आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचार जिल्ह्यांतील गुंतवणूकदारांची सात कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची फसवणूक करून फरार झालेला रिदास इंडिया कंपनीचा संचालक मोहंमद अनिस आयमन (२४) याला चार वर्षांनंतर अटक करण्यात आर्थिक गुन्हे शाखेला यश आले. विशेष म्हणजे, गुन्ह्यात आरोपी असलेल्या त्याच्या वडिलांच्या दफनभूमीपासून ते मृत्यू प्रमाणपत्रापर्यंत पोलिसांनी माहिती शोधत अनिसचे घर गाठले. त्यामुळे तीन जिल्ह्यांच्या पाेलिसांना गुंगारा देणारा अनिसदेखील औरंगाबाद पोलिस घरापर्यंत आल्याचे पाहून हैराण झाला. न्यायालयाने त्याला ७ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
अनिस व त्याचे वडील मोहंमद अय्युब हुसेन यांनी बंगळुरूला रिदास इंडिया नावाची कंपनी स्थापन केली हाेती. त्याआधारे लोकांना गुंतवणुकीचे आमिष दाखवून दुप्पट परतावा देण्याचे प्रलाेभन दाखवले. पैशांसह प्लॉट देण्याचेही आश्वासन दिले. २०१७ मध्ये औरंगाबादेत प्रवेश करत २०१९ पर्यंत जवळपास ८० गुंतवणूकदारांकडून त्यांनी अडीच कोटी रुपयांची गुंतवणूक करवून घेतली. मात्र, नंतर पोबारा केला. मुंबई, नवी मुंबई, बुलडाणा येथेही त्यांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करवून घेतली होती. तेव्हा औरंगाबादेत गुन्हा दाखल होऊन आर्थिक गुन्हे शाखा तपास करत होती.
तीन महिने केला तांत्रिक तपास : तोटावार व त्यांच्या पथकाने त्या माेबाइल क्रमांकाचा तीन महिने अभ्यास केला. तेव्हा तो क्रमांक आयमन यांच्या नोकराचा असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पुन्हा पोलिसांनी काही दिवसांपूर्वी बंगळुरू गाठले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्याला संपर्क करून कुरिअर कंपनीतून पार्सल आल्याचे सांगून एका चौकात बोलावून घेतले. नाेकर पार्सलच्या आमिषाने येताच त्याला ताब्यात घेत स्थानिक पोलिस ठाण्यात नेले. तेथे कसून चौकशी करताच त्याने अनिसचा पत्ता सांगितला. त्यानंतर घरातून त्याला ताब्यात घेतले. अनिसच्या आईचेदेखील निधन झाले आहे. तो सध्या बहिणींसोबत राहत होता.
पैसे परत मिळण्याची आशा वाढली : पोलिसांनी अनिसला अटक करण्यासोबतच त्याच्या वडिलांनी वडगाव परिसरात विकत घेतलेल्या ६० एकर जमिनीची कागदपत्रे मिळवली. त्याचा सविस्तर तपास करून ती अभिरक्षित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवत तो पोलिस महासंचालक कार्यालयाकडे सादर केला. त्याचा बाजारभाव सध्या २५ ते ३० कोटींच्या घरात असून त्यामुळे तक्रारदारांना पैसे परत मिळण्याची आशा वाढली आहे.
बंगळुरूच्या कब्रस्तानातून मिळवले प्रमाणपत्र { दोघेही बापलेक चार जिल्ह्यांच्या पोलिसांना गुंगारा देत होते. निरीक्षक दादाराव शिनगारे, तृप्ती तोटावार तपास करत असताना जुलै २०२१ मध्ये त्यांना मुख्य आरोपी अय्युबचे निधन झाल्याची माहिती मिळाली. तीच संधी साधण्याचे त्यांनी ठरवले. त्यांनी पोलिस नाईक विठ्ठल मानकापे, संदीप जाधव, बाबा भानुसे यांच्यासह बंगळुरू गाठले. त्यांनी अय्युबचा दफनविधी कुठे झाला याचा शोध सुरू केला. { जवळपास पाच दफनभूमीत विचारपूस केल्यावर दफनविधीची जागा सापडली. तेथून पथक मनपाच्या वॉर्ड कार्यालयात गेले. तेथे अधिकाऱ्यांकडून अय्युबचे मृत्यू प्रमाणपत्र मिळवले. त्यावरील पत्त्यावर पोलिस जाताच ते घर त्यांनी २०१९ मध्ये विकल्याचे समोर आले. { पोेलिसांना गुंगारा देण्यासाठी त्याने ही शक्कल लढवली होती. मात्र, ते प्रमाणपत्र घेताना रिसीव्हड कॉपीवर एक क्रमांक लिहिला होता. तो मोबाइल क्रमांक घेऊन औरंगाबाद पाेलिस शहरात परतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.