आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:ओला दुष्काळ जाहीर करून दिवाळी पूर्व नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा, शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने

औरंगाबाद2 वर्षांपूर्वीलेखक: संतोष देशमुख
  • कॉपी लिंक

सतत पाऊस त्यात अतिवृष्टीने खरीप पिकांचा चिखल झाला आहे. त्यामुळे पंचनाम्यात वेळ न घालवता दिवाळी-पूर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात नुकसान भरपाई मिळावी, या प्रमुख मागणीसाठी कन्नड, औरंगाबाद, फुलंब्री आदी तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोमवारी जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती संतोष जाधव यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आणला होता.

शेतकऱ्यांच्या हातात खराब झालेले टोमॅटो, कपाशीची झाडे व त्याला लगडलेल्या काळ्या बोंड्या, कांब फुटलेला शेतमाल, हातात मागण्यांचे पोस्टर्सनी सर्वांचेच लक्ष वेधले. सरकारच्या विरोधातील घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.

यंदा जिल्ह्यात अतिपाऊस पडतो आहे. यामुळे हातातोंडाशी आलेले खरीपातील मूग, उडीद, कपाशी, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, फळपिके व भाजीपाला पिकांचा अक्षरश पाणी व माती चिखल झाला आहे. शेंगातील दाण्यांना कोंब फुटले आहेत. ज्वारी बाजरी काळी पडली असून दाण्यांना कोंब आले आहेत. कपाशीचे बोंड काळी पाडली आहेत. वेचणीस आलेला कापूस भिजून खराब झाला आहे. त्यात वरतून दररोज कुठे ना कुठे पाऊस पडतोय. त्यामुळे पंचनामे कधी होणार व शेतकऱ्यांना मदत कधी देणार आहात. येथे हातचे उत्पादन गेल्याने शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत. रब्बी पेरणी कशी करावी हा प्रश्न आहे. कुटुंबांचा उदनिर्वाह, आरोग्य खर्च कसा भागवावा? त्यामुळे पंचनामे जेव्हा पूर्ण होतील तेव्हा होतील. तत्पूर्वी रब्बी पेरणीसाठी हेक्टरी २५ हजार रुपये तातडीने शेतकऱ्यांना द्यावेत. तसेच नुकसानभरपाई ७५ हजार रुपये हेक्टर प्रमाणे मिळावी. फळबागेसाठी १ लाख रुपये नुकसानभरपाई मिळावी, विमा कंपन्यांनी तक्रार येण्याची वाट पाहू नये, शेतकऱ्यांना कायदेशीर बाबी माहिती नाही. त्यामुळे बांधावर जावून पंचनामे करून वस्तुस्थिती टिपावी व १०० टक्के नुकसान भरपाई मिळावी. पाऊस पडतोय, त्यामुळे कृषी पंप बंदच होते. मान्सून काळातली वीज बिल १०० टक्के माफ करावे. दिवाळी पूर्व शेतकऱ्यांना तातडीची नुकसान भरपाई मिळावी, अशी आग्रही मागणी शेतकरी नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व अर्थ सभापती संतोष जाधव यांनी केली. युवराज ताठे, राजू थोरात, नवाज शेख, सुभाष भोसले, राजू शिंदे, ज्ञानेश्वर तिवाडे, मोहन नरोडे, संतोष तायडे, गोरख चव्हण, संजय चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला.

पोलिस- आंदोलक शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची

शेतकऱ्यांनी हातात पोस्टर्स, पावसाने खराब झालेला शेतमाल हातात घेऊन व घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चा आणला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी खाली येऊन आमची आपबीती ऐकुन घ्यावी, अशी आग्रही मागणी त्यांनी लावून धरली. मात्र, नियम व अटीवर बोट ठेवून पोलिस अधिकाऱ्यांनी आंदोलक शेतकऱ्यांना गेटच्या बाहेर जेथे आंदोलनास परवानगी आहे तेथे आंदोलन करण्यास सांगितले. आम्ही पोलिस अधिकारी असलो तरी शेतकरीच आहोत, तुम्ही नियमाचे पालन करा अथवा आम्हाला सक्ती करावी लागेल, अशा शब्दात दम भरला. यावर शेतकरी संतप्त झाले होते. काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी बळाचा वापर करून सर्व आंदोलकांना बाहेर काढले. येथेही तणावाचे वातावरण होते. दैनिक दिव्य मराठी प्रतिनिधीने पोलिस व आंदोलक शेतकरी यांच्यात समन्वय घडून आणला. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याशी संवाद साधला होता. यामुळे आंदोलक हिंसक झाले नाही व आंदोलक शेतकरी व जिल्हाधिकारी चव्हाण यांनी १५ मिनिट ओला दुष्काळावर चर्चा केली. सर्व शेतकऱ्यांचे म्हणणे एकुण ते सरकारला कळवणार असल्याचेही सांगितले.

वारंवार पंचनामे

ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर तिन्ही महिन्यात अतिवृष्टी व सतत जोरदार पाऊस पडला आहे. त्यामुळे परत परत पंचनामे करावे लागले आहेत. यामुळे अहवाल शासनास पाठवण्यास उशीर होतोय. सरकार या विषयावर गंभीर आहे. कृषी विभाग, विमा कंपन्या, महसूल विभाग असे सर्व यंत्रणा काम करत आहे. शेतकऱ्यांनी टोल फ्री क्रमांक, सर्व विभागाकडे आपल सरकार केंद्रातून तक्रार करावे, नियमाप्रमाणे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळेल, असे आश्वासन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले. तसेच कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून दोन शेतकऱ्यांना मास्कही दिले.

आपचे निवेदन

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्यात यावे व नुकसानग्रस्तांना १०० टक्के भरपाई मिळावी, या मागणीसाठी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ पाटील यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...