आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यभरात तुटवडा:म्यूकरमायकोसिसवरील अॅम्फोटेरिसिनच्या 75 हजार व्हायल्सची सीरमकडे मागणी

बाबासाहेब डोंगरे | जालना4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • केंद्र करणार वाटप, कंपन्यांकडे मागणी

राज्यात म्यूकरमायकोसिस आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असून त्यांच्या उपचारासाठी अॅम्फोटेरिसिन - बी इंजेक्शन आवश्यक आहे. मात्र, या अौषधाचा सध्या तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे थेट आरोग्य विभागामार्फत हे औषध खरेदी करून सर्व जिल्ह्यांना वितरित करण्यात येत आहे. यासाठी हाफकिन बायोफार्मास्युटिकल कॉर्पोरेशनचे मॅनेजर डॉ. विजय बाविस्कर यांनी भारत सीरम अँड व्हॅक्सिनकडे ७५ हजार इंजेक्शनच्या व्हायल्सची मागणी नोंदवली, तर एक हजार अॅम्फोटेरिसन इंजेक्शन प्राप्त झाले असून याचे वितरणही सुरू झाल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी “दिव्य मराठी’ला दिली.

मेडिकल स्टोअरमध्ये अॅम्फाेटेरिसिन औषधी उपलब्ध नसल्यामुळे खासगी रुग्णालयात दाखल रुग्णांना ही अौषधी पुरवण्यात यावीत, अशी विनंती अनेक जिल्ह्यांकडून करण्यात आली होती. यामुळे जिल्ह्यातील खासगी वितरकांकडे उपलब्ध इंजेक्शन आवश्यकतेनुसार म्यूकरमायकोसिस रुग्णांच्या प्रमाणात वाटप हे जिल्हाधिकाऱ्यांच्या सल्ल्याने करण्यात यावे. तसेच उपचार करणाऱ्या खासगी रुग्णालयातच उपलब्ध करावे. रुग्णांना लागणारी औषधी एकाच वेळी रुग्ण किंवा रुग्णालयात देऊ नये. प्रत्येक वेळी एक किंवा दोन दिवसांची मात्रा उपलब्ध करून द्यावी. शासकीय रुग्णालयात पुरेसा साठा असेल तरच खासगी रुग्णालयांना देण्यात यावा. साठा उपलब्ध करून दिल्यास औषधांच्या किमतीएवढी रक्कम खासगी रुग्णालयाकडून जिल्हा आरोग्य सोसायटीच्या कोविड - १९ खात्यामध्ये जमा करून घ्यावी व त्यानंतरच औषधाचे वितरण करावे, असे आयुक्त (आरोग्य सेवा) तथा संचालक (राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई) यांनी सर्व जिल्हाधिकारी, जि.प. सीईओ, सिव्हिल सर्जन व डीएचओंना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

केंद्र करणार वाटप, कंपन्यांकडे मागणी
रेमडेसिविरप्रमाणे राज्यांना अॅम्फोटेरिसिन इंजेक्शन वाटपाची प्रक्रिया केंद्र सरकारकडून राबवली जाणार आहे. याबाबत आज सकाळीच बैठक झाली असून मायलॉन लॅबोरेटरीज, सिप्ला लिमिटेड, भारत सीरम लि. अंबरनाथ, जेनेरिक लाइफ सायन्सेस वर्धा, बीडीआर कमला लाइफ सायन्सेस ठाणे यांच्याकडे इंजेक्शन पुरवठ्याची मागणी केली आहे. हाफकिन्सकडूनही टेंडर काढण्यात आले आहे. लवकरात लवकर इंजेक्शन मिळावेत यासाठी शासन प्रयत्नशील आहे. - राजेंद्र शिंगणे, अन्न व औषधी प्रशासनमंत्री

विभागनिहाय इंजेक्शनची मागणी अशी
नाशिक - १० हजार, पुणे - १० हजार ५००, ठाणे - १० हजार, कोल्हापूर ५ हजार, औरंगाबाद - १० हजार, लातूर - ५ हजार, अकोला - ५ हजार, नागपूर - १० हजार ५०० व्हायल्स.

बातम्या आणखी आहेत...