आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:​​​​​​​जायकवाडी पाच वेळा भरेल एवढे पाणी गोदापात्रातून तेलंगणाकडे, मराठवाड्याच्या पाणी क्षमतेच्या दीडपट विसर्ग

औरंगाबाद14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आतापर्यंत ४७७ टीएमसी पाणी सोडले

एखाददुसऱ्या वर्षाचा अपवाद सोडला तर दरवर्षी मराठवाड्यातील धरणांना पाण्यासाठी नाशिक-नगरच्या जलसाठ्यांकडे डोळे लावून बसावे लागते. मात्र यंदा अतिवृष्टीने कहर केल्याने मराठवाड्यातील जायकवाडी, येलदरी, माजलागव, सिद्धेश्वर, निम्न दुधना, विष्णुपुरी या प्रकल्पांतून आतापर्यंत तब्बल ४७७ टीएमसी पाणी बाभळीतून तेलंगणा राज्यासाठी सोडावे लागले. मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडीतून क्षमतेच्या (१०२ टीएमसी) सुमारे पाचपट अधिक विक्रमी विसर्ग करावा लागला. मराठवाड्याच्या सर्व ८७३ प्रकल्पांची साठवण क्षमता ८१९६ दलघमी (२८९ टीएमसी) आहे. त्याच्या दीडपटीहून अधिक विसर्गाची नोंद यंदा झाली.

जालना, परभणी, नांदेड, बीड जिल्ह्यांत सर्वाधिक पाऊस झाला. गोदावरी नदीवरील ११ बंधाऱ्यांच्या माध्यमातून शेवटी विष्णुपुरीला पाणी मिळते. यंदा विष्णपुरी प्रकल्प पावसाळ्याच्या सुरुवातीलाच भरला होता. केवळ ८१ दलघमी क्षमतेच्या विष्णुपुरीतून (२.८६ टीएमसी) २४८ टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. पुढे हेच पाणी बाभळी आणि त्यानंतर तेलंगणामध्ये पोचमपाड धरणात जाते.

माजलगावमधून ४४ टीएमसी विसर्ग : बीड जिल्ह्यातील माजलगाव धरणही सप्टेंबर महिन्यात भरले. यातून आतापर्यंत ४४ टीएमसी विसर्ग करण्यात आला. ताे क्षमतेच्या तिप्पट आहे. दुधना धरणातून ७३६ दलघमी, २६ टीएमसी म्हणजे क्षमतेच्या दुप्पट पाणी सोडण्यात आले. येलदरीतून ११६५ दलघमी, ४१.३७ टीएमसी तर सिद्धेश्वर प्रकल्पातून १४२० दलघमी ५० टीएमसी पाणी सोडण्यात आले. मानार प्रकल्पातून ८९ दलघमी ३.१४ टीएमसी, तर इसापूर प्रकल्पातून ६११ दलघमी २१.५७ टीएमसीपाणी सोडण्यात आले.

पोचमपाड धरणातून साडेचार लाखांपर्यंत विसर्ग : बाभळी धरणातून पाणी सोडल्यानंतर ते तेलगंणातील पोचमपाड धरणात जाते. जायकवाडीएवढीच क्षमता असलेल्या पाेचमपाड धरणातून साडेचार लाख क्युसेकने विसर्ग करण्यात आला होता. आतापर्यंत पोचमपाडमधून १४,२४५ दलघमी म्हणजेच ५०३ टीएमसी पाणी सोडण्यात आले. हे सर्व पाणी समुद्रात जाते.

मराठवाड्याच्या क्षमतेच्या दुप्पट पाणी सुटले : मराठवाड्यात ८७३ प्रकल्प आहेत. त्यामध्ये ११ प्रकल्पांत ५१४३, तर ७५ मध्यम प्रकल्प असून त्यामध्ये ९४० दलघमी आणि ७४९ लघु प्रकल्पांची १७१२ दलघमी क्षमता आहे, तर गोदावरीच्या १३ बंधाऱ्यांत ३२४ दलघमी तर मांजरा, तेरणाच्या २५ बंधाऱ्यांत ७५ दलघमी पाणी साठू शकते. एकूण ८७३ छोट्या-मोठ्या प्रकल्पात ८१९६ दलघमी (२८९) टीएमसी इतका पाणीसाठा आहे. बाभळीतून जे ४७७ टीएमसी पाणी सोडले ते मराठवाड्याच्या एकूण क्षमतेच्या दीडपटीपेक्षा अधिक आहे.

चंद्राबाबू नायडूंनी केले होते आंदोलन : तेलगू देसमचे नेते चंद्राबाबू नायडू यांनी २० जुलै २०१० रोजी बाभळीमधून तेलंगणात पाणी सोडण्यासाठी आंदोलन केले होते. त्या वेळी त्यांना धर्माबादेत अटकही झाली होती. त्यामुळे बाभळीचा मुद्दा ऐरणीवर आला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार दरवर्षी २९ ऑक्टोबरला बाभळीचे गेट बंद करावे लागतात. त्यानंतरच मराठवाड्याच्या वाटणीचे पाणी अडवता येते. आता मराठवाड्यातच इतका जलसाठा आहे की पाणी सोडण्याशिवाय पर्यायच राहिलेला नाही.

२०० वर्षांपेक्षा अधिक काळ पुरले असते पाणी
गोदावरीतून बाभळीत सोडण्यात आलेल्या पाण्याचा अंदाज औरंगाबाद शहराला लागणाऱ्या पाण्याच्या प्रमाणावरून बांधता येईल. १५ लाख लोकसंख्येच्या औरंगाबादसाठी दरवर्षी जायकवाडीतून दोन टीएमसी पाणी लागते. या हंगामात संपूर्ण गोदापात्रातून सोडलेले ४७७ टीएमसी पाणी औरंगाबादला २३८ वर्षे पुरू शकले असते.

२२ टीएमसीसाठी रखडली मराठवाड्यात वॉटरग्रीड
मराठवाड्यात केवळ २२ टीएमसी पाण्यासाठी वॉटरग्रीड योजना रखडली. एवढे पाणी कुठून आणायचे असा प्रश्न करून अधिकारी, जलतज्ज्ञांचा आक्षेप होता. मात्र २२ टीएमसीपेक्षा २२ पट अधिक पाणी धरणातून सोडण्यात आले आहे. त्यामुळे मराठवाड्यात नव्याने वॉटरग्रीड व गोदावरीवरच्या प्रकल्पाचे नियोजन करण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.

जायकवाडीतून आतापर्यंत २५ टीएमसीचा विसर्ग
जायकवाडी धरण २९ सप्टेंबरला भरले होते. यातून सुरुवातीला १८ व नंतर रात्री सर्व २७ दरवाजे उघडत ८९ हजार क्युसेक विसर्ग करण्यात आला. ५ ऑक्टाेबरला सर्व २७ दरवाजे उघडण्यात आलेले असून सध्या ४७ हजार क्युसेकने विसर्ग सुरू आहे. जायकवाडीत एकूण पाणीसाठा २८८५ दलघमी आहे. त्यापैकी एक चतुर्थांश म्हणजे २५ टीएमसी पाणी आतापर्यंत सोडण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...