आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी सोमवारी (१३ जून) रोजी एका पत्राद्वारे पक्षाची जिल्हा व शहर कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र हे करताना विद्यमान जिल्हाध्यक्ष समीर बिल्डर व शहराध्यक्ष शारेक नक्षबंदी यांनी आतापर्यंत पक्षासाठी केलेल्या कार्याची स्तुतीही करण्यात आली. तसेच पुढील सूचनेपर्यंत जिल्हाध्यक्ष तसेच शहराध्यक्ष यांनी सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करावे, अशी आदेशवजा सूचना केली आहे. परंतु अचानक कार्यकारिणी बरखास्त करताना एमआयएमने कारण मात्र स्पष्ट केलेले नाही. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर या निर्णयाने आश्चर्य व्यक्त होत आहे. पक्षादेशाचा सन्मान : नक्षबंदी : पक्षाने जबाबदारी दिली होती, ती मी चांगल्या प्रकारे निभावली. प्रत्येक पक्षात वेळेनुसार बदल होत असतात. पक्ष जे देईल ते काम करत राहू. आमची कोणतीही नाराजी नाही, असे शहराध्यक्ष शारेक नक्षबंदी यांनी सांगितले. जिल्हाध्यक्ष समीर बिल्डर यांचा फोन बंद होता. आंदोलनाला गालबोटाचे कारण? भाजप प्रवक्त्या नूपुर शर्मा यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ एमआयएमच्या वतीने दोन दिवसांपूर्वी आयुक्तालयासमोर आंदोलन करण्यात आले. शांततेत आंदोलन करण्याची हमी दिल्यानंतरच पाेलिसांनी परवानगी दिली होती. मात्र ऐनवेळी जमावाने शिरकाव करून आंदोलन हायजॅक केले. त्यामुळे अडीच तास तणाव निर्माण झाला. दगडफेक, धक्काबुक्कीही झाली. अखेर पोलिस आयुक्त निखिल गुप्ता व खासदार इम्तियाज जलील यांना रस्त्यावर उतरून जमावाला शांत करावे लागले. या टवाळखोरांना फूस कुणी लावली, याची चौकशी करण्याची मागणी खासदारांनीही केली होती. हे आंदोलन भरकटल्याने तर कार्यकारिणी बरखास्त केली नाही ना, अशी शंका एमआयएम कार्यकर्त्यांना वाटते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.