आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना:मराठवाड्यामध्ये रुग्णसंख्या घटती; बीड, उस्मानाबादेत मात्र कोरोनाचा फेरा कायम

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाचा मृत्युदर आणि सक्रिय रुग्णांच्या बाबतीत महाराष्ट्र देशात पहिल्या तीन क्रमांकांमध्ये आहे. रुग्णसंख्या घटत असली तरी काही जिल्ह्यांमध्ये चिंताजनक स्थिती असल्याचे दिसते. मराठवाड्यातील काही नांदेड, परभणी, हिंगोली, जालना या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या तुलनेने कमी आहे. म्हणजे येथे २०-२५ दरम्यान रुग्ण आढळले. दुसरीकडे आैरंगाबाद, लातूरमध्ये एका आठवड्यात १०० ते १४० पर्यंत रुग्णसंख्या झाली आहे. परंतु बीड, उस्मानाबादमध्ये चिंता कायम आहे. या दाेन जिल्ह्यांमध्ये ३५० च्या आसपास रुग्ण आहेत. दुसऱ्या लाटेच्या तुलनेत ही रुग्णसंख्या कमी वाटत असली तरी रुग्णांचा आकडा कसा कमी करता येईल, याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. मुक्तिसंग्राम दिनाच्या कार्यक्रमात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही राज्यात हळूहळू रुग्णवाढ होत असल्याने सावधगिरीचा इशारा दिला होता. नागरिकांनीही कोरोना रोखण्यासाठी सहकार्य करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत.

बीडमध्ये आधीपासून चाचण्यांचे प्रमाण जास्त
कोरोना चाचण्यांचे प्रमाणही इतर जिल्ह्यांच्या तुलनेत बीडमध्ये सातत्याने अधिक आहे. गत महिन्यांत सुमारे ५ हजार नागरिकांच्या रोज चाचण्या केल्या जात होत्या. आता हा आकडा अडीच ते तीन हजार इतका असल्याचे समोर येत आहे.

रुग्ण कमी असण्याची कारणे
- बीड, उस्मानाबादमध्ये दोन ते अडीच हजारांवर चाचण्या केल्या जात असतील तर तुलनेत नांदेडमध्ये केवळ १ हजार चाचण्यांचे प्रमाण
- इतर जिल्ह्यांपेक्षा नांदेडमध्ये कोरोनाची दुसरी लाट लवकर सुरू झाली. आता ती आटोक्यात, पण आयसीएमआरच्या सिरो सर्व्हेमध्ये ५० ते ६० टक्के लोकांमध्ये अँटिबॉडी तयार
- परभणीत नियमांचे उल्लंघन व लसीकरण न करता फिरणाऱ्यांवर जिल्हाधिकाऱ्यांची स्वत: रस्त्यावर उतरून कारवाई.
- हिंगोलीत ट्रेसिंग, टेस्टिंग, ट्रीटमेंट या फॉर्म्युल्यावर काम.येथे एक रुग्ण सापडला तर त्याच्या संपर्कातील २० जणांची चाचणी होते.

काही ठिकाणी रुग्णवाढ जास्त का?
- कोणत्याही प्रकारचे कोरोनाचे निकष पाळले जात नाहीत.
- नियम माेडणाऱ्यांवर शासकीय यंत्रणा सक्रियपणे कारवाई करत नाहीत
- उस्मानाबाद, भूम, परंडा, वाशी या तालुक्यांच्या ठिकाणी रुग्ण जास्त आहेत. येथील नागरिकांचे बार्शी, बीडसह सोलापूर तालुक्यातही दळणवळण अधिक आहे
- सामाजिक, राजकीय कार्यक्रमांमध्ये नियम मोडून गर्दी अधिक होत आहे.
- चाचण्यांचे प्रमाण इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जास्त
- नगरमध्ये रुग्णसंख्या जास्त असल्याने लागून असलेल्या बीडमध्येही रुग्ण अधिक.

तिसऱ्या लाटेचा तूर्त धोका नाही, पण खबरदारी हवी
देशात सध्या केरळमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या सर्वाधिक आहे. त्या तुलनेत महाराष्ट्रात रुग्ण कमी असले तरी यात हळूहळू वाढ होत असल्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले होते. सध्या तिसऱ्या लाटेचा धोका नसला तरी सणांमध्ये बाजारात होणारी गर्दी पाहता काहीही होऊ शकते, त्यामुळे खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत.

रुग्ण वाढले की चाचण्या वाढतात
कोरोनाच्या संदर्भातील महाराष्ट्राची स्थिती सध्या नियंत्रणात आहे. काही ठिकाणी रुग्ण वाढत आहेत. मात्र ते प्रमाण अत्यंत कमी आहे. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. परंतु कोरोनाच्या अनुषंगाने दक्षता घेण्याची आवश्यकता आहेच. कोरोना वाढू नये म्हणून सध्या आपण तीन पातळ्यांवर काम करतो आहोत. यात जास्तीत जास्त लसीकरण व्हावे यासाठी वेगाने काम सुरू आहे. जालना जिल्ह्यात तर दररोज २५ हजार लसीकरण होत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, कुठे काही चिंता करण्यासारखी परिस्थिती असेल तर वेळीच दखल घेऊन ती तिथल्या तिथे कशी कमी करता येईल यावर काम सुरू आहे. रुग्णसंख्या जास्त आढळून येत असेल तर चाचण्या वाढवल्या जात आहेत. कोरोनाच्या संदर्भाने आवश्यक काळजी घेतली जात आहे. - राजेश टोपे, आरोग्यमंत्री.

आष्टीत रुग्ण जास्त
मागील काही महिन्यांच्या तुलनेत बीड जिल्ह्यात सध्या रुग्णसंख्या आटोक्यात आहे. तरीही आष्टी तालुक्यात सर्वाधिक रुग्ण अद्याप आढळून येत आहेत. आष्टी हा नगर जिल्ह्याला लागून असलेला तालुका आहे. पुणे, नगर या भागाशी इथल्या नागरिकांचा अधिक संपर्क असल्याने इथे रुग्णवाढ होत असल्याचा अंदाज आहे. - डॉ. शेख रौफ, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड

बातम्या आणखी आहेत...