आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न झालेल्या ‘घरवापसी’ची कथा..!:हिंदू धर्मात कथित प्रवेशाच्या चर्चेने जालना जिल्ह्यातील देवगाव खवणे गाव चर्चेत

देवगाव खवणे / महेश जोशीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाड्याच्या जालना जिल्ह्यातील देवगाव खवणे गावातल्या माळावरील वस्तीत प्रचंड अस्वस्थता हाेती. वस्तीतील काही लोकांनी ख्रिश्चन धर्मातून हिंदू धर्मात “घरवापसी’ केल्याच्या चर्चेने ग्रामस्थ काहीसे नाराज व संतप्त आहेत. कथित घरवापसीचा दावा केला जात असलेल्या लाेकांच्या पिढ्यान््पिढ्या हिंदूच आहेत. त्यांच्यापैकी एकही ख्रिश्चन नाही. मग आपल्याच धर्मात “घरवापसी’ कशी शक्य आहे? असा प्रश्न त्यांना पडलाय.

नाताळच्या दिवशी (२५ डिसेंबर २०२१) औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणच्या नाथमंदिरात १२ ख्रिस्ती कुटुंबातल्या ५३ जणांनी हिंदू धर्मात प्रवेश केल्याच्या बातम्या माध्यमात झळकल्या. सोशल मीडियावर पाेस्ट व्हायरल झाल्या. “घरवापसी’च्या बातम्यांमुळे काही जणांच्या आनंदाला उधाण आले, तर एक वर्ग नाराज झाला. परंतु ही स्थिती दोन दिवसही टिकली नाही. कारण धर्मांतर सोहळा झालाच नाही, असे दोन्ही बाजूने सांगितले जाऊ लागले. मंठा तालुक्यातील देवगाव खवणे गावात जाऊन ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने वस्तुस्थिती जाणून घेतली तेव्हा धक्कादायक खुलासे झाले.

देवगाव खवणे हे २४११ लोकवस्तीचे गाव शेतीवाडीने समृद्ध. हिंदू आणि दलित-मांतग हे दोन समाज एकत्रित राहतात. एकही मुस्लिम कुटुंब नाही. मुख्य गावात हिंदूंची, तर अर्धा किलोमीटर अंतरावरील माळावर मांतग, दलित समाजाची ३०० घरे आहेत. पारावर मंदिराच्या बाजूलाच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि त्याला लागून जिल्हा परिषदेची शाळा आहे. माळावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मंठा तालुक्यातील सर्वात मोठा पुतळा आहे. चाैकात भगवा, निळा आणि पिवळे झेंडे फडकताना दिसतात.

बीएस्सीतील तरुण गोपाळ मोरे म्हणाला, ‘धर्मांतराच्या घटनेने गावची बदनामी झाली. ज्यांना ख्रिश्चन दाखवले जातेय ते हिंदूच आहेत. आम्ही लहानपणापासून बघतोय. ते मंदिरात येतात.’ स्वेटर घातलेले कुलकर्णी काका सुरुवातीला काहीच बाेलण्यास तयार नव्हते. नंतर म्हणाले, हे ‘हे लोक तर सोडा, गावात आणि परिसरात एकही ख्रिश्चन नाही. जे आहेत ते हिंदू आणि दलित आहेत. ते आपल्याच धर्मात परत कशाला येतील?’

गोपाळ मग माळावरील मातंग वस्तीत घेऊन गेला. घरवापसीच्या फोटोत दिसणारे पन्नाशीतील बन्सी आणि शेषाबाई साळवे यांच्या पत्र्याच्या घरासमोर वस्तीतील बरेच लोक जमले होते. बन्सी व शेषाबाई जालन्यात राहतात. बन्सी पोतराज, तर शेषाबाई देवीचा जाेगवा मागून उदरनिर्वाह करते. त्यांचा मुलगा सुखदेव येथे कुटुंबासोबत राहतो. त्याच्या घराच्या कोपऱ्यात जुने देवघर दिसले. दिवाळीच्या पणत्या पडून होत्या. देवघरात कृष्ण, विठ्ठल-रुक्मिणी, सप्तश्रृंगी देवी आदी फाेटाेही हाेते. शेतातून आणलेला कापूस देवासमोर ठेवला होता. सुखदेवची १२ वर्षांची मुलगी रूपाली म्हणाली, ‘पप्पा दररोज खूप वेेळ पूजा करतात. शेतात कामाला जातात. आम्ही होळी, नवरात्र, दिवाळी साजरी करतो.’

मातंग समाजाचे महादेव साळवे म्हणाले, ‘पोतराज आणि जाेगवा मागणारे ख्रिश्चन असतात का? त्यांच्या घरात बघा, देवघरात सर्व देव आहेत. काही लोकांनी चुकीची चर्चा घडवून आणली अन् लोकं आमच्याकडे शंकेने बघू लागलेत. पैशासाठी आधी ख्रिश्चन धर्म स्वीकारला. पैसे संपले तर आता हिंदू धर्मात आले...’ असे काहीबाही बाेलतात. आधी तर आम्हालाही खरंच वाटलं. मग समोर बसून खात्री करून घेतली. आम्ही हिंदू होतो, हिंदू आहोत आणि हिंदूच राहणार. गावात ८ मंदिरे व १ बुद्धविहार आहे. ना मशीद, ना चर्च... कोणी गावातून बाहेर गेलेले नाही, गावात धर्मप्रसारक आलेले नाहीत, कोणी आंतरजातीय विवाह केला नाही. मग धर्मांतर कसे होईल? अफवा पसरवून आमचे जगणे अवघड करून टाकलेय.’

सरपंच डॉ. संदीप मोरे म्हणाले, ‘शांततप्रिय गावातील लोकांच्या भोळेपणाचा फायदा उचलून काही लाेक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण हा कट फसलाय.’ हॉटेलमध्ये कुक असणारा तरुण कैलास धायडे याने धर्मांतराच्या बातम्या एेकून धक्का बसल्याचे सांगितले.

पैठण हे धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर. अशा पवित्र ठिकाणी हिंदूंच्या घरवापसीला मोठे महत्त्व मिळू शकते. ही बाब लक्षात घेऊन, नाताळच्या दिवशी “घरवापसी’ची ठरवूून चर्चा घडवून आणण्यात आली. यासाठी देवगाव खवणेतील लोकांची निवड करण्यात आली. येथील मातंग समाजातील लोक नाथ महाराजांचे भक्त आहेत. दरवर्षी नाथषष्ठीला पैठणला जातात. दोन वर्षे कोरोनामुळे जमले नाही. पुन्हा लॉकडाऊन लागायच्या आधी जाऊन येऊ असे सांगत २५ डिसेंबरला ते पैठणला गेले आणि ही घटना घडली, असे गावकऱ्यांच्या बाेलण्यातून जाणवले.

पनवेलचेे दांपत्य करणार धर्मांतर, चार मुले मात्र हिंदू धर्मातच राहणार
मूळ देवगावचे रहिवासी आणि सध्या मुंबईत असणारे किसन साळवे आणि त्यांची पत्नी लता हे ख्रिश्चन धर्म स्वीकारणार आहेत. मात्र, त्यांचा पैठणच्या घटनेशी संबंध नाही. १५ वर्षांपासून ते बाहेरगावीच राहतात. पनवेलमध्ये फेरीवर लसून विकतात. १० वर्षांपूर्वी लता यांना कॅन्सरचे निदान झाले. शेजारच्या सांगण्यावरून ते वसईच्या चर्चमध्ये गेले. थाेडे उपचार व प्रार्थना केली व बरे वाटले. त्यांना ३ मुले व १ मुलगी आहे. येथून त्यांचा ख्रिश्चन धर्मावर विश्वास जडला. मुले मात्र हिंदू धर्मातच राहतील, असे किसन यांनी सांगितले. पैठण येेथे गेलेल्या बन्सी व शेषाबाई यांचे ते चुलते आहेत.

धर्मांतर ही एेच्छिक बाब : शिंदे
ख्रिश्चन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष आशिष शिंदे म्हणाले, धर्मांतर एच्छिक बाब आहे. राज्यघटनेने दिलेल्या सहा मूलभूत अधिकारात २५ ते २८ कलमात धर्मस्वातंत्र्याचा अधिकार आहे. ख्रिश्चन धर्मात गेल्यास खूप पैसे मिळतात हा गैरसमज आहे. उलट प्रत्येक ख्रिश्चन व्यक्तीस कमाईच्या १० टक्के रक्कम चर्चला द्यावी लागते. पैठणच्या घटनेत पुजाऱ्यांना अंधारात ठेवले असावे. पण काही संघटना घरवापसीतून संदेश देण्यात यशस्वी झाल्या हे दुर्दैवी आहे.’

पैठणच्या मंदिरात झाला सत्कार
नाथमंदिरातील शांतिब्रह्म नाथ महाराजांच्या समाधीपुढे १२ ख्रिस्ती कुटुंबातील ५३ जणांनी हिंदू धर्मात घरवापसी केल्याचे सांगण्यात आले. ब्राह्मण सभेने यासाठी पुढाकार घेतला. वेदशास्त्रसंपन्न पंडितांनी शास्त्रानुसार विधी केला. कथित धर्मांतर केलेल्या लोकांचे गळ्यात भगवे रुमाल घालून स्वागत करण्यात आले. त्याचे फाेटाे सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यांची संख्या ५३ सांगितली जात असली तरी फोटोत २८ ते ३० लोकच दिसतात. सुरुवातीला धर्मांतराचे श्रेय घेणारे पैठण ब्राह्मण सभेचे अध्यक्ष आणि ब्राह्मण महासंघाचे सदस्य सुयश शिवपुरी यांनी दुसऱ्याच दिवशी असे काही घडलेच नसल्याचा दावा केला हाेता.

हा तर अल्पसंख्यकांना टार्गेट करण्याचा प्रयत्न : ख्रिश्चन महासंघ
अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष आशिष शिंदे म्हणाले, गेल्या काही दिवसांत अशा घटना सातत्याने घडत आहेत. कर्नाटकात धर्मांतरविरोधी कायदा संमत झाला. हरिद्वारच्या संत संमेलनात नाताळला विरोध करण्यात आला. आग्र्यात सांताक्लाॅजचे पुतळे जाळले. बेळगावात चर्चमध्ये नाताळ साजरा करणाऱ्यांना हिंदुत्ववादी संघटनांच्या धमक्यांविरोधात संरक्षण देण्यास पोलिसांनी नकार दिला. दिल्ली व उत्तराखंडमध्ये चर्चची तोडफोड झाली. पैठणची घटना याच मालिकेचा एक भाग आहे. अल्पसंख्यकांना टार्गेट करण्यासाठी धार्मिक स्थळांचा वापर केला जातोय. पंतप्रधान मोदी व्हॅटिकन सिटीला भेट देऊन पोपला भारतात येण्याचे निमंत्रण देतात, तर दुसरीकडे त्यांचेच समर्थक ख्रिश्चनांना त्रास देत आहेत. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही चाल खेळली जात आहे,’ असा आराेप शिंदेंनी केला. पैठणच्या घटनेत धर्मांतर झालेच नाही, पण ख्रिश्चनविरोधी वातावरण तयार करण्यासाठी काहींनी हा डाव रचल्याचा आरोप शिंदे यांनी केला. मुख्यमंत्री, अल्पसंख्याक आयोग, पोलिस अधीक्षकांना पत्र लिहिले आहे. पैठणमध्येही तक्रार देणार आहोत, असे ते म्हणाले.

आम्ही फक्त सत्कार केले, घरवापसीच्या बातम्यांनी धक्का : ब्राह्मण सभा
धर्मांतर झालेच नाही, मग या लाेकांचे स्वागत का केले? मदिरात आलेल्या प्रत्येकाचे असे स्वागत करतात का? या प्रश्नावर ब्राह्मण सभेचे सुयश शिवपुरी म्हणाले, ‘मंदिरात येणाऱ्यांची कोणी माहिती दिली तर त्यांचे स्वागत करण्याची परंपरा आहे. सामाजिक कार्यकर्ते संजय वालतुरे यांनी काही ओळखीचे लाेक दर्शनाला येणार असून त्यांचे स्वागत-सत्कार करण्यास फाेनवर सांगितले. २५ डिसेंबरला हे लोक आले. वालतुरे यांची माणसे असल्याने त्यांना मंदिरात नेऊन सत्कार केला. नाथवंशज महाराजांनी संवाद साधला. मात्र या वेळी धर्मांतराचा विषय झालाच नाही. त्यांनी अन्नछत्रात जेवण केले. मात्र दुसऱ्या दिवशी घरवापसीची चर्चा सुरू झाली अन‌् आम्हालाही धक्का बसला. काही संघटना धर्मांतराचे काम करतात. आम्हाला त्यांंच्यासोबत काम करण्यासाठी गळ घालतात. पण आम्हाला सर्वांसाेबत काम करावे लागते. आम्ही नकार दिल्याने बदनामीसाठी हा कट रचण्यात आला. त्यांना समाजात द्वेष हवा आहे. आम्ही कोणाचे धर्मांतर केले नाही, धर्माचा अपमान केला नाही. धर्मांतराचा विधी दहा मिनिटांत कसा होईल? त्यासाठी समोरील धर्मपीठाची मान्यता लागते. येथे फक्त स्वागत व सत्कार झाले, असा शिवपुरी यांचा दावा आहे. न घडलेल्या ‘घरवापसी’चे काही जण राजकारणही करत असल्याचा त्यांचा आरोप आहे. शिवपुरी यांनी नाव घेतलेले संजय वालतुरे यांना फोन बंद हाेता.

‘हे’ लाेक हिंदूच, धर्मांतराचा प्रश्नच नाही : पाेलिस अधीक्षक
जालन्याचे पोलिस अधीक्षक विनायक देशमुख म्हणाले, मंठा तालुक्यात एकही चर्च नाही. हे लोक हिंदूच आहेत. यामुळे धर्मांतराचा प्रश्नच येत नाही. याप्रकरणी अजून कोणी तक्रार नोंदवलेली नाही. आम्ही प्राथमिक चौकशी सुरू केली आहे. पैठणला गेलेल्या ५३ पैकी १५ ते १६ लोकच जालना जिल्ह्यातून गेले हाेते. इतर लोक अन्य शहरांतून जोडले गेले. अजून त्यांचे जवाब नोंदवले नाहीत. मंठा येथील २२ ख्रिश्चन कुटुंबातील ६५ जणांनी मात्र ५ जानेवारीला पैठणलाच हिंदू धर्मात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती आमच्याकडे आहे.’

बातम्या आणखी आहेत...