आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संकट:अनलॉक-3 मध्येही निराशाच; राज्यात 17 हजार खासगी बसची चाके रुतलेली, 4 महिन्यांपासून ट्रॅव्हल्स बंद

औरंगाबाद3 वर्षांपूर्वीलेखक: महेश जोशी
  • कॉपी लिंक
  • बुकींग स्टाफ,एजंटसह राज्यभरात 30 लाख कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ

कोरोनाच्या संकटाचा खासगी लक्झरी बस व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. राज्यातील १७ हजार बस ४ महिन्यांपासून जागेवर उभ्या आहेत. अनलॉक-३ मध्ये बस सुरू होण्याची अपेक्षा होती. मात्र, तीही धुळीस मिळाली आहे. बस सुरू झाल्या तरी प्रतिसाद मिळण्याबाबत व्यावसायिक साशंक आहेत. यामुळे औरंगाबादच्या सर्वात जुन्या ट्रॅव्हल्स व्यावसायिकाने हे क्षेत्रच बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

देशात ८३ टक्के प्रवासी बसने, तर १७ टक्के रेल्वे आणि हवाई मार्गाने प्रवास करतात. महाराष्ट्रात १७ हजार लक्झरी बस रस्त्यावर धावतात. त्यावर ड्रायव्हर, क्लीनर, बुकिंग स्टाफ, एजंट, मेकॅनिक असे ३० लाखांहून अधिक जण अवलंबून आहेत. बस बंद असल्याने व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. कर्जाचा हप्ता, कर्मचाऱ्यांचे वेतन, विमा, जागेचे भाडे आणि आगाऊ पथकर भरण्याची चिंता व्यावसायिकांसमोर असल्याचे बस ओनर अँड ट्रॅव्हल्स एजंट्स वेल्फेअर असोसिएशन संघटनेचे अध्यक्ष राजन हौजवाला यांनी सांगितले.

ट्रॅव्हल्सचे जनक व्यवसाय बदलणार
औरंगाबादमध्ये १९८० मध्ये हौजवाला कुटुंबीयांनी वेलवर्थ टूर्स अँड ट्रॅव्हल्सद्वारे खासगी लक्झरी बस व्यवसायाचा पाया रचला. मात्र, लॉकडाऊननंतर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे त्यांच्या दुसऱ्या पिढीतील व्यावसायिक राजन हौजवाला हा व्यवसाय बदलण्याचा विचार करत आहेत. ते म्हणाले, डिझेल ८१ रुपयांवर पोहोचले आहे. रोड आणि टोल टॅक्सला माफी मिळालेली नाही. बसभाडे वाढवून तरी किती वाढवणार? शिवाय बस सुरू झाल्या तरी प्रतिसाद मिळण्याची शक्यता नाही.

दरवर्षी ३९२ कोटी रुपयांचा महसूल
लक्झरी बसला ३ महिन्यांचा ५७,७५० रुपयांचा पथकर आगाऊ भरावा लागतो. वर्षाला ही रक्कम २,३१,००० रुपये होते. राज्यातील १७ हजार बस वर्षाकाठी ३,९२७,०००,००० एवढा कर शासनाच्या तिजोरीत जमा करतात. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, ओडिशामध्ये बस सुरू झाल्यावर पुढील ६ महिने कर न भरण्याची सूट दिली आहे. महाराष्ट्रात अशी सूट मिळावी, ५० लाखांच्या बसवर वर्षाकाठी १.५ लाखाचा विमा लागतो, तो माफ व्हावा, अशी अपेक्षा व्यावसायिक पुष्कर लुले यांनी व्यक्त केली.

५५ पैकी ३० बस विक्रीस काढल्या
५५ बसचा ताफा असणाऱ्या एका व्यावसायिकाने २५ ते ३० बस विकायला काढल्या आहेत. देशभरात व्यवसाय असणाऱ्या एका कंपनीनेही २५ टक्केच बस ठेवण्याचा निर्णय घेतलाय. डी-मार्टजवळ बुकिंग काउंटर असणाऱ्या एका व्यावसायिकाने तेथे दुसरा व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले आहे. पण सध्या किराणा आणि औषधीशिवाय इतर व्यवसायाला मागणी नसल्याने तो चालण्याबाबत ते साशंक आहेत. अनेकांनी व्यवसाय बदलाचा विचार सुरू केल्याचे हौजवाला म्हणाले.

पवारांकडूनही निराशा : २५ जून रोजी राज्यभरातील व्यावसायिक ‘बस जमा करो’ आंदोलन करणार होते. त्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, परिवहनमंत्री अनिल परब यांच्यासोबत झालेल्या चर्चेत पवार यांनी १० दिवसांत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. मात्र, महिना झाला तरी निर्णय झालेला नाही. अनलॉक-३ मध्येही जिल्हाबंदी कायम आहे. ५ तारखेला मुख्यमंत्री काय घोषणा करतात याकडे लक्ष लागले आहे.