आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हाधिकारी यांनी घेतला पुढाकार:औरंगाबाद खंडपीठाने आदेश देऊनही शिवाजीनगर भुयारी मार्गाच्या कामात प्रगती शून्यच

औरंगाबाद9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवाजीनगर रेल्वेगेटवर मागील काही वर्षांपासून वाढलेली वर्दळ लक्षात घेऊन भुयारी मार्गाची गरज औरंगाबाद खंडपीठाने प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. औरंगाबाद खंडपीठाही मागील चार वर्षांपासून भुयारी मार्गाचा प्रत्येक सुनावणीत पाठपुरावा करीत आहे. परंतु कुभकर्णी झोपेत असलेल्या प्रशासनाला जाग येताना दिसत नाही. औरंगाबाद खंडपीठाने निर्वाणीचा इशारा देऊनही प्रशासनाचे कासवगतीने काम सुरू आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी भुसंपादनाचे आदेश काढल्यानंतर आता भुयारी मार्गाचा नकाशा बनविण्याची निविदा मागविण्याची प्रक्रिया सुरू होईल. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यासमोर यासंबंधीचा प्रस्ताव आहे.

शिवाजीनगर भुयारी मार्ग बांधण्यासाठी मनपा, राज्यशासन आणि रेल्वे यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात आली होती. औरंगाबाद खंडपीठात दाखल 96।2013या पार्टी इन पर्सन याचिकेत खंडपीठाने वेळोवेळी निर्देश दिलेले आहेत. बीड बायपास परिसरात नागरी वसाहत वाढल्यामुळे शिवाजीनगर येथील रेल्वे फाटक क्रमांक ५५ येथे उड्डाणपुल तांत्रिकदृष्ट्या शक्य नसल्यामुळे तेथे भुयारी मार्ग यासंबंधी चाचपणी केली असता पर्याय योग्य असल्याचे शासनाच्या विविध विभागांनी स्पष्ट केले. भुयारी मार्गासाठी 38.55 कोटी रूपयांची आवश्यकता असल्याचे शासन स्तरावर सर्वेक्षण अंती स्पष्ट झाले. संबंधित खर्चास मंजुरी प्रदान केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचा हिस्सा 22 कोटी 5 लाख तर रेल्वेने यासाठी 2021-22 च्या अर्थसंकल्पात 16.55 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली. सेव्हन हिल्स ते देवळाई चौक रस्ता महापालिकेच्या हद्दीत येत असल्याने महापालिकेचा हिस्साही भुयारी मार्गासाठी निश्चित करण्यात आला. महापालिकेकडून 6 कोटी 4 लाख 46 हजार 667 इतक्या रक्कमेची आवश्यकता होती. मनपाची आर्थिक स्थिती बिकट असल्याचे खंडपीठाच्या सुनावणीप्रसंगी निदर्शनास आल्याने संबंधित हिस्सा शासनाने भरावा असे सूचित करण्यात आले होते. राज्यशासनाने यासंबंधीची रक्कम देण्याचे कबूल केले होते.

जिल्हाधिकारी यांनी घेतला पुढाकार

जिल्हाधिकारी यांनी यात पुढाकार घेत 17 जून रोजी भुसंपादनाचे आदेश काढले. सातारा देवळाई भागासह बीड बायपास आणि इतर उपनगरातील एक लाखांवर लोकसंख्या लक्षात घेता या भुयारी मार्गाचे महत्व अधोरेखित होते.

तांत्रिक सल्लागार नेमलेला नाही

जिल्हाधिकारी यांनी भुसंपादनाचे आदेश काढल्यानंतर आता तांत्रिक सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू होईल. यासाठी सां. बा. अधीक्षक अभियंता यांनी मुख्य अभियंता सां. बा. विभाग औरंगाबाद यांच्याकडून सविस्तर प्रस्ताव पाठविल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. मुख्य अभियंता आता तांत्रिक सल्लागाराची नेमणूक करतील. यासाठी निविदा मागविण्यात येईल. निविदा अंतिम झाल्यानंतर तांत्रिक सल्लागार संस्था नकाशा बनविण्याचे काम करेल. संबंधित नकाशा तयार केल्यानंतर रेल्वेच्या समितीला दाखविला जाईल. दोघांची सहमती झाल्यानंतर भुसंपादनाच्या कामाला प्रारंभ करण्यात येईल.

बातम्या आणखी आहेत...