आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेळावा:हर्सूलमध्ये धनगर समाजाचा रविवारी आक्रोश मेळावा

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसांनी धनगर समाजासाठी एक हजार कोटी रुपये देण्याचा अध्यादेश काढला होता. मात्र, प्रत्यक्ष रक्कम मिळाली नाही. महाविकास आघाडी सरकारने निधी दिलाच नाही. नव्या सरकारचेही त्याकडे दुर्लक्ष असल्याने धनगर समाजाने ६ नोव्हेंबर रोजी हर्सूल येथील हरसिद्धी मैदानात आक्रोश महामेळावा आयोजित केला आहे, अशी माहिती भाजपचे माजी खासदार, धनगर समाज संघर्ष समितीचे संस्थापक विकास महात्मे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. २०१९ मध्ये एक हजार कोटी मंजूर होते. आज २०२२ असल्याने तीन वर्षांचे तीन हजार कोटी रुपये मिळावेत, असेही ते म्हणाले.

६ नोव्हेंबरला हर्सूल येथील हरसिद्धी मैदानात धनगर समाज आरक्षण अंमलबजावणी यासह विविध मागण्यांसाठी आक्रोश महामेळावा आयोजित केला आहे. त्यास वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, रोहयोमंत्री संदिपान भुमरे, सहकारमंत्री अतुल सावे, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची उपस्थिती असेल, अशी माहिती महात्मे यांनी दिली.

ते म्हणाले की, अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधत एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी हा सर्वपक्षीय मेळावा आहे. आदिवासींप्रमाणे धनगरांसाठी मंजूर योजनांची अमलबजावणी करावी, धनगर समाजाच्या मुलांना शिष्यवृत्ती, घरकुल योजना, चराईसाठी पास मिळावेत या प्रमुख मागण्या आहेत. समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सर्व धनगर नेते एकत्र येत आहेत. त्यामुळे समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष बापूसाहेब शिंदे, औरंगाबाद जिल्हा कार्यकारिणीचे रंगनाथ राठोड, अरुण रोडगे, बाळासाहेब जानराव यांनी केले आहे.

आम्हाला गृहीत धरू नका
या वेळी महात्मे म्हणाले की, सरकारनेच नव्हे तर कोणत्याच पक्षाने आम्हाला गृहीत धरू नये. या मेळाव्यानंतर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर तीव्र आंदोलन करणार आहोत, असा इशाराही त्यांनी दिला.

बातम्या आणखी आहेत...