आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असंतोष:नूपुर शर्मा, नवीनकुमार जिंदल यांच्यावर देशद्राेहाचा खटला चालवण्याची मागणी, सोलापूर, नगर, जळगाव, नाशिकसह राज्यभरामध्ये ठिकठिकाणी मोर्चे

औरंगाबाद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुस्लिम समाजाच्या वतीने भाजपमधून निलंबित नूपुर शर्मा, नवीनकुमार जिंदल यांच्याविरोधात राज्यात ठिकठिकाणी शुक्रवारी मोर्चे, धरणे आंदोलन करण्यात आले. सोलापूर, सातारा, नगर, जळगाव, नाशिकसह राज्यातील प्रमुख शहरांत निषेध नोंदवण्यात आला. दरम्यान, नूपुर शर्मा आणि नवीनकुमार जिंदल यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवावा, अशी मागणी करत सोलापुरात मुस्लिम समाजाने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड मोठा मोर्चा काढला.

राज्यात अनेक ठिकाणी सर्वपक्षीय मुस्लिम समाजबांधवांच्या वतीने शुक्रवारी मोर्चे काढण्यात आले. राज्यातील अनेक शहरांत दिवसभर असेच वातावरण होते. सोलापुरात एमआयएम पक्षाच्या कार्यालयासमोर आंदोलनकर्ते जमले होते. पाहता पाहता अर्धा ते पाऊण तासात सोलापुरात पासपोर्ट कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पूनम गेटपर्यंत गर्दी झाली. सोलापूर शहरामध्ये या संपूर्ण मार्गावर कुठेच जागा शिल्लक राहिली नव्हती. त्यामुळे ऐनवेळी पोलिसांची धावपळ झाल्याचे पाहायला मिळाले. अनेक तरुणांनी काळे ड्रेस परिधान केले होते. या वेळी नूपुर शर्मा आणि नवीनकुमार जिंदल यांच्या पोस्टरला जोडे मारण्यात आले. राज्यातील नगर, नाशिक, जळगाव, औरंगाबादसह अनेक शहरात अशीच स्थिती पाहायला मिळाली.

भाजपला दंगली घडवायच्यात : राऊत : शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत म्हणाले की, भाजपला महाराष्ट्रात दंगली घडवायच्या आहेत. यापूर्वी देशात अशी स्थिती कधीच आली नव्हती. जगभरात आपला निषेध सुरू आहे. जगभरात भारतीय उत्पादनांवर बंदी आणण्यात आली. हे खेदजनक असल्याचेही राऊत म्हणाले.

सोलापुरात लाठीमार
समाजातील ज्येष्ठ मंडळी, माजी नगरसेवक, नेतेमंडळी आदींचे शिष्टमंडळ जेव्हा निवेदन देण्यासाठी जात होते तेव्हा काही तरुण मंडळी त्यांच्यासोबत जाण्यासाठी सुरक्षा भिंतीवर चढून जात होती. या गाेंधळात पूनम गेटमध्ये दाेन महिला अडकल्या, काही लोक खाली पडले तेव्हा त्यांना वाचवण्यासाठी जे धिंगाणा घालत होते त्या तरुणांना पाेलिसांनी लाठीचा प्रसाद दिला. तेव्हा अनेकांनी चपल्या सोडून पळ काढला. मोर्चामध्ये काही तरुणांनी आपापल्या नेत्यांना खांद्यावर घेऊन घोषणाबाजी केल्यानंतर पोलिसांनी प्रकरण हाताळले.

नेमके प्रकरण काय
भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा यांनी एका वृत्तवाहिनीच्या शोमध्ये आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यानंतर याबाबत समाजाने तीव्र निषेध नोंदवला होता. प्रकरण वाढत गेल्यानंतर भाजपने त्यांना पक्षातून निलंबित केले. याप्रकरणी मुंबईत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल असून तपास सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...