आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

चिंताजनक:ऑक्सिजन अन् व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याने पोलिसाच्या आईचा मृत्यू; धावाधाव करून गाठले जिल्हा रुग्णालय तरीही आईला गमावले

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अखेरच्या टप्प्यात बेड मिळाला; मात्र, उपचार सुरू हाेण्यापूर्वीच श्वास थांबला
  • खासगी रुग्णालयांतील सर्व बेड फुल्ल; दाेन रुग्ण दगावले

एकीकडे राज्य शासनाचा अन्न व औषध प्रशासन विभाग ऑक्सिजनची टंचाई नसल्याचा दावा करीत असताना औरंगाबाद येथे एका पोलिस कर्मचाऱ्याच्या आईला कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर उपलब्ध झाले नाही. अखेरच्या टप्प्यात जिल्हा रुग्णालयात एक बेड मिळाला, मात्र तिथे उपचार सुरू हाेईपर्यंत तिचा श्वास थांबला हाेता. तर अकोल्यात एका रुग्णास सुरुवातीला बेड उपलब्ध झाला नाही, नंतर वेळेवर ‌व्हेंटिलेटर उपलब्ध झाले नसल्याने त्यालाही प्राण गमवावे लागले.

धावाधाव करून गाठले जिल्हा रुग्णालय तरीही आईला गमावले

औरंगाबाद शहर पोलिस दलातील एका पोलिस कर्मचाऱ्याला काेराेनाची लागण झाली हाेती. तपासणीनंतर त्याची पत्नी व ७० वर्षीय आईचा अहवालही पाॅझिटिव्ह आला. १५ सप्टेंबर राेजीच रात्री बारा वाजेच्या सुमारास अचानक या आईची प्रकृती खालावली. त्यामुळे आॅक्सिजन व व्हेंटिलेटरची साेय करण्यासाठी तिला दुसरीकडे दाखल करावे लागेल असे काेविड सेंटरमधील डाॅक्टरांनी सांगितले. संबंधित पाेलिस कर्मचाऱ्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मदतीने एमजीएम व धूत हाॅस्पिटलमध्ये फाेनाफाेनी करून आयसीयूचा बेड मिळवण्यासाठी प्रयत्न केले. रात्री उशिरापर्यंत हे प्रयत्न सुरू हाेते, मात्र त्याला यश आले नाही. या दाेन्ही रुग्णालयांतील सर्वच बेड फुल्ल असल्यामुळे त्यांनी दाखल करून घेण्यास असमर्थता दाखवली. यात तीन-चार तासांचा वेळ गेला अखेर जिल्हा रुग्णालयात एक बेड उपलब्ध करून देण्यात आला. मात्र, तोपर्यंत पोलिस कर्मचाऱ्याच्या आईची प्रकृती बरीच खालावली होती. त्यांची ऑक्सिजनची पातळी ५०च्या खाली गेली होती. जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर तेथील डाॅक्टरांनीही शर्थीचे प्रयत्न केले. मात्र काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला.

बेडच उपलब्ध नव्हता

पोलिसाच्या नातलगांनी हाॅस्पिटलमध्ये येऊन पाहणी केली. त्या दिवशी शहरात ४०६ रुग्ण आढळले होते. त्यामुळे आधीच सर्व बेड फुल्ल हाेते, आमच्याकडे बेडच उपलब्ध नव्हता . त्यामुळे नाइलाज झाला. - डॉ. हिमांशू गुप्ता, सीईओ,धूत रुग्णालय

प्रथम येणाऱ्यास प्राधान्य

आमच्याकडे गेल्या काही दिवसांपासून सर्वच बेड फुल्ल आहेत. अनेक रुग्ण वेटिंगवर आहेत. जाे प्रथम येताे त्याला बेड दिला जाताे. कुणासाठीही राखीव ठेवला जात नाही. - प्रवीण सूर्यवंशी, सीईओ,एमजीएम रुग्णालय