आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकर्नाटक विधानसभा निवडणुकीत पराभव होताच भारतीय जनता पक्ष सावध भूमिकेत आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी शहर आणि जिल्ह्याच्या कोअर कमिटीची बैठक घेतली. शहरातील नगरसेवक, माजी नगरसेवक आणि इतर इच्छुक पदाधिकाऱ्यांना पक्षात प्रवेश देऊन कुठल्याही परिस्थितीत महापालिकेची निवडणूक जिंकण्याचा निर्धार करण्यात आला. संघटनात्मक कार्यक्रम आणि बूथ रचनेचा आढावा घेऊन मनपासह लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकीसाठी पक्षाची ताकद वाढवण्याचे संकेत देण्यात आले.
सकल राजपूत समाजाच्या मेळाव्यानिमित्त केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह दुपारी ४ वाजता शहरात दाखल झाले. तत्पूर्वी उपमुख्यमंत्री फडणवीस शहरात आले होते. त्यांनी पूर्व आणि मध्य विधानसभा मतदारसंघाची बैठक घेतली. पक्षाने राबवलेल्या कार्यक्रमासंबंधी शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी माहिती सादर केली. जिल्ह्याच्या ४६ पदाधिकाऱ्यांच्या कोअर कमिटीसोबत चर्चा करून आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीचा आढावा घेतला. शहर भाजपने राबवलेल्या कार्यक्रमांची प्रशंसा करताना फडणवीस यांनी आगामी काळात पक्षाच्या वतीने नवीन कार्यक्रम दिले जातील, असे सांगत पुन्हा एकदा जोमाने कामाला लागावे, असे सांगितले. बूथ सशक्तीकरण, मन की बात, धन्यवाद मोदी, स्वातंत्र्यवीर सावरकर यात्रा, शहराच्या नामांतरास पाठिंबा दर्शवणारी अडीच लाख निवेदने आदींमध्ये भाजप राज्यात क्रमांक एकवर असल्याचे फडणवीस म्हणाले. या वेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर, सहकारमंत्री अतुल सावे, आ. हरिभाऊ बागडे आदींची उपस्थिती होती.
शिवसेना कमकुवत झाल्याचा फायदा घेणार
मनपा निवडणुकीत सत्तरपेक्षा जास्त जागा लढवाव्या लागतील. तेव्हा कुठे सत्तेचे समीकरण जुळवण्यात यश येईल. शिवसेना कमजोर झाल्याने आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेब ठाकरे शिवसेना, रिपाइं आठवले गट आदींसह काही प्रभावी संघटनांना सोबत घेऊन मनपा निवडणुकीला सामोरे जाण्याची रणनीती भाजप आखत आहे. सर्वोच्च न्यायालयाचा १६ आमदारांसंबंधीचा निकाल आल्यानंतर राज्य सरकारचा आत्मविश्वास वाढला आहे. शिवसेनेतील अजून काही पदाधिकारी भाजपात येणार आहेत.
लोकसभा मतदारसंघाची रचना, जातीय समीकरणाचा सर्व्हे
मागील तीन वर्षांपासून भाजप लोकसभेची चाचपणी करीत आहे. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाची रचना, जातीय समीकरण, उमेदवार यासंबंधी सर्वेक्षण सुरू आहे. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे याची जबाबदारी आहे. भाजपचा संभाव्य उमेदवार कोण असेल, याचा अहवालही यादव यांनी सादर केला आहे. फडणवीस यांनी महापालिका निवडणुकीचे निमित्त समोर करत त्याआडून लोकसभेची चाचपणी केली. शिवसेनेचे विभाजन झाल्यानंतर भाजपच्या आकांक्षा उंचावल्या आहेत. महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी रणनीती आखली जात आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.