आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारांजणगाव फाटा परिसरात दुचाकीने कंपनीत जाणारी तीन भावंडे ट्रकखाली आल्याने जागीच ठार झाल्याची घटना नुकतीच घडली होती. या घटनेनंतर एमआयडीसी प्रशासनाने तत्काळ या परिसरातील रस्त्याच्या कडेला असणाऱ्या चहाच्या टपऱ्या, पान शॉप आदी अतिक्रमणे जमीनदोस्त करण्याची मोहीम हाती घेतली आहे. मात्र, दुसरीकडे याच रांजणगाव फाट्यावर दररोज सकाळी शेकडोंच्या संख्येत मजूर कामाच्या प्रतीक्षेत रस्त्यावर उभे असतात. विशेष म्हणजे त्यांच्या दिशेने एखादे वाहन येताच रिकाम्या हाताला काम मिळेल या आशेने ते थेट त्या वाहनाच्या दिशेने धाव घेतात. यातून अनेकदा लहान-मोठे अपघातही झालेले आहेत. नुकत्याच घडलेल्या अपघातासारखी गंभीर घटना टाळायची असेल तर रस्त्यावर उभे राहणाऱ्या कामगारांना इतरत्र हलवण्यात यावे, अशी मागणी कामगार- वाहनधारकांतून होत आहे.
वाळूज औद्योगिक परिसरातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या रांजणगाव ग्रामपंचायत हद्दीत सर्वाधिक रोजंदारी, मजुरी व कंत्राटी कामगार वास्तव्यास आहेत. लहान-मोठे चार हजारपेक्षा जास्त उद्योग असणाऱ्या वाळूज औद्योगिक परिसरात सर्वच कामगारांना दररोज नियमित कामावर घेतले जाते, असे नाही. त्यामुळे उर्वरित कामगार रांजणगाव फाटा आणि महावीर चौक ते पंढरपूरदरम्यान असणाऱ्या पुलालगत कामाच्या प्रतीक्षेत रस्त्यावर उभे असतात. यात दर सहा महिन्यांनी कंपनीकडून खंड मिळणाऱ्या कामगारांसह रोजंदारीने कामावर जाणाऱ्या मजुरांचाही समावेश असतो. त्यांना पर्यायी जागा देण्याची गरज आहे.
मोकळा भूखंड मिळावा कामगार सहज उपलब्ध होण्याचे ठिकाण अशी या दोन्ही ठिकाणांची ओळख आहे. कामगारांना तेथे ऊन, वारा आणि पावसातही रस्त्यावरच बसून काम मिळते का याची प्रतीक्षा करत बसावे लागते. अनेकदा काम मिळवण्यासाठी वाहनातून आलेल्या व्यक्तीकडे धावत गेल्याने वाहन कोेंडीसुद्धा निर्माण होते. भविष्यातील गंभीर घटना टाळण्यासाठी या कामगारांसाठी एकतर रांजणगाव फाटा ते एमआयडीसी परिसराच्या दिशेने जाणाऱ्या सर्व्हिस रोडचा वापर करावा अन्यथा ग्रीन झोनचा एखादा मोकळा भूखंड उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी दत्तात्रय लुटे यांनी केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.