आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घोटाळा:शासकीय गाडीत रक्कम, दारू नेताना डीएचओला पकडले; औरंगाबादच्या डीएचओवर बदनापूर पोलिसांची कारवाई

जालना/ बदनापूरएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • कारच्या झडतीत सापडले ६ लाख ७० हजार रुपये, ६ हजारांची विदेशी दारूही
  • चौकशीत अजब उत्तरे देऊनही गुन्हा नोंदवून पोलिसांनी नोटिसीवर सोडून दिले

औरंगाबादचा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते (४३) यास शासकीय वाहनातून रोख रकमेसह विदेशी दारू घेऊन जालन्याकडे जाताना वरुडी चेकपोस्टवर पोलिसांनी शनिवारी दुपारी १.३० वाजता पकडले. दरम्यान, वाहनाची कागदपत्रे तसेच रोख रक्कम व विदेशी दारूबद्दल विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे न दिल्यामुळे कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी बदनापूर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. दरम्यान, प्राथमिक चौकशी करून त्याची नोटिसीवर सुटका करण्यात आली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे इर्टिगा कार (एमएच २० सीयू ०३५३) मधून हवाल्याची मोठी रक्कम अौरंगाबादहून जालन्याकडे जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानुसार बदनापूर हद्दीतील चेकपोस्टवर कार अडवून चालक हिरालाल आसाराम शेजवळ व डॉ. अमोल गिते याची विचारपूस करण्यात आली. त्यानंतर कारची झडती घेतली असता त्यात सहा लाख ७० हजार रुपये रोख, ६ हजारांची विदेशी दारू सापडली. दरम्यान, ही रक्कम वडिलांची असून दारूसुद्धा त्यांच्यासाठीच घेऊन जात असल्याची उडवाउडवीची उत्तरे देऊन डॉ. गिते याने पोलिसांना समाधानकारक माहिती दिली नाही. यामुळे पंचनामा करून कारसह रोख रक्कम व विदेशी दारू असा एकूण १२ लाख ७६ हजारांचा माल पाेलिसांनी जप्त केला. याप्रकरणी जिल्हा विशेष शाखेचे पीएसआय शिवसिंग बहुरे यांनी तक्रार दिली असून तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल ढिल्पे करत आहेत. 

मुख्यालय सोडले कसे, पाठिराखा कोण? 

कोरोनामुळे सर्व अधिकारी-कर्मचारी यांना मुख्यालयी थांबण्याचे आदेश असून आरोग्य विभागावर मोठी जबाबदारी आहे. सध्या औरंगाबाद हॉटस्पॉट आहे. दरम्यान, डॉ. गिते जिल्हा आरोग्य अधिकारी पदावर कार्यरत असतानाही शनिवारी परवानगी न घेता मुख्यालय सोडून बाहेर पडले. शिवाय, शासकीय वाहनातून रोख रक्कम, दारू घेऊन जाऊ लागले. तसेच पैसे वडिलांचे असून दारूसुद्धा त्यांच्यासाठीच घेऊन जात असल्याचे अजब उत्तरही त्यांनी पोलिस चौकशीत दिले. दरम्यान, पोलिसांनीही गुन्हा नोंदवून त्यांना नोटिशीवर सोडून दिले.

हे प्रश्न अनुत्तरित

संपूर्ण प्रकरणात डॉ. गिते यांच्या पाठीशी कोण आहे, हे पैसे आणि दारू कोणाची आणि कुठून आली, शासकीय वाहन घेऊन जाताना त्यांनी वरिष्ठांची परवानगी दिली होती का, औरंगाबाद पोलिसांनी अडवले का नाही, दुपारी १.३० वाजता पकडल्यावर गुन्हा नोंदवायला ४.४७ वाजेपर्यंत कशामुळे वेळ घालवला, एवढे मोठे प्रकरण असतानासुद्धा आरोपीस नोटिशीवर कसे सोडून दिले, यात काही बड्या नेत्यांनी फोन केल्याची माहिती आहे. त्यांचा इंटरेस्ट काय? असे अनेक प्रश्न येथे अनुत्तरित आहेत.

आैरंगाबाद चेकपोस्टवरून सुटलेच कसे? 

डॉ. अमोल गिते (४३, शिवाजी शिक्षक कॉलनी, लोणार जि. बुलढाणा ह. मु. स्वरांजली अपार्टमेंट प्लॉट नं.१, लक्ष्मीनगर, गारखेडा, औरंगाबाद) हे औरंगाबादहून आरोग्य सेवा असा फलक लावलेले शासकीय वाहन घेऊन शहरातून बाहेर पडले. एवढेच नव्हे तर चिकलठाणा, करमाड, शेकटा हद्दीतून पुढे निघत बदनापूर हद्दीत वरुडीत आल्यावर त्यांची तपासणी केली. मग, औरंगाबाद हद्दीतून त्यांना सोडले कसे? शिवाय, औरंगाबाद व जालना संयुक्त चेकपोस्टवरूनसुद्धा त्यांनी गाडी पुढे काढली? येथूनही ते पुढे निघाले यामुळे चेकपोस्टवरील पोलिस यंत्रणासुद्धा संशयाच्या फेऱ्यात सापडली आहे.

काय म्हणतात, औरंगाबाद जि.प. सीईओ गाेदावाले

प्रश्न : डॉ. अमोल गिते यांनी मुख्यालय सोडताना परवानगी घेतली होती का ? सीईओ : नाही, मुख्यालयी सोडून जात असल्याचे ते मला बोललेसुद्धा नाही. प्रश्न : शनिवारी त्यांचा जिल्ह्यात दौरा कुठे होता ? सीईओ : नियाेजित दौऱ्याबद्दल माहिती नाही, पण सकाळी बोलणे झाले होते. प्रश्न : शनिवारी सकाळी नेमके काय बोलणे झाले ? सीईओ : गृहमंत्री रविवारी औरंगाबाद दौऱ्यावर असून कोरोनाच्या अनुषंगाने माहिती मागवली असता, सायंकाळी नोटस् देताे असे डॉ. गिते म्हणाले होते. प्रश्न : त्यांच्याकडे शासकीय वाहन होते का? सीईओ : प्राथमिक माहितीवरून ते शासकीय वाहनाने जात असल्याचे दिसतेय, पोलिसांकडून माहिती येईल. प्रश्न : आता पुढे काय कार्यवाही करणार? सीइओ : साेमवारी पोलिसांकडून अहवाल आल्यावर कार्यवाही केली जाईल. प्रश्न : आरोग्य अधिकाऱ्याची जबाबदारी कोणाकडे देणार? सीईओ : रविवारी गृहमंत्री औरंगाबादेत आहेत. मला तोच प्रश्न पडला, कॅपेबल माणसाकडे जबाबदारी देऊ. प्रश्न : या प्रकरणाबाबत आणखी काय सांगाल? सीईओ : कोरोनामुळे आरोग्य विभागावर मोठी जबाबदारी आहे, त्यांनी असे करायला नको होते.

जालन्यातही डॉ. अमोल गिते याची वादग्रस्त कारकीर्द 

जालन्यात जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी, त्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून डॉ. अमोल गिते याने दोन वर्षांपूर्वी काम केले होते. एका जि.प. सदस्याच्या पतीला घरी जाऊन धमकावल्याप्रकरणी अंबड ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल होता. यातही त्याला लगेच जामीन मिळाला होता.

बातम्या आणखी आहेत...