आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी इम्पॅक्ट:कर्जाच्या वसुलीसाठी धमक्या, बदनामीकरणाऱ्या 32 अॅप्सच्या 21 जणांवर गुन्हा

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वीलेखक: महेश जोशी
  • कॉपी लिंक
  • दिल्ली, नोएडा, गाझियाबाद येथून चालतात अॅप

ऑनलाइन घेतलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी शिवीगाळ, धमक्या आणि सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी कर्जवाटप करणाऱ्या ३२ मोबाइल अॅप्सच्या २१ जणांविरुद्ध मंगळवारी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ‘दिव्य मराठी’ने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सर्वप्रथम हा प्रकार उघडकीस अाणून प्रकरण लावून धरले हाेते, त्यानंतर कर्जदार युवकांनी पोलिस आयुक्तांची भेट घेऊन तक्रार दिली होती. अखेर दोन महिन्यांनी या प्रकरणात गुन्हा दाखल झाला.

अनेक माेबाइल अॅप्स कर्जवाटप करतात. कोरोनाच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्याने दैनंदिन गरजांसाठी अशा प्रकारचे कर्ज घेण्याचे प्रकार वाढले हाेते. मात्र वेळेत परतफेड न केल्यास जबर दंड लागतो. इतकेच नव्हे तर कर्जदाराच्या फोनमधील कॉन्टॅक्टला मेसेज पाठवून ते गॅरंटर असल्याचे सांगितले जाते. कर्जदाराचा फोटोवर “फ्रॉड’चा टॅग लावून तो त्याच्या मोबाइलमधील सर्व नंबर्संना पाठवला जातो. गुगल प्ले स्टोअरवर अशा प्रकारचे ५ हजारांहून अधिक अॅप्स आहेत. यापैकी बहुतांश दिल्ली, नोएडा, गाझियाबाद येथून ते चालवले जातात.

शहरातील मनसेचे जिल्हा संघटक संदीप कुलकर्णी यांनी वेगवेगळ्या ६२ अॅप्सकडून ३,४१,६१९ रुपयांचे कर्ज घेतलेे होते. पैकी ३२ अॅप्सचे १,७०,००० रुपये परतफेड केली. तरीही ३२ अॅप्सच्या २१ क्रमांकावरून त्यांना पैसे भरण्यासाठी फोन सुरू होते. बदनामीची धमकी दिली जात होती. वसुलीच्या या प्रकारला ‘दिव्य मराठी’ने ६ डिसेंबर २०२० रोजी वाचा फाेडली हाेती.

मनसेने घेतला हाेता पुढाकार

दैनिक दिव्य मराठीच्या वृत्तानंतर कर्जाच्या पाशात अडकलेले अनेक तरुण एकत्रित आले. त्यांनी मनसेचे जिल्हाप्रमुख सुहास दाशरथे यांच्या नेतृत्वात ७ डिसेंबर रोजी पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांची भेट घेतली. या तक्रारीसोबत दिव्य मराठीच्या बातम्यांचे वृत्ताचे कात्रण आणि फायनान्स कंपन्यांकडून आलेल्या मेसेजचे स्क्रीन शॉट्स जोडले हाेते. त्यावर दाेन महिने अधिक तपास करत पाेलिसांनी सोमवारी रात्री ३२ अॅप्सच्या २१ मोबाइल कर्मचाऱ्याविरुद्ध कलम ३८४, ५०४, ५०६ आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक प्रवीण वाघ या प्रकरणी पुढील तपास करत आहे.

आता न्याय मिळेल असा विश्वास

कोरोनाच्या काळात नोकऱ्या गेल्याने अनेकांनी अॅप्सवरून लहानसहान कर्ज घेतले. पण त्याच्या वसुलीची जाचक पद्धत जिवावर उठली आहे. बदनामीमुळे तोंड दाखवायला जागा राहिली नाही. अनेकांना आत्महत्येचे विचार येत होेते. ‘दिव्य मराठी’ने या प्रकरणात साथ दिली. गुन्हा दाखल झाल्याने न्याय मिळेल हा विश्वास वाटतोय. - संदीप कुलकर्णी, तक्रारदार

बातम्या आणखी आहेत...