आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिंगोली शहरात कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन बाजारपेठेत भाजीपाला विक्रेते व ग्राहक यांची गर्दी टाळण्यासाठी बाजारपेठेचे विकेंद्रीकरण करण्यात आले आहे. आता शहरात ६ ठिकाणी भाजीपाला विक्रीचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच विकेल ते पिकेल यायोजने अंतर्गत शेतकऱ्यांना भाजीपाला विक्रीसाठी स्वतंत्र जागा पालिकेने उपलब्ध दिली आहे. याबाबतचे आदेश पालिका मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांनी रविवारी ता. ४ काढले आहेत.
हिंगोली शहरात कोविड रुग्णांची संख्या दिवसेें दिवस वाढत चालली आहे. सध्या रुग्णालयांमधून तब्बल ८४२ रुग्णांवर उपचार सुरु असून मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा देखील शतकाच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे नागरीकांनी आवश्यक ती काळजी घेण्यासाेबतच यंत्रणांनी देखील सामजिक अंतराचे पालन होईल अशा प्रकारचे नियोजन करण्याबाबत सुचना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिल्या आहेत. जिल्हयात कोविडची साखळी तोडण्यासाठी ता. २९ मार्च ते ता. ४ एप्रील या कालावधीत लॉकडाऊन लावण्यात आले होते.
दरम्यान, आता बाजारपेठ सुरु होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजीपाला खरेदी करण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांनी बाजारपेठेचे विकेंद्रीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शहरालगतच्या वसाहती व मुख्य शहरात भाजीपाला व फळविक्रीसाठी जागा ठरवून देण्यात आल्या आहेत.
यामध्ये फळ व भाजी विक्रेत्यांसाठी जिल्हा परिषद बहुविध प्रशाला मैदान, खटकाळी बायपास परिसर, रेल्वेस्थानक मैदान, नवीन जिल्हा परिषद मैदान ते क्रांतीवीर बिरसामुंडा चौक रोडच्या डाव्या बाजूला, जिल्हा परिषद गणेशवाडी रोड तसेच गोपिनाथ मुंडे शेतकरी भवनाच्या संरक्षण भिंत मंगळवारा या सहा ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली आहे.
या शिवाय विकेल ते पिकेल या योजने अंतर्गत भाजीपाला व फलोत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महाराजा अग्रसेन चौक ते जिवन प्राधीकरण कार्यालय रोड व तहसील कार्यालयाच्या संरक्षण भिंती लगत जागा उपलब्ध करून दिलीआहे. बाजारपेठेच्या विकेंद्रीकरणातून भाजीपाला व फळ खरेदी विक्रीसाठी होणारी गर्दी टाळण्याचे प्रयत्न असणार आहेत.
तर संबंधितांवर दंडात्मक कारवाई करणार ः डॉ. अजय कुरवाडे, पालिका मुख्याधिकारी हिंगोली
शहरात बाजारपेठेत होणारी संभाव्या गर्दी लक्षात घेता हे नियोजन केले आहे. ग्राहकांनी तसेच विक्रेत्यांनी सामाजिक अंतराचे पालन करावे. तसेच मास्क, सॅनेटायझरचा वापर करावा. पालिकेने दिलेल्या सुचनांचे योग्य पालन होती किंवा नाही याची पाहणी करण्यासाठी पथके नियुक्त केली आहेत. सुचनांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पथकाद्वारे दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.