आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्यात येत आहे. याचा निषेध करत राज्यपाल हटवा, या मागणीसाठी शिवप्रेमींनी रविवारी सहकारमंत्री अतुल सावे यांच्या ज्याेतीनगरातील निवासस्थानासमोर ढोल वाजवून, राज्यपालांच्या नावाने बोंबा मारून आंदाेलन केले.
मराठी अस्मितेचा अवमान करणाऱ्या महाराष्ट्रद्वेषी राज्यपालांची तत्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी आंदाेलकांनी केली. मंत्रिमंडळात असूनही अतुल सावे यांनी राज्यपालांच्या स्पष्ट आणि थेट निषेध केला नाही याबद्दल शिवप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली. छत्रपती शिवरायांचा अवमान महाराष्ट्र कुठल्याही परिस्थितीत सहन करणार नाही असा इशारा त्यांनी दिला. तरुणांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या निषेधार्थ बोंबा मारून संताप व्यक्त केला.
आंदोलकांनी प्रश्न विचारून कोंडीत पकडले: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीचे विधान केल्याबाबत तुम्हाला माहिती आहे का, असा प्रश्न उपस्थित करून आंदाेलकांनी मंत्री सावे यांना कोंडीत पकडले. त्यानंतर चुकीच्या विधानाची माहिती तुमच्या पक्षाच्या वरिष्ठांना देऊन राज्यपालांना तातडीने हटवण्यासाठी पुढाकार घ्यावा, विधिमंडळाच्या सभेत प्रश्न उपस्थित करावा, अशी मागणी करण्यात आली. आंदोलकांचे म्हणणे एेकून घेतल्यानंतर सावे यांनी सर्व शिवप्रेमींच्या भावना वरिष्ठ पातळीवर पोहोचवण्यात येतील, असे आश्वासन दिले.
काळे ध्वज लावून रॅली काढणार ढोलवादन आंदोलनात अनेक शिवप्रेमींनी काळे कपडे, तर महिलांनी काळी साडी परिधान केली हाेती. याविषयी ते म्हणाले, जोपर्यंत राज्यपालांना हटवण्यात येणार नाही तोपर्यंत काळे कपडे घालणे, काळे ध्वज घरावर लावणे आणि काळे ध्वज लावून शहरात रॅली काढण्यात येणार आहे.
राष्ट्रपतींना आज पाठवणार निवेदन ‘राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव’ या मागणीसाठी आंदोलन सप्ताह पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यपाल कोश्यारींची हकालपट्टी करावी, त्यांना पाठीशी घालणाऱ्या नेत्यांना जाब विचारावा यासाठी अधिक आक्रमकपणे आंदोलन करण्याचा निर्धार केला. तसेच ५ डिसेंबरला राज्यपालांना तातडीने हटवण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन राष्ट्रपतींना पाठवण्यात येणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.