आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लेबर काॅलनीवर कारवाई:338 घरांवर बुलडोझर; रहिवाशांना विभागीय आयुक्तांचा दिलासा, म्हणाले - बेघरांचे पुनर्वसन करू

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासकीय कर्मचाऱ्यांची 65 वर्षांपासून वसाहत असलेली लेबर काॅलनी जमीनदोस्त करण्यास आज पहाटे 6 वाजेपासूनच सुरूवात झाली. लेबर काॅलनीतील 338 घरांवर बुलडोझर फिरवण्यात येत आहे. आज दिवसभार व पुढे 2 दिवस ही कारवाई सुरू राहणार आहे. आज पहाटे पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात पाडापाडीला सुरूवात होताच रहिवाशांना अश्रू अनावर झाले. पाडापाडीचा प्रचंड धक्का बसल्याने येथील रहिवाशी मंगला लेकुरवाळे यांची तब्येत बिघडली व त्यांना रुग्णवाहिकेतून दवाखान्यात हलवण्यात आले. काही नागरिकांनी या कारवाईला विरोध केला. मात्र, पोलिसांनी विरोध करणाऱ्या नागरिकांना बाजूला करत जेसीबीच्या सहाय्याने घरे पाडण्यास सुरुवात केली.

दरम्यान, ही कारवाई सुरू असतानाच विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा आयुक्त अस्तिककुमार पांडे यांनी लेबर कॉलनी परिसराची संयुक्त पाहणी केली.

अनेक वर्षांपासून राहत असलेले घर पाडल्याचे पाहत असताना अनेक महिलांना अश्रू अनावर झाले.
अनेक वर्षांपासून राहत असलेले घर पाडल्याचे पाहत असताना अनेक महिलांना अश्रू अनावर झाले.

रहिवासी रस्त्यावर, पर्यायी घरे देण्याची मागणी
आज पहाटे प्रशासनाने कारवाई सुरू करताच रहिवासी आक्रमक झाले होते. मात्र, मोठ्या फौजफाट्यासह घटनास्थळी तैनात पोलिसांनी या रहिवाशांना बाजुला केले. त्यानंतर हुंदके देत आम्हाला घराबाहेर सामान काढण्यासाठी 5 मिनिटे तरी द्या, अशी मागणी रहिवासी करत होते. मात्र, प्रशासनाकडून अतिरिक्त वेळ देण्यात आली नाही. यावेळी अश्रू अनावर झालेल्या रहिवाशांनी किमान पर्यायी सोय करुन देण्याची मागणी केली. एक रहिवासी म्हणाले, माझा जन्म, माझे लग्न, माझे मुल-बाळं इथच झाले आहेत. मात्र सरकारने आम्हाला एकदम बेघर करून टाकले आहे. आजच्या कारवाईमुळे माझे पुर्ण कुटुंब रस्त्यावर आले आहे. कारवाईपुर्वी सरकारने आमचे पुनर्वसनदेखील केले नाही, असा आक्रोश रहिवाशांनी केला.

बेघरांचे पुनर्वसन करू - विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर
लेबर कॉलनीतील घरे धोकादायक स्थितीत होती. ती कधीही पडण्याची भीती होती. त्यामुळे त्यावर कारवाई करणे आवश्यक होते, असे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सांगितले आहे. जिल्हाधिकारी व औरंगाबाद पालिका आयुक्तांसह आज त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, आज कारवाई अत्यंत चांगल्या पद्धतीने झाली आहे. कायदेशीर लढाई संपल्यानंतर रहिवासी तसेच येथील राजकीय नेत्यांनीही आम्हाला सहकार्य केले आहे. आजच्या कारवाईमुळे जे खरेच बेघर झाले आहेत, त्यांची यादी करण्याची सूचना औरंगाबाद पालिका आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. अशा बेघरांचे पुनर्वसन केले जाईल. त्यांना पर्यायी घरे दिले जातील, असे सुनील केंद्रेकर यांनी सांगितले आहे. त्यांच्या या घोषणेमुळे रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, जे गुंडगिरी करून या कॉलनीत शिरले आहेत, त्यांना आम्ही अजिबात थारा देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आम्ही आमचा आत्मा इथे सोडून जातोय!
‘आम्ही फक्त अनेक वर्षे राहत असलेली घरेच साेडत नाहीत, तर आमचा आत्मा इथे साेडून जात आहाेत. इथल्या मातीशी जुळलेली नाळ ताेडून जावे लागत आहे. इथल्या प्रत्येक गोष्टीत आमचा जीव लागलाय, ताे साेडून जावे लागत आहे...’ भीमाबाई थाेरात रडत रडत आपल्या भावना व्यक्त करत हाेत्या. लेबर काॅलनीतील प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीची हीच भावना आहे. त्यापूर्वी मंगळवारी बहुतांश लाेकांनी आपापल्या घरातील सामान दुसरीकडे स्थलांतरित केले होते.

कारवाईदरम्यान रहिवासी आपले अश्रू रोखू शकले नाहीत.
कारवाईदरम्यान रहिवासी आपले अश्रू रोखू शकले नाहीत.

50 वर्षांपासून इथे राहतो!
सईदा सांगत हाेत्या, २४ जुलै १९८० इथे राहायला आले. १९९३ मध्ये पती निवृत्त झाले. माझ्या मुलांचे आणि मुलीचे लग्नही झाले. आमचं बारा जणांचं कुटुंब आहेे. आता संसार उघड्यावर आलाय. इतक्या लोकांना राहण्यासाठी जागा कुठे मिळणार?’ भीमाबाई थोरात म्हणाल्या, ‘चार दिवसांपासून आम्हाला झाेप नाही. मला कॅन्सर आहे. अनेकांचा बीपी-शुगर वाढलीय. ५० वर्षांपासून आम्ही इथं राहत आहोत. आपलंच घर समजून आम्ही ते समजल हाेतं, वेळाेवेळी डागडुजी केली. एकदा आमच्या घरात एक ट्रकच घुसला हाेता तेव्हा नुकसान झालं. आम्ही स्वखर्चाने घर दुरुस्त केलं, कंपाउंड वाॅल बांधली. मात्र प्रशासनाने आमचा विचार केला नाही.’

प्रशासनाने पहाटेच कडेकोट बंदोबस्तात कारवाईला सुरूवात केली.
प्रशासनाने पहाटेच कडेकोट बंदोबस्तात कारवाईला सुरूवात केली.

वरळीत एक न्याय, औरंगाबादला वेगळा का?
संजय थोरात म्हणाले, वरळीत सरकारी कर्मचाऱ्यांची घरे नियमित करण्यात आली. मग औरंगाबादला वेगळा न्याय का? यापूर्वी इक्बालसिंग यांच्यापासून अनेक जिल्हाधिकाऱ्यांच्या काळात हा विषय आला. पण त्यांनी कारवाई केली नाही. आता पाेलिसांच्या धाकाने कारवाई हाेतेय. लोकप्रतिनिधी, प्रशासन कुणीच आमच्या मदतीला येत नाही.’ लेबर काॅलनीतील घरे साेडून दुसरीकडे जाताना एकमेकींचा निराेप घेणाऱ्या अनेक वर्षांच्या शेजारणींना अश्रू अनावर झाले हाेते.

कारवाईदरम्यान मंगला लेकुरवाळे यांची तब्येत बिघडल्याने रुग्णवाहिकेतून दवाखान्यात हलवले.
कारवाईदरम्यान मंगला लेकुरवाळे यांची तब्येत बिघडल्याने रुग्णवाहिकेतून दवाखान्यात हलवले.

मंगळवारीच घरांचे पाणी, वीज केले बंद
लेबर काॅलनीच्या पाडापाडीची प्रशासकीय पातळीवर मंगळवारीच जय्यत तयारी करण्यात आली. त्यासाठी 30 जेसीबी, 8 पोकलेनसाेबत 200 मजूर तैनात केले आहेत. सायंकाळीच पथकांनी लेबर काॅलनीतील सर्व घरांचे वीज व पाणी कापले होते.

काँग्रेसचे नेते चंद्रभान पारखे यांनी घर सोडण्यास नकार दिल्यानंतर त्यांना रुग्णवाहिकेतून बाहेर काढण्यात आले.
काँग्रेसचे नेते चंद्रभान पारखे यांनी घर सोडण्यास नकार दिल्यानंतर त्यांना रुग्णवाहिकेतून बाहेर काढण्यात आले.

​​​​​अखेरचा निरोप : मी लेबर कॉलनी बोलतेय..!

हे मार्ग आज टाळा
- लेबर कॉलनी शहराच्या मध्यभागी असल्याने याच्या चहुबाजूने महत्त्वाचे रस्ते लागतात. त्यामुळे या परिसराकडे जाणाऱ्या १५ मार्गांवर पोलिसांनी ब्लॉकिंग पॉइंट तयार केले आहे. शिवाय पोलिस, मजुरांव्यतिरीक्त इतरांना परिसरात मज्जाव करण्यात आला आहे. इतरांना पर्यायी मार्गाने जाण्याच्या सूचना केल्या आहेत.
- हर्सूल टी पाॅइंटकडून दिल्ली गेटमार्गे मध्यवर्ती बसस्थानकाकडे जाणारी व येणारी एसटी महामंडळ, इतर सर्व वाहने हर्सूल टी पॉइंट ते जळगाव टी पॉइंटमार्गे पुढे जातील.
- उध्दवराव पाटील चौक, सत्यविष्णू रुग्णालय, एन-१२ ते टीव्ही सेंटरमार्गे पुढे जातील.
- भडकल गेट तसेच टाऊन हॉलकडील वाहने मनपा, जुना बाजार, सिटी चौक पोलिस ठाण्यासमोरून पुढे जातील.
- पंचायत समिती कार्यालयासमोरून चंपा चौकमार्गे पुढे जातील.

इनपूट - प्रवीण ब्रह्मपुरकर

बातम्या आणखी आहेत...