आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धडा शिकवला:औरंगाबादेत काेराेनाग्रस्त महिलेकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या डाॅक्टरला बदडले

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ३४ वर्षीय महिला मनपाच्या काेविड केअर सेंटरमध्ये २३ फेब्रुवारीला भरती झाली हाेती.

डिस्चार्ज देण्याच्या नावाखाली काेराेनाबाधित महिलेला मध्यरात्री केबिनमध्ये बाेलावून घेत शरीरसुखाची मागणी करणाऱ्या मनपाच्या एका डाॅक्टरला रुग्णांनी बदडून काढत धडा शिकवला. अाैरंगाबादच्या पदमपुरा काेविड सेंटरमध्ये मंगळवारी रात्री हा प्रकार घडला. बदनामीच्या भीतीने या महिलेने पाेलिसांत तक्रार देणे टाळले, मात्र मनपाच्या अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली अाहे. त्यावरून अाराेग्य अधिकाऱ्यांनी तातडीने या डाॅक्टरची सेवा खंडित केली अाहे.

ही ३४ वर्षीय महिला मनपाच्या काेविड केअर सेंटरमध्ये २३ फेब्रुवारीला भरती झाली हाेती. उपचाराचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर ३ मार्चला डिस्चार्ज मिळणे अपेक्षित हाेते. या सेंटरमध्ये रात्रपाळीस कामाला असलेल्या डाॅक्टरने २ मार्च राेजी मध्यरात्री १.१७ वाजता माेबाइलवर फाेन करून या महिलेला केबिनमध्ये बाेलावून घेतले. ‘तुमचे डिस्चार्ज पेपर तयार करायचे अाहेत. त्यामुळे तुम्हाला अाणखी तीन दिवस इथे थांबावे लागेल,’ असे त्या डाॅक्टरने रुग्ण महिलेला सांगितले. त्यावर कुटुंबाची अाेढ लागलेल्या महिलेने उद्याच डिस्चार्ज द्या, अशी विनवणी केली. त्यावर ‘तुझी विनंती मान्य करायची असेल तर मी सांगताे तसे कर’ असे म्हणत या डाॅक्टरने संबंधित महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली. या प्रकाराने रुग्ण महिलेची भीतीने गाळण उडाली. डाॅक्टरला नकार देत ती अापल्या वाॅर्डात पाेहाेचली. डाॅक्टरही तिच्या मागाेमाग अाला. मात्र महिलेने त्याला तेथून परत पाठवले. डाॅक्टरने १.५३ वाजता दुसरा काॅल केला. यादरम्यान महिलेने नातेवाइकाला फाेन करून डाॅक्टर त्रास देत असल्याचे सांगितले. त्यानंतरही २.४१ वाजता डाॅक्टरने तिसरा काॅल केला, मात्र महिलेने त्याला दाद दिली नाही. या काेविड सेंटरमध्ये दिव्य मराठीचे पत्रकार दिलीप पाईकराव हे उपचार घेत अाहेत. तीन दिवसांपासून एकाच ठिकाणी उपचार घेत असल्यामुळे या महिलेची त्यांच्याशी ताेंडअाेळख हाेती, त्यांचा माेबाइल नंबरही तिच्याकडे हाेता. घाबरलेल्या महिलेने पहाटे ३.१७ वाजता पाईकराव यांना फाेन करून हा प्रकार सांगितला तसेच मदतीची अपेक्षा व्यक्त केली. पाईकराव व त्यांच्या पत्नी सुकेशिनी यांनी महिलेला धीर दिला.

महापालिका अाराेग्य अधिकाऱ्यांकडे तक्रार : महिलेने काैटुंबिक अडचणींमुळे, बदनामीच्या भीतीने पाेलिसांत तक्रार दिली नाही. महापालिकेच्या अाराेग्य अधिकारी डाॅ.नीता पाडळकर यांच्या नावे मात्र लेखी तक्रार दिली. पाईकराव यांनीही फाेन करून डाॅ. पाडळकर यांना घडला प्रकार सांगितला. त्यांनी बन्सीलालनगरच्या अाराेग्य अधिकारी डाॅ. भामरे यांच्यामार्फत चाैकशी करून संबंधित डाॅक्टरचे काम तातडीने थांबवले.

रुग्णांनी विचारला जाब; नंतर मारहाण
प्रकरण अंगलट येत असल्याचे लक्षात येताच बुधवारी सायंकाळी ४ वाजता डाॅक्टर एका नातलगासह काेविड सेंटरमध्ये अाला. मात्र त्याने रुग्ण महिलेसाेबत केलेला प्रकार कळल्यापासून सर्व रुग्ण त्याच्यावर संतापलेले हाेते. हा डाॅक्टर केबिनमध्ये अाल्याचे कळताच पीडितेसह काही रुग्णांनी तिकडे माेर्चा वळवला अाणि त्याला जाब विचारला. तेव्हा डाॅक्टरने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यावर महिलेसह इतर रुग्णांनी त्यास बदडले.

बातम्या आणखी आहेत...