आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सर्वेक्षण:डिजिटल साधने हाताळत असूनही 64 टक्के वाचकांना वृत्तपत्र वाचण्याचीच ओढ

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाविद्यालयीन विद्यार्थिनीच्या सर्वेक्षणातून वास्तव आले समोर, विश्वासार्हतेवरही शिक्कामोर्तब

कोरोनाच्या साथीमुळे असलेले लाॅकडाऊन आणि ठिकठिकाणी तयार करण्यात आलेल्या प्रतिबंधित क्षेत्रामुळे अनेक वाचकांपर्यंत वृत्तपत्र पोहोचू शकत नाही. काही ठिकाणी वाचकांनीच वृत्तपत्र घेणे थांबवले आहे. मात्र, असे असले तरी ६३.७ टक्के लोकांना तातडीने वृत्तपत्र वाचन पुन्हा सुरू करण्याची इच्छा आहे. विशेष म्हणजे हे सर्व वाचक डिजिटल साधनांचा वापर करण्याची सवय असलेले आहेत. कारण हे सर्वेक्षण गुगल फाॅर्मच्या माध्यमातून प्रश्नावली पाठवून करण्यात आले आहे.

औरंगाबाद येथील सिद्धी सराफ ही पुण्याच्या माॅडर्न महाविद्यालयात अर्थशास्त्रातील पदवीच्या दुसऱ्या वर्षाचे शिक्षण घेते आहे. ज्यांच्याकडे वृत्तपत्र जाऊ शकत नाही त्यापैकी बहुतांश वाचकांना छापील वृत्तपत्राची उणीव प्रकर्षाने जाणवते आहे ही बाबही तिने केलेल्या या पाहणीतून समोर आली आहे.

लाॅकडाऊनचा वृत्तपत्रांवरील परिणाम समजून घेणे आणि वाचकांच्या वृत्तपत्र वाचनाच्या सवयीत या काळात काही बदल झाला आहे का, हे पाहाणे हा या सर्वेक्षणाचा हेतू होता. ज्यांना प्रश्नावली पाठवली होती त्यांच्यापैकी २३७ जणांनी ती भरून पाठवली आहे. त्यात ६९ टक्के शहरी, २५ टक्के महानगरातील तर ६ टक्के ग्रामीण भागातील वाचक आहेत. २८.५ टक्के पदवीधर, ४३ टक्के पदव्युत्तर पदविधारक, २६.३ टक्के प्रोफेशनल्स आणि उर्वरित पदवी न मिळवलेले आहेत. २५ टक्के १८ ते २५ वयोगटातील, ३१ टक्के २६ ते ४० वयोगटातील तर ४४ टक्के ४१ पेक्षा अधिक वयोगटाचे वाचक आहेत.

लाॅकडाऊन आणि प्रतिबंधित क्षेत्रांच्या काळातही ४४.७ टक्के लोकांकडे वृत्तपत्र सुरू आहे, ही बाबही पुढे आली आहे. ज्यांच्याकडे सध्या ते येत नाही त्यांच्यापैकी ६०.८ टक्के वाचकांनी सांगितले की, त्यांना वृत्तपत्रांची गैरहजेरी प्रकर्षाने जाणवते आहे. २८.७ टक्के लोकांनी पर्याय नसल्याने आहे त्या परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे म्हटले आहे. केवळ १०.२ टक्के लोकांना वृत्तपत्र घरी येत नसल्यामुळे फारसा फरक पडला नाही, असे वाटते आहे.

विश्वासार्हतेवरही शिक्कामोर्तब

प्रश्नावली भरून पाठवणाऱ्यांपैकी सर्वाधिक लोकांना मुद्रित माध्यम म्हणजे वृत्तपत्र हेच अधिक विश्वासार्ह आहे असे वाटते. त्या बाबतीत त्यांनी डिजिटल माध्यमाच्या तुलनेत वृत्तपत्राला दुपटीपेक्षा अधिक गुण दिले आहेत. डिजिटलपेक्षा वृत्तपत्रातील बातम्यांमधून कितीतरी अधिक समाधान मिळते, असेही या वाचकांनी नमूद केले आहे. डिजिटल माध्यम हाताळायला सोपे आणि स्वस्त असल्याचे मानणाऱ्यांची संख्या मात्र जास्त आहे. ६६.७ टक्के लोकांना डिजिटल माध्यमातील जाहिराती अधिक त्रासदायक वाटतात,असे त्यांनी म्हटले आहे. असे असले तरी ५८.८ टक्के सहभागी उत्तरदात्यांनी माध्यम समूहांनी दोन्ही पर्याय उपलब्ध करून द्यावेत, अशी शिफारस केली आहे.

बातम्या आणखी आहेत...