आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वसुली:4 लाखांचे कर्ज, टोळीने केली 24 % व्याजाने 2.17 कोटी वसुली ; दोन टक्क्यांनी पाच लाख रुपये घेतले

औरंगाबाद16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यात बीबीए करून परतलेल्या ऋषिकेश गंगाधर बुगदेने (२०, रा. श्रीविहार कॉलनी, देवळाई) अपघातग्रस्त मित्रावर उपचार व इतर कामांसाठी काही जणांकडून ४ लाख रुपये हातउसने घेतले. त्याच्या परतफेडीसाठी आठ जणांकडून दोन टक्क्यांनी पाच लाख रुपये घेतले. वर्षभरात आठ जणांनी सावकारी रंग दाखवला. दोन टक्क्यांचे व्याज २४ टक्क्यांवर नेत २ कोटी १७ लाख ३० हजार ८७५ रुपये, सोन्याचे दागिने, अनेक धनादेश, घराची कागदपत्रे ताब्यात घेतली. एवढ्यावरच न थांबता तीन वेळेला अपहरण, लूटमार, जिवे मारण्याची धमकी दिली. अखेर या सावकारी टोळीविरोधात ऋषिकेशचे वडील गंगाधर यांनी पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली. संकेत ऊर्फ सत्यम मुंडलिक (रा. गुलमंडी), वैष्णव पाटील (रा. देवगिरी महाविद्यालयासमोरील परिसर), सुयोग वैद्य (रा. मोंढा नाका) यांच्यासह सात ते आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाळूज एमआयडीसीतील एका कंपनीत लेखा व्यवस्थापक असलेल्या बुगदेंच्या तक्रारीत म्हटले आहे की, कोरोनाकाळात घरी परतलेला ऋषिकेश अचानक शांत व चिंताग्रस्त राहायला लागला होता. विश्वासात घेऊन विचारपूस केल्यावर त्याने २०१९ मध्ये मित्र दीपक भगत, अभिषेक राऊत व तेजस ठाकूर यांच्याकडून शिक्षण शुल्क, इतर खर्च व वेदांत नगरकरच्या अपघातानंतर ३ ते ४ लाख रुपये पैसे घेतले होते. ते परत करण्यासाठी विपुल सुरडकरच्या मध्यस्थीने सप्टेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ दरम्यान संकेत, वैष्णव, सुयोग तसेच प्रतीक निनाळे (रा. उल्कानगरी), सुयोग जाधव (रा. रेल्वेस्थानक परिसर), पार्थ जोशी, आकाश साळुंके, डिगुराज इंगळे (तिघेही रा. उल्कानगरी) यांच्याकडून सुरुवातीला बँक व नंतर रोखीने सहा महिन्यांसाठी दोन टक्क्यांनी ५ लाख रुपये घेतले. हे कळल्यावर गंगाधर यांनी बँकेतून कर्ज काढून आठही जणांना पैसे दिले. टोळीची मागणी वाढत गेली : शहरातील सावकारी टोळीचा धक्कादायक प्रकार

पैसे देऊनही संकेत, सुयोग व वैष्णवने ऋषिकेशला ८ फेब्रुवारी रोजी जबिंदा मैदानावर बोलावून व्याजाचे आणखी ३ लाख मागितले. ते न दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. शिवाय गळ्यातील १ तोळ्याची सोन्याची साखळी, दोन अंगठ्या, आयफोन व आयवॉच काढून घेतली. मार्च २०२१ मध्ये राजाबाजार येथे घेऊन गेले. अपहरणाचा कॉल करून ९५ लाख मागितले. गंगाधर यांनी कंपनी मालकाच्या मदतीने ९५ लाखांचे कर्ज काढून ती रक्कमही दिली. यानंतर सागर गायकवाड, रावण जगताप बुगदेेच्या घरी जाऊन पैसे मागू लागले. कोऱ्या बाँड पेपवर सह्या घेत त्यांनी घराची कागदपत्रे जप्त केली. बुगदेंच्या कंपनीत सत्यम, वैद्य व पाटील यांनी धिंगाणा घालत त्यांना धमकावले. २३ ऑगस्ट २०२१ रोजी पत्नी, भाऊ व गंगाधर यांना आय-२० कारमध्ये बसवून राजाबाजार येथे शिवसेनेचे पदाधिकारी लच्छू पहेलवान यांच्या कार्यालयावर घेऊन गेले. तेथे लच्छू यांनी १५ दिवसांची मुदत दिली. ऋषिकेशकडून दोन नोटरी करारनाम्यावर सह्या करून जिवे मारण्याची धमकी देऊन सोडून दिले. एकूण या टोळीने २ कोटी १७ लाख ३० हजार ८७५ रुपये बळजबरीने घेतले. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या सहायक निरीक्षक तृप्ती तोटावार पुढील तपास करत आहेत. ग्रामीण भागात अशा प्रकारे मुद्दलावर अव्वाच्या सव्वा व्याज वसूल करण्याचे प्रकार होतात. मात्र, औरंगाबादेतही असे घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

बातम्या आणखी आहेत...