आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराघाटी रुग्णालयाच्या विकासासाठी ७१५ कोटी रुपये द्या, असा मागणीवजा प्रस्ताव अधिष्ठाता डाॅ. संजय राठोड यांनी राज्य शासनाकडे पाठवला आहे. या प्रस्तावाला लवकरात लवकर मंजुरी मिळाली तर लोकांना आणखी सोयी-सुविधा देता येतील, असे डाॅ. राठोड म्हणाले. दरम्यान, घाटीच्या अभ्यागत समितीच्या बैठकीत जुनी आणि धोकादायक निवासस्थाने पाडण्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला. ही निवासस्थाने धोकादायक असल्याचा अहवाल आल्यानंतरही कारवाई केली जात नाही. मात्र एखादी घटना घडून लोकांचा जीव गेल्यास घाटीचीच बदनामी होणार आहे. त्यामुळे या प्रकरणात कारवाई करण्याची सुचना अभ्यागत समितीचे अध्यक्ष, आमदार प्रदीप जैस्वाल यांनी केली.
घाटीच्या अभ्यागत समितीची बैठक गुरुवारी झाली. त्यास अॅड. इकबालसिंग गिल, मेहराज इसाक पटेल, भाऊसाहेब जगताप, डॉ. मयूर सोनवणे, नारायण कानकाटे, प्रविण शिंदे, प्रमोद ठेंगडे यांच्यासह घाटीतील सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
५६० कोटी सर्जिकल विभागासाठी
राठोड म्हणाले की, ६० वर्षांपेक्षा जुनी सर्जिकल इमारत ५६० कोटी रुपये खर्चाची नवी इमारत उभारण्याचे ठरवले आहे. पार्किंगसाठी वैद्यकीय कक्षाच्या बाजूच्या मैदानात व्यवस्था केली आहे. त्यावर ४५ कोटी रुपये खर्चाची अपेक्षा आहे. मेडीसीन विभागाच्या इमारतीवर चौथा मजला बांधण्याचा प्रस्ताव आहे. संरक्षक भिंतीसाठी ४.२९ कोटी, ड्रेनेज ३.८९ कोटी खर्च होऊ शकतात. नव्या शवविच्छेदन विभागासाठी ३ कोटी २ लाख रुपये देण्यात आले आहेत. निवासी डॉक्टरांसच्या हॉस्टेलसाठी १४ कोटी मंजूर झाले आहेत. नर्सिंग कॉलेजसाठी ४५ कोटी, फिजीओथेरपी ३० कोटी लागतील. नेफ्रॉलॉजी आणि सीव्हीटीएसच्या इमारतीमध्ये एक मजला बांधणार आहे.
सध्या जी-२०ची तयारी सुरू असल्याने वेळ लागू शकतो
अभ्यागत समिती सदस्य मोहसीन अहेमद म्हणाले की, जुन्या झालेल्या इमारती पडून लोकांचे जीव गेले तर घाटीचीच बदनामी होईल. त्यावर जैस्वाल यांनी सांगितले की, तातडीने पाडापाडी झालीच पाहिजे. मात्र, बैठकीनंतर त्यांनी प्रशासन सध्या जी २० च्या तयारीत असल्याने काही वेळ लागू शकतो, अशी सारवासारव केली.
घुसखोरांचे टप्प्याटप्प्याने पाणी, वीज बंद करणार
डाॅ. राठोड म्हणाले की, घाटीतील ११ जुन्या इमारतीत २५ टक्के कर्मचारी सध्या कार्यरत कर्मचारी आहेत. पाडापाडीपूर्वी त्यांना पर्यायी जागा देऊ, समुपदेशन करू. मात्र, घुसखोरांचे पाणी, वीज टप्प्याटप्प्याने बंद करू.
दोन कोटी कर घेते, पण कचरा उचलत नाही मनपा
घाटीतर्फे मालमत्ता करापोटी मनपाला दरवर्षी सुमारे २ कोटी रुपये दिले जातात. पण घाटीतील कचरा मनपा उचलत नाही. तेव्हा जैस्वाल म्हणाले की, या प्रश्नावर मनपा प्रशासकांशी चर्चा करू.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.