आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनलाइन चलनाला वाहन चालक वैतागले:थेट मुख्यमंत्र्यांनाच दिला आंदोलनाचा इशारा

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ऑनलाइन चलनाला वाहन चालक वैतागले आहेत. त्यामुळे त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना साकडे घातले आहे. या प्रकरणी काही कारवाई केली नाही, तर आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला आहे.

जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेने मुख्यमंत्र्यांना याबाबत एक निवेदन देत या प्रकरणी लक्ष घालण्याची मागणी केली आहे.

वाहन चालकांना परिवहन कायद्याचे उल्लंघन कुठे, केव्हा झाले ही चूक कळत नाही. अचानक हायवे पोलिस वाहन आडवतात व ऑनलाइन चलनाची पावती हातात देऊन भरमसाठ दंड भरण्यास सांगतात. या अडवणुकीमुळे वाहन चालक चांगलेच वैतागले आहेत. हा अन्याय त्वरित थांबवावा, अशी मागणी केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, टोल नाक्यावरील कर्मचारी, हायवे पोलीस कर्मचाऱ्यांकडून विविध मार्गाने वाहन चालक, मालकांना अक्षरश: लुटले जात आहे. अव्वाच्या सव्वा दंडाची पावती बघून वाहन जाग्यावरच उभे करावे लागते. पोलिस कर्मचारी अवमानकारक वागणूक देतात. टोल नाक्यावर करातही भरमसाठ वाढ केलेली आहे.

जागोजागी टोल नाके झाले असून कायद्याचे येथे पालन होत नाही. लांब अंतराचे येथे पालन केले जात नाही. सर्रास लूट होत आहे. यावर कुणाचेच नियंत्रण नाही. वाहन चालक बोलायला गेले, तर टोल नाक्यावरील वसुली कर्मचारी भांडण करतात. याच बरोबर फायनान्स कंपनीतील वसुली पथकातील कर्मचाऱ्यांकडूनही वाहन चालकांना अवमानित करण्यात येत आहे. एक हप्ता थकला तरी गुंडामार्फत गाडी ओढून नेली जाते. पैसे भरण्यासाठी घरी जावून धमकावले जाते. आई वडील,बायको मुले, आदींसमोर अवमान केला जातो. या जाचा पायी वाहन चालक आत्महत्या करू लागले आहेत.

जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय हाळनोर यांच्यासह त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांवर एका फायनान्स कंपनीच्या अधिकारी व कर्मचारी, गुंडांकडून मारहाण झाली. याची पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल आहे. गत महिन्यात पारोळा (जि.जळगाव) येथील ट्रक चालक शोभीलाल यांनी फायनान्सच्या जाचापायी आत्महत्या केली. त्यांचा संसार उघड्यावर पडला आहे. याकडे जिल्हा, पोलिस, आरटीओ प्रशासन अजिबात लक्ष देत नाही. वाहन चालक मालक कल्याण महामंडळही अद्याप स्थापन केले नाही. रस्ते अपघातात अपंगत्व व मृत्युमुखी पडलेल्यांना अर्थसाह्य मिळावे. वाटमारीत वाहन चालकांना होणारी मारहाणीतून संरक्षण मिळावे. विविध मागण्या प्रलंबित आहेत. त्यामुळे १७ सप्टेंबर हा चालक दिन असून त्या पूर्वी वाहन चालक मालकांच्या समस्या जाणून त्या तातडीने सोडवाव्यात, यासाठी जय संघर्ष वाहन चालक मालक संघटनेच्या वतीने विभागीय आयुक्तांमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन पाठवण्यात आले. याची त्वरीत दखल न घेतल्यास 16 व 17 सप्टेंबर रोजी तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा देखील देण्यात आला आहे.

संघटनेचे अध्यक्ष संजय हाळनोर, संतोष काळवणे, सोमनाथ गायकवाड, निखिल कुलकर्णी,लक्ष्मण शेंडगे, अब्बास पठाण, लक्ष्मण वाघ, लक्ष्मण सोनवणे, संजय नलावडे, रवींद्र सुरडकर,सागर राजपूत, अशोक तिवारी,अमोल तावरे, अनिल मते आदींची निवेदनावर स्वाक्षरी आहे.

बातम्या आणखी आहेत...