आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:एमपीएससी उत्तीर्ण होऊनही 429 उमेदवारांच्या नियुक्त्या रखडल्या

औरंगाबाद / महेश जोशीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात आरोग्य आणि पोलिस भरतीचा घोळ सुरू असतानाच गेल्या २ वर्षांत एमपीएससी आणि सरळसेवा भरती परीक्षा उत्तीर्ण होऊनही नियुक्त्या न मिळालेल्या उमेदवारांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सामान्य प्रशासन खात्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कोरोनामुळे वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एमपीएससीच्या २ संधी देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मात्र, भरतीची जबाबदारी असणाऱ्या त्यांच्याच खात्यात ४२९ उमेदवारांच्या नियुक्तीची टाळाटाळ सुरू आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा उत्तीर्ण होऊनही नियुक्ती न मिळाल्याने स्वप्निल लोणकर या तरुणाने पुण्यातील फुरसंगी येथे २९ जुलै रोजी आत्महत्या केली होती. हे वादळ शांत होण्याआधीच आरोग्य खाते आणि आता पोलिस भरतीत गोंधळ उडाला आहे. या गोंधळात विविध खात्यांच्या परीक्षा उत्तीर्ण ४२९ उमेदवारांचे प्रश्न दुर्लक्षित राहत आहेत.

४२९ उमेदवारांची चूक काय?
- कोरोनाआधी आयोगाने ८३३ सहायक मोटार वाहन निरीक्षक पदांकरिता ६ ऑगस्ट २०१७ रोजी मुख्य परीक्षा घेतली होती.
- अंतिम निकाल ९ सप्टेंबर २०१९ रोजी लागला. ८३२ उमेदवारांची कागदपत्रांच्या पडताळणीनंतर नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आली. मात्र, मार्च २०२० पासून लॉकडाऊन लागला.
- यामुळे मोटार वाहन विभागाला ८३२ पैकी ७८५ उमेदवारांचीच नियुक्ती प्रक्रिया पार पाडता आली. उर्वरित ४७ जागांवरची नियुक्ती रखडली. नियुक्ती मिळालेले उमेदवार कामावर रुजू झाले. त्याचप्रमाणे इतर पाच खात्यांमधील नियुक्त्या अद्यापही रखडलेल्याच आहेत.

गुणवत्तेचा विचार करा
लॉकडाऊनमुळे नियुक्त्या मिळाल्या नाहीत, याच आमची काय चूक? कोरोनाकाळात सर्व परीक्षा, मुलाखती पुढे ढकलल्या असताना आमच्या नियुक्तीला मुदतवाढ द्यायला हवी. आम्ही कष्ट घेऊन परीक्षा उत्तीर्ण झालो. शासनाने आता नियुक्त्या द्याव्यात. -राजकुमार देशमुख,

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून नियमांची आडकाठी
सामान्य प्रशासन विभागाच्या २ ऑगस्ट २०१९ च्या परिपत्रकानुसार निकालानंतर एक वर्षांत नियुक्ती प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. या प्रकरणात नियुक्ती प्रक्रियेच्या वर्षभराच्या मुदतीपैकी ६ महिने लॉकडाऊनमध्ये वाया गेले. तरी परिपत्रकाचा आधार घेत आयोगाने नियुक्तीचे प्रस्ताव फेटाळून लावले. उमेदवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार, दत्तात्रय भरणे यांना निवेदन दिले आहे. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. उलट लेखा व कोषागार विभागाने ९ ऑगस्ट २०२१ रोजी एक पत्र काढून १३२ उत्तीर्ण उमेदवारांच्या नियुक्त्याच रद्द केल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...