आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजायकवाडीच्या कालव्याची अवस्था प्रचंड खराब झाली आहे. राज्य सरकारने कालव्याचे सर्वेक्षण आणि डीपीआर (सविस्तर प्रकल्प आराखडा) तयार करण्याच्या सूचना दिल्या. त्याला दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली. मात्र, गेल्या ११ महिन्यांपासून अद्याप सर्वेक्षण आणि डीपीआरचे काम झालेले नाही.
त्यामुळे मराठवाड्यतील सर्वात मोठ्या जायकवाडी धरणाच्या सिंचनाकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.जायकवाडीचे कालवे मोठ्या प्रमाणात खराब झाले आहेत. त्यामुळे त्यांचेे सर्वेक्षण करण्याच्या सूचना तत्कालीन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिल्या होत्या. त्यानंतर हे काम संथ गतीने सुरू आहे.राज्य सरकारने यश इंजिनिअर्सला सर्वेक्षण आणि डीपीआर तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार जायकवाडीच्या कालव्याचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू आहे. ते ऑक्टोबरअखेर पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, कामाचा डीपीआर तयार करण्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. जानेवारीमध्येही हे काम झाले नसल्यामुळे पुन्हा मुदत वाढवण्यात आली. मात्र, अद्याप सर्वेक्षण आणि डीपीआरचे काम पूर्ण झालेले नाही.
लायनिंग उखडले, वहनव्यय वाढला
कालव्यांचे ‘पीसीबी’ (प्लेन सिमेंट काँक्रीट) लायनिंग ८० ते ९० टक्के उखडल्याने पाणी सोडताना वहनव्यय ५० टक्क्यांपेक्षा अधिक झाला आहे. त्यामुळे जायकवाडीतून सोडलेले पाणी शेतापर्यंत वेळेत पोहोचत नाही. त्यामुळे पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे या लायनिंगची दुरुस्ती झाल्यास पाणीपाळीचा वेळ वाचणार आहे.
सर्वेक्षण, डीपीआरचे काम अंतिम टप्प्यात
याबाबतचे सर्वेक्षणाचे काम करताना त्या काळातील नकाशे, कालव्याचे डिझाइन जुळवण्यास वेळ लागत आहे. या कामाला दोन वेळा मुदतवाढ दिली आहे. सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच डीपीआर सादर होण्याची शक्यता आहे. डीपीआर आल्यानंतर कालव्याच्या दुरुस्तीचे नियोजन करण्यात येणार आहे. - एस. सब्बीनवार, अधीक्षक अभियंता
कालव्याच्या सर्वेक्षणासाठी २ कोटी ९५ लाख रुपये
या सर्वेक्षणासाठी २ कोटी ९५ लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. जायकवाडीच्या कालव्यांसाठी प्राथमिक अंदाजानुसार या अडीच ते तीन हजार कोटींचा खर्च येणार आहे. एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या माध्यमातून यासाठी निधी उपलब्ध करण्याचे शासनाचे नियोजन आहे.
अनेक चाऱ्या पूर्णपणे बंद
जायकवाडी धरणातून १ लाख ८४ हजार हेक्टरवर सिंचन अपेक्षित आहे. २०८ किमी लांबीच्या डाव्या (चाऱ्याची लांबी १३५० किमी) आणि १३२ किमीच्या उजव्या कालव्यातून (चाऱ्या ६३० किमी) सिंचनासाठी पाणी देण्यात येते. कालव्यांच्या चाऱ्यांची अवस्था खूपच खराब झालेली असून अनेक चाऱ्या पूर्णत: बंद पडल्या आहेत. ७५ टक्क्यांपेक्षा आधिक चाऱ्या खराब झाल्या आहेत.
जलसंपदा विभागाचे कालव्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष
उच्च न्यायालयाच्या सूचनेनंतरही दुर्लक्ष
उच्च न्यायालयाने जायकवाडीच्या कालव्याबाबत दुरुस्तीचे आदेश दिलेले होते. त्याकडे राज्य शासन दुर्लक्ष करत आहे. सर्वेक्षणासाठी इतका वेळ लागत असेल तर दुरुस्ती कधी करणार? धरणात असलेल्या पाण्याचा खराब कालव्यामुळे अपव्यय होत आहे. शासनाने याबाबत गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. - शंकरराव नागरे, जलतज्ज्ञ
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.