आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जैन नागरिक रस्त्यावर:सम्मेद शिखरजीला पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करा ; विभागीय आयुक्तांना दिले निवेदन

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जैन धर्माचे सर्वात मोठे पवित्र तीर्थक्षेत्र सम्मेद शिखरजी हे पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाच्या विरोधात सकल जैन समाजाच्या हजारो नागरिकांनी बुधवारी विभागीय आयुक्तांना निवेदन दिले. या क्षेत्राला पवित्र धार्मिक स्थळ म्हणून घोषित करावे, अशी मागणीही या वेळी करण्यात आली. या वेळी शहरातील ८० संघटनांतर्फे ५ हजारांहून अधिक नागरिक सहभागी झाले होते. यात महिलांचा मोठा सहभाग होता.

जैन धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या झारखंड येथील सम्मेद शिखर तीर्थक्षेत्रास पर्यटनस्थळ म्हणून घोषित करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे तीव्र पडसाद उमटले आहेत. या निर्णयाचा निषेध करण्यासाठी तसेच या क्षेत्रास पवित्र धार्मिक तीर्थक्षेत्र पवित्र तीर्थ म्हणून जाहीर करावे या मागणीसाठी सकल जैन समाज संघटनांच्या छत्राखाली हजारो जैन बांधव व भगिनी बुधवारी दुपारी २ वाजता दिल्ली गेटजवळ जमले. यात सहभागी महिलांनी ‘सम्मेद शिखर हमारा है, प्राणों से भी प्यारा है’ या घोषणा दिल्या. परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त होता. विशेष राखीव दलाची तुकडीही मागवली होती. त्यानंतर समाजातर्फे पंधरा जणांचे शिष्टमंडळ विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या भेटीसाठी गेले.

त्यांनी मागणीचे निवेदन विभागीय आयुक्तांना दिले व पंधरा मिनिटे चर्चा केली. ही मागणी वरिष्ठ पातळीवर पोहोचविण्याचे आश्वासन केंद्रेकर यांनी दिले. या शिष्टमंडळात सकल जैन समाजाचे महासचिव महावीर पाटणी, कार्याध्यक्ष सुभाष झांबड, कोषाध्यक्ष जी. एम. बोथरा, झुंबरलाल पगारिया, दिगंबर जैन समाजाचे अध्यक्ष ललित पाटणी, अनिल संचेती, दिगंबर क्षीरसागर, कोषिक सुराणा, विलास साहुजी, प्रशांत देसरडा, विनोद बोकडिया, संजय संचेती, निलेश सावळकर, मुकेश साहुजी, मिठालाल कांकरिया सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...