आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
वसमत तालुक्यातील रोडगा येथे एका तरुण शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून तसेच नापिकीमुळे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून या प्रकरणी वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री उशिरा अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वसमत तालुक्यातील रोड्गा येथे सुनील प्रल्हाद कदम (२५) हे त्यांच्या कुटुंबीयांसह राहतात. घरी आई-वडील पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. सुनील कदम यांच्याकडे पाच एकर शेती असून या शेतीवर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. शेतावर त्यांनी काही दिवसापूर्वी वसमत येथील भारतीय स्टेट बँकेकडून वडिलांच्या नावावर दीड लाख रुपयांची कर्ज घेतले होते. मात्र मागील दोन-तीन वर्षापासून सतत नापिकी होत असल्यामुळे कर्ज कसे फेडावे असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला होता. मागील वर्षी खरीप हंगामामध्ये हाती आलेला पिकांचा घास परतीच्या पावसाने हिरावला गेला होता. तर रब्बी हंगामात गारपिटीमुळे पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे लागवडीचा खर्चही निघाला नाही. या परिस्थितीमध्ये उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला होता. त्यामुळे मागील काही दिवसांपासून कदम हे अस्वस्थ होते.
दरम्यान शुक्रवारी त्यांचे कुटुंबीय शेतामध्ये कामासाठी गेले होते. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ते घरीच एकटेच थांबले होते. यावेळी त्यांनी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार शेजारी असलेल्या गावकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने या घटनेची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली. त्यानंतर त्यांचे कुटुंबीय घरी पोहोचले. या घटनेची माहिती वसमत ग्रामीण पोलिसांनी देण्यात आली. वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बळीराम बंदखडके, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे, जमादार बालाजी मिराशे, भुजंग कोकरे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली, याप्रकरणी मयत कदम यांच्या पत्नी गोकर्णा सुनील कदम यांच्या माहितीवरून वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात रात्री उशिरा अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. उपनिरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे पुढील तपास करीत आहेत
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.