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. पोलिसांनी गजाननला १४९ ची नोटीस देत दमही दिला होता. हा राग त्याच्या मनात होताच.
तक्रारीनंतरही त्याने तिचा पाठलाग करणे सोडले नव्हते. म्हणून १७ नोव्हेंबर रोजी पूजाने पुन्हा नातेवाइकांसह पोलिसांत जाऊन गजाननच्या विरोधात दुसरी तक्रार दिली. मात्र १८ सप्टेंबर रोजी दीक्षांत समारंभासाठी राज्यपाल व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यापीठात कार्यक्रम असल्यामुळे संपूर्ण पोलिस ठाणे बंदोबस्तात होते. त्यामुळे काहीच कारवाई झाली नाही. गजाननच्या मनात मात्र पूजाविषयी प्रचंड राग होता. यातून त्याने स्वत:पेटवून घेत पूजालाही जाळले. घटनेची माहिती मिळताच बेगमपुरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस उपायुक्त अपर्णा गिते, सहायक पोलिस आयुक्त अशोक थोरात, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांनी घटनास्थळाची पाहणी केली. पोलिस निरीक्षक गीता बागवडे, आम्रपाली तायडे, प्रमोद कठाणे यांनी दोघांचे जबाब नोंदवले.
पेट्रोलच्या दोन बाटल्या घेऊन प्रयोगशाळेत आला सोमवारी दुपारी पूजा आपल्या गाइड डॉ. वैशाली वाडेकर यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी शासकीय विज्ञान संशोधन महाविद्यालयात गेली होती. प्रयोगशाळेत ती वाडेकर यांच्याशी बोलत असताना गजानन तिथे आला. त्याने प्रयोगशाळेच्या दरवाजाची कडी लावून घेत बॅगमध्ये आणलेल्या बाटलीतून आधी स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून घेतले, तिच्याही अंगावर ओतले. ‘माझ्याशी लग्न का करत नाहीस?’ असे म्हणून त्याने लायटरने स्वत:ला पेटवून घेत पूजाला मिठी मारली. हा प्रसंग पाहून प्रा. वाडेकर घाबरल्या, त्यांनी आरडाओरड केली. त्यावर धावत आलेल्या कर्मचाऱ्यांनी दार तोडून अग्निप्रतिरोध यंत्राच्या मदतीने आग विझविली. मात्र तोपर्यंत दोघेही गंभीर भाजले होते. त्यांना तातडीने घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
पेटल्यानंतर म्हणाला, विझवू नका गजानन व पूजा आगीने वेढलेले असताना कॉलेजमधील कर्मचारी व विद्यार्थी अग्निप्रतिरोध यंत्राच्या मदतीने फवारणी करून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र ‘मला विझवू नका..’ असे गजानन ओरडत होता. दोघांना अॅडमिट केल्यानंतर पूजाचे बहीण, आई, भावजी घाटीत आले. मात्र गजाननचे आई -वडील जिंतूरला राहत असल्यामुळे त्यांना येण्यास रात्र झाली. त्याच्या गावाकडील एक तरुण औरंगाबादला आला होता. त्याला नातेवाइकांनी घाटीत गजाननला पाहण्यासाठी पाठवले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.