आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समस्या:दुर्गंधी सहन करूनच भाविकांना घ्यावे लागतेय खडकेश्वर येथील महादेव, लक्ष्मीमातेचे दर्शन

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांचे खडकेश्वर महादेव मंदिर आराध्य दैवत मानले जाते. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी मोठी असते. खडकेश्वर परिसरात असलेल्या सांडपाण्याच्या नाल्याची दुर्गंधी सहन करीत भाविकांना महादेव मंदिराच्या दर्शनासाठी यावे लागत आहे. दुर्गंधीमुळे स्थानिक रहिवासी, व्यावसायिक त्रस्त आहेत. परिसरात नागरिकांचे आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. पावसाळ्यात तर सर्वाधिक त्रास होतो. त्यामुळे या नाल्याची उंची वाढवण्यात यावी, आठवड्यातून महानगरपालिकेने फवारणी करावी, जेणेकरून डासांचे प्रमाण कमी होईल, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

महात्मा फुले चौकातून खडकेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यात निजामकालीन नाला लागतो. हा नाला सांडपाण्याचा असून नारळीबाग, गुलमंडीसह इतर परिसरातील सांडपाणी या नाल्याने वाहते. या रस्त्यावर प्रंचड वर्दळ असते. नाल्यावरून ये-जा करणारे नागरिक नाल्यात कचरा फेकतात. हा कचरा सडतो. याकडे महानगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करते

आरोग्यावर परिणाम नाला अस्वच्छ आहे. नाल्याची प्रचंड दुर्गंधी येते. यामुळे नागरिक त्रस्त आहेत. या दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्यदेखील खराब होते. मंगेश पोटे, नागरिक

नागरिक कचरा टाकतात नाल्यावरून ये-जा करणारे नागरिक नाल्यात कचरा फेकतात. नाल्यात कचरा सडतो आणि त्याची दुर्गंधी सुटते. येथील मुतारीही तीदेखील बंद करावी. गौरव बोरा, नागरिक.

अस्वच्छ नाला, डास वाढले ड्रेनेजलाइन फुटली आहे. महानगरपालिका नाला स्वच्छ करत नाही. डासही वाढले आहेत. आजार पसरतो आहे. वेळोवेळी फवारणी करावी. राजेश सत्रे, पुजारी

जवळ गणेश, महालक्ष्मी मंदिर नाल्याच्या जवळच महालक्ष्मी आणि गणेश मंदिर आहे. या मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना दुर्गंधीचा प्रचंड त्रास होतो. या दुर्गंधीमुळे अनेक भाविक मंदिरांत येत नाहीत.

नाला उंच करण्याची मागणी हा निजामकालीन नाला आहे. या नाल्याची उंची वाढवण्याची मागणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. मात्र, पुढे काही झाले नाही. पावसाळ्यात सर्वाधिक त्रास होतो. पावसाचे पाणी नाल्यावरून ओलांडते. पुलाची उंची वाढवणे गरजेचे आहे. कीर्ती शिंदे, माजी नगरसेविका, खडकेश्वर

काम पूर्ण करण्यात येईल पावसाळा सुरू होण्यापूर्वी नाला स्वच्छ करण्यात येईल. नाल्याच्या उंचीसंदर्भात मला काहीही माहिती नाही. आरिफ खान, अभियंता, झोन क्र. २.