आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्देश:दहावी-बारावीची प्रश्नपत्रिका मोबाइलवर व्हायरल केल्यास 5 वर्षे डिबार

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बारावीच्या लेखी परीक्षेला २१ फेब्रुवारीपासून, तर दहावी परीक्षेला २ मार्चपासून सुरुवात होत आहे. यंदा पेपरफुटी प्रकरणाला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने कठोर उपाययोजना केलेल्या आहेत. फार्मसी, इंजिनिअरिंगच्या प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच सोशल मीडियावर व्हायरल होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जर दहावी-बारावीच्या प्रश्नपत्रिका मोबाइलवर फॉरवर्ड केल्या तर त्यांना पाच वर्षे परीक्षेतून निलंबित करण्यात येणार आहे. यात अन्य कुणी दोषी आढळले तर त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार आहे.

राज्य मंडळाने १ फेब्रुवारी २०२३ रोजी राज्यातील सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक, शिक्षणाधिकाऱ्यांना शिक्षा सूची जारी केली आहे. १२ पानांच्या या शिक्षा सूचीमध्ये स्मार्टफोनद्वारे प्रश्नपत्रिकेचा काही भाग, पूर्ण प्रश्नपत्रिका किंवा घटक जर व्हायरल केला तर संबंधित विद्यार्थ्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली जाणार असल्याचे शिक्षा सूचीत नमूद करण्यात आले आहे. ही शिक्षा सूची परीक्षार्थींना वाचून दाखवणे मुख्याध्यापकांची जबाबदारी आहे. यंदा परीक्षेचे नियम अतिशय कडक केले आहेत.

परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांची चोरी करणे, प्रश्नपत्रिका मिळवणे, विकली आणि विकत घेतल्यास, मोबाइल, टॅब, ई-मेलवर फॉरवर्ड केल्यास गंभीर गुन्हा समजण्यात येईल. किंबहुना इतर इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांवर प्रश्नपत्रिकेचा काही भाग प्रसारित केल्यास परीक्षार्थींची परीक्षा रद्द करण्यात येणार आहे. तसा कठोर निर्णय राज्य मंडळाने घेतला आहे. यात पालक किंवा तत्सम व्यक्ती दोषी असेल तर त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल. विद्यार्थी जर असे करताना आढळले तर त्याला पुढील पाच परीक्षांना प्रतिबंध घालण्यात येणार आहे. परीक्षार्थीच्या विरोधातही फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल.

उत्तरपत्रिकेत मोबाइल क्रमांक टाकून संपर्क करण्यास सांगणे गैर १ मंडळाच्या अधिकृत उत्तरपत्रिका, पुरवण्या, आलेख, नकाशे, लॉग टेबल, अनधिकृतपणे मिळवणे आणि त्याचा गैरवापर केल्यास पुढील एका परीक्षेस प्रतिबंध केला जाईल. २. मंडळाने मान्यता न दिलेली अथवा प्रतिबंध केलेली साधने-साहित्य परीक्षा कक्षात स्वत:जवळ बाळगता येणार नाही. त्याचा वापर करताना आढळले तरीही परीक्षेवर प्रतिबंध घातला जाईल. ३ उत्तरपत्रिकेत-पुरवणीत प्रक्षोभक, अर्वाच्य भाषेचा वापर, शिवीगाळ लिहिणे किंवा धमक्या देणे, बैठक क्रमांक, फोन नंबर, मोबाइल क्रमांक देऊन संपर्क साधण्यास विनंती करणेही गैर समजण्यात येईल. अशा परीक्षार्थींवर कारवाई होईल. ४ विषयाशी संबंधित नसलेला अन्य मजकूर लिहिणे, उदा. गाणे, सिनेमाचे डायलॉग, कथा लिहिणेही गैरप्रकार आहे. ५ परीक्षा सुरू असताना इतर परीक्षार्थींबरोबर उत्तराच्या संदर्भात गैरहेतूने संपर्क साधणे, एकमेकांचे पाहून लिहिणे, अन्य परीक्षार्थींना तोंडी उत्तरे सांगताना निदर्शनास आल्यास परीक्षेतून पाच वर्षांसाठी डिबार केले जाणार आहे.

गैरप्रकार रोखणे सर्वांची जबाबदारी शाळांना लेखी शिक्षा सूची पाठवली आहे. सुरुवातीला तर शाळांनी आपल्या विद्यार्थ्यांना ही सूची वाचून दाखवायची आहे. विद्यार्थ्यांना गांभीर्य समजले पाहिजे हा हेतू आहे. त्यानंतर परीक्षा केंद्रावरूनही या निर्देशांचे तंतोतंत पालन करून घेतले जाणार आहे. गैरप्रकाराला आळा बसवणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे. - अनुराधा ओक, राज्य मंडळ सचिव, पुणे

बातम्या आणखी आहेत...